NC Times

NC Times

कलम ३७०, तीन तलाख, राम मंदिर ही मोदींची कामे- सुजय विखे पाटील


नवचैतन्य टाईम्स  अहमदनगर (प्रतिनिधी)-  ‘जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले, तीन तलाख पद्धत बंद, अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणी तसेच आता समान नागरी कायदा आणणे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारची प्रमुख कामे आहेत. सर्वांना सारखाच न्याय देण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपल्या मताची किंमत ओळखा. देशाची सूत्रे कोणाच्या हाती द्यायची ते ठरवून मतदान करा,’ असे आवाहन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मतदारांना केले.
 जामखेड तालुक्यात आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. विखे यांनी मतदारांशी संवाद साधला. डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पर्वाची दमदार वाटचाल सुरू आहे. निवडणुकीच्या निकालातून ४ जून रोजी त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. मागील १० वर्षांत केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे मोदी सरकाच्या विजयाचे सूत्र आहे. देशात मोदींची हमी टिकणार आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले.
 आमदार राम शिंदे म्हणाले, ‘देशाच्या विकासात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात घेतलेले निर्णय देशासाठी महत्वाचे ठरले आहेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकसित देशाकडे वाटचाल करत आहे. आत्मनिर्भर भारत योजनेच्या माध्यमातून उद्योगधंद्यांना नवी दिशा दिली. यामुळे जनता त्यांच्यावर खूष असून त्यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसविणार आहे. त्यासाठी आपण विखे यांना दिलेले आपले मत हे पंतप्रधान मोदी यांना सरळ पोहचणार आहे.’ असेही शिंदे म्हणाले.
 एमआयएम’सह अपक्ष आणि बंडखोराचीही माघार
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून ‘एमआयएम,’ शिवसेना ठाकरे गटाचा बंडखोर उमेदवार यांच्यासह काही अपक्षांनी माघार घेतली. त्यामुळे महायुतीचे खासदार डॉ. सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे नीलेश ज्ञानदेव लंके यांच्यात थेट लढत होणार आहे. ‘एमआयएम’चे डॉ. परवेज अशरफी, अपक्ष उमेदवार नीलेश साहेबराव लंके यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. शिवसेना ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार गिरीष जाधव यांनीही अर्ज मागे घेतला आहे.
 एमआयएम’च्या अशरफी यांच्यावर मुस्लिम समाजाकडूनच दबाव आणला गेल्याने त्यांनी माघार घेतल्याचे सांगण्यात येते. अपक्ष लंके यांच्या उमेदवारीवरूनही आरोपप्रात्यारोप सुरू होते. माघारीनंतर आता विखे समर्थकांनी लंके समर्थकांवर आरोप सुरू केले आहेत.