NC Times

NC Times

माण तालुक्यातील मरगळवाडी येथील युवकाचा आईच्या डोळ्यादेखत वीज पडून मृत्यू


नवचैतन्य टाईम्स  सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)-  साताऱ्यातील माण तालुक्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा अन् वीज अंगावर पडल्याने माण तालुक्यातील मरगळवाडी येथील युवक जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तर अनेकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याची घटना घडली. यामध्ये ठिकठिकाणी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
 माण तालुक्यात असणाऱ्या मरगळवाडी या ठिकाणी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. यावेळी मरगळवाडी येथील जगन्नाथ माकु मरगळे (वय १६) या मुलाचा वीज पडून मृत्यू झाला. मरगळवाडी येथील कारंडे वस्ती नावाच्या शिवारात आज सकाळपासून जेसीबीच्या साह्याने एका शेतात काम सुरू होतं. त्या ठिकाणी जगन्नाथ मरगळे याची आई कामानिमित्त गेलेली असताना तो त्या ठिकाणी आईसोबत गेला होता. सायंकाळच्या सुमारास जेसीबीचे काम संपून जगन्नाथ मरगळे हा आपल्या घराकडे येत असताना सोसाट्याच्या वारा सुटला होता आणि अचानक विजा चमकू लागल्या. ते कुटुंब घराच्या दिशेने जात होतं. त्याचवेळी वीज पडून जगन्नाथ मरगळे याचा जागीच मृत्यू झाला.
जगन्नाथ हा नववी पास होऊन इयत्ता दहावीमध्ये त्याने प्रवेश केला होता. तो शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतो. त्याचे वडील पॅरेलेसिस आजाराने घरीच असून संपूर्ण कुटुंबाचा भार आईला पेलावा लागतो, अशी माहिती पोलीस पाटील स्वाती दादा आटपाडकर यांनी दिली.
दरम्यान, कुकुडवाडनजीक असणाऱ्या आगासवडीच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात सोसाट्याच्या वारा सुटला. त्यासोबत पाऊसही सुरू झाला. पाऊस येत असल्याने रस्त्यावर कोणीही फिरत नव्हतं. यावेळी अचानक वीज कोसळल्याचा मोठा आवाज झाला आणि ही वीज आगासवडीचे ग्रामदैवत असलेल्या श्री. महालक्ष्मी मंदिराच्या कळसावर पडली. या दुर्घटनेमध्ये मंदिराच्या कळसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, या दुर्घटनेनंतर आगासवाडीतील लोकांनी मंदिराच्या झालेली नुकसान पाहण्यासाठी गर्दी केली होती, अशी माहिती पोलीस पाटील आनंद पवार यांनी दिली.