NC Times

NC Times

तुम्ही १० वर्षे पंतप्रधान असला तरी माझ्यासारखा ५६ वर्षे निवडून येणारा एकतरी दाखवा शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना चॅलेंज


नवचैतन्य टाईम्स नाशिक (प्रतिनिधी)- 'मोदी दहा वर्षांपासून पंतप्रधान असले, तरी मी विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभेत ५६ वर्षांपासून काम करीत आहे. सध्याच्या घडीला ५६ वर्षे निवडून येणारा एक तरी माणूस मोदींनी दाखवावा, असे शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. गुरुवारी नाशिकच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे.
 केंद्रीय कृषीमंत्री असताना घडलेल्या बाबींना उजाळा देत पवार म्हणाले की, मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांना शेतीचा कोणताही इश्यु असला तरी माझ्याकडे यायचे, मला घेऊन गुजरातला जायचे. तसेच 'त्यांचा विसा नाकारण्यात आला तरीही मी मोदींना घेऊन इस्त्राईलला गेलो होतो. आज हे सगळं माहित असताना ते माझ्याविरोधात बोलतात हे राजकारण आहे.' अशा शब्दांत पवारांनी मोदींना फटकारले आहे.
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिंडोरी लोकसभेची जाहीर सभा कांद्यामुळेच सर्वाधिक चर्चेत राहिली. यालाच अनुसरुन शरद पवार यांनी कांदा प्रश्नावरुन देखील नरेंद्र मोदींना सुनावले. म्हणाले, 'मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मानसिकता समजून घ्यायला हवी. उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी कांद्यामुळे अस्वस्थ आहेत, शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याच्या प्रश्नाला मोदी स्पर्श ही करत नसतील तर शेतकरी प्रश्न विचारणारच. कांदाप्रश्नाचा भाजपाला नक्कीच फटका बसणार आहे.'
दरम्यान मोदींच्या दिंडोरीमधील जाहीर सभेत एका तरुण शेतकऱ्याने कांद्यावर बोला, असा प्रश्न उपस्थित केला. ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवारांनी त्या तरुणाचे कौतुक केले. म्हणाले, 'मोदींना कांद्यावर बोला असा तरुण शेतकऱ्याने प्रश्न विचारला तर ते योग्य आहे. मोदींनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मनस्थिती समजून घ्यायला हवी. सानप हा माझ्या पक्षाचा आहे का ते माहीत नाही, मात्र तो माझ्या पक्षाचा असल्यास त्याचा मला अभिमान आहे.'