NC Times

NC Times

नाव शाळेतून काढणार होती पण आता इतके गुण मिळवले, की 'नाव काढतोय' अख्खा गाव


नवचैतन्य टाईम्स नागपूर प्रतिनिधी(सतिश काळे)-      वडिलांचा सात वर्षांपूर्वी काविळीने मृत्यू झाला. आई घरकाम करते. अशात घरची आर्थिक परिस्थिती सक्षम करण्यात आपलाही हातभार लागावा, या विचाराने ती शाळा सोडणार होती. तशी इच्छा तिने शिक्षकांकडे बोलून दाखविली. मात्र, गुरुजनांनी तिला समजावले. तिच्या संघर्षात साथ देण्याची तयारी दर्शविली. त्याच मुलीने यंदाच्या दहावीत ८७.४० टक्के गुणांसह दणदणीत यश मिळविले.
 प्रतिकुलता पाचवीलाच पुजलेल्या या सावित्रीच्या लेकीचे नाव आहे, वंशिका रवींद्र ठवरे. सदर परिसरातील जाईबाई चौधरी ज्ञानपीठ हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेजची ती विद्यार्थिनी आहे. तिचे वडील रवींद्र यांचा २०१७मध्ये काविळीने मृत्यू झाला. आई कल्पना या मोलकरीण आहेत. तर मोठी बहीण रितिका हिने बीकॉमपर्यंत शिक्षण पूर्ण केले असून घरात मदत व्हावी म्हणून खासगी नोकरी धरली. रामेश्वरी भागात राहणाऱ्या वंशिकाला सदर येथील शाळेत रोज जाण्या-येण्यासाठी पैसे कसे जुळवावेत, हा प्रश्न होता. अशात अनिल भोयर आणि अश्विनी मोडक या शिक्षकांनी तिला साथ देण्याचा निर्णय घेतला. ती दररोज त्यांच्यासोबत शाळेत यायची आणि सोबत घरी जायची. अशाप्रकारे तिचा येण्या-जाण्याचा प्रश्न सुटला. इयत्ता नववीत असताना घरची हलाखीची परिस्थिती लक्षात घेत शाळा सोडण्याचा विचार तिच्या डोक्यात आला. एक गुणी विद्यार्थिनी शाळा सोडत असल्याचे लक्षात येताच शिक्षकांनी तिचे समुपदेशन केले आणि शाळा सुरू ठेवण्यास सांगितले. अभ्यासात मागे राहू नये म्हणून शाळेत शनिवार, रविवार एक्स्ट्रा शिकवणी वर्ग व्हायचे. त्याचा तिला लाभ झाला. यंदा दहावीत मिळालेल्या यशाने तिचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यात स्पर्धा परीक्षा देत प्रशासकीय सेवेत रुजू होण्याचा निर्धार ती व्यक्त करते.
 वंशिका ठवरे हिला ५००पैकी ४३७ गुण आहेत. तिने पाली विषयात १००पैकी १०० गुण मिळविले आहेत. त्याशिवाय, मराठीत ८१, इंग्रजीत ९०, गणितात ८०, विज्ञानमध्ये ७९, सामाजिक विज्ञानमध्ये ८६ गुण आहेत.