NC Times

NC Times

'इतकं मतपरिवर्तन झालेला पक्ष देशात कोणताही नाही', शिवाजी पार्कमधील सभेत मोदींचा हल्लाबोल


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-शिवाजी पार्कवरील महायुतीच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आणि विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियावर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांची सत्ता असताना असलेल्या पंतप्रधानांची लाल किल्ल्यावरील भाषणे काढून बघा, त्याच फक्त गरिबीचा उल्लेख आहे. पण आम्ही गेल्या १० वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचे मोदींनी सांगितले. विरोधकांच्या आघाडीत जितके लोक आहेत तितके पंतप्रधानपदाचे उमेदवार देखील असल्याची टीका मोदींनी केली.
मुंबईच्या ऐतिहासिक शिवाजी पार्कच्या मैदानावर झालेल्या या सभेत बोलताना मोदींनी त्यांच्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. मी तुम्हाला विकसीत भारत देऊन जाणार आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदी २४ तास २०४७ सालचा विकसीत भारताचे लक्ष्य पुढे ठेवून काम करत आहे.
भारताला स्वतंत्र्य मिळाले तेव्हा हा देश जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होता. जेव्हा २०१४ साली आमच्या कडे सत्ता आली तेव्हा या लोकांनी ही अर्थव्यवस्था ११व्या क्रमांकावर नेऊन ठेवली होती. आज १० वर्षानंतर भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली आहे. देशाला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधींजींच्या सूचनेनुसार काँग्रेस वेळीच भंग केली असती तर आज देश पाच दशकं पुढे गेला असता.
जगातील कोणतीही ताकद ३७० कलम पुन्हा आणू शकत नाही. हे कलम हटवणारा मोदी हाच संविधानाचा रक्षक आहे. काँग्रेसने तर संविधान तोडले अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर टीका केली. मोदींनी त्यांच्या भाषणात मी मुंबईला त्याचा हक्का परत द्यायला आलो आहे असे सांगत. आज मुंबईला आधुनिक पायाभूत सुविधा मिळत असल्याचे सांगितले. मुंबईतील मेट्रो, जेएनपीटी टर्मिनलचे काम अनेक मोठे प्रकल्प या लोकांनी अटकवले आणि भटकवले.
मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन
मोदींनी त्यांच्या भाषणात मुंबईकरांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. मुंबईकरांनी बाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावे आणि तुमचे प्रत्येक मत हे मोदींना जाणार असून यावेळी इतिहासातील सर्व विक्रम मोडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.