NC Times

NC Times

पालघर लोकसभेचे उमेदवार डॉ.हेमंत सावरा यांच्या विजयासाठी सामदामदाम दंडाचा बळावर उमेदवार जिंकून आणू- नितेश राणे


नवचैतन्य टाईम्स  मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-लोकसभेचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांना जिंकवण्यासाठी भाजपने जोरदार ताकद लावली आहे. यासाठी भाजपचे आमदार नितेश राणे यांना पालघरमध्ये सहनिरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुढचे दहा दिवस ते वसई विरार आणि पालघर जिल्ह्यात उपलब्ध असणार आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी डॉ. हेमंत सावरा यांना जिंकवण्यासाठी आम्ही साम दाम दंड भेद याचा वापर करू, आमचा उमेदवार घासून नाही तर ठासून निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जनतेने भाजपचा खासदार निवडून दिला तर तो थेट पंतप्रधानांशी बोलू शकतो. दुसऱ्या कोणत्या पक्षाचा हा खासदार असेल, तर त्याला लाईनमध्ये उभे राहावे लागेल, असे ते म्हणाले. त्यामुळे जनतेने भाजपच्या उमेदवाराला निवडून द्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
पालघर जिल्ह्यात झालेल्या साधूंच्या हत्याकांड प्रकरणामुळे हिंदू समाज प्रचंड चिडला आहे. पालघर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हिंदू समाजाला आता या हत्याकांडाचा बदला घेऊन भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. हेमंत सावरा यांना निवडून देण्याची चांगली संधी आहे, असे मत आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले.
 पत्रकारांशी बोलताना त्यांनी गेल्या अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पालघरमधील साधू हत्याकांडाचा वारंवार उल्लेख केला आणि हिंदू समाज या हत्याकांडामुळे प्रक्षुद्ध झाला आहे, तो या निवडणुकीत निश्चित साधूच्या हत्याकांडाचा बदला घेईल, अशी खात्री त्यांनी या वेळी व्यक्त केली.
 पालघर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारसरणीचा खासदार निवडून आला तरच पालघरचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याची हमी आपण घेत आहोत, असे राणे यांनी सांगितले. पण जर दुसऱ्या विचाराचा माणूस खासदार झाला, तर हिंदुत्व धोक्यात येईल आणि विकासासाठी इतरांपुढे हात पसरावे लागतील, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा भक्कम आणि खमका पंतप्रधान तसेच त्यांच्याच विचाराचा खासदार येथे झाला. जर देशात दुसऱ्या विचाराचे सरकार आणि दुसऱ्या विचाराचा खासदार झाला, तर श्रद्धा वालकरसारखी प्रकरणे घरोघरी होतील, असा इशारा राणे यांनी दिला. हे होऊ द्यायचे नसेल, तर पालघर लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे डॉ. सावरा यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.