NC Times

NC Times

मामाच्या मुलीवरुन दोघा भावांमध्ये तुंबळ हाणामारी


नवचैतन्य टाईम्स जळगाव प्रतिनिधी(संजय फरांदे)  नात्यातील मामाच्या मुलीशी कोणी लग्न करायचे यावरून दोन सख्ख्या भावांमध्ये पार एकमेकांचे कपडे फाडेपर्यंत हाणामारी झाल्याचा प्रकार जामनेर (जि. जळगाव) येथे नुकताच घडला. मात्र, मामाच्या मुलीने दोन्ही भावांऐवजी तिसऱ्याचीच पती म्हणून निवड केल्यानंतर दोन्ही भावांना कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली.
नात्यातील भावाची मुलगी असल्याने परराज्यातील महिला आपल्या दोन मुलांसह जामनेरात आली. मामाची मुलगी पसंत पडल्याने मोठ्या भावाने होकार दिला. मात्र, धाकट्या भावालादेखील तीच मुलगी भावली. याच कारणावरून दोघा भावांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत होऊन कपडे फाटेपर्यंत वेळ आली. वाद सोडविल्यावर थेट तरुणीलाच लग्नाबाबत विचारणा करण्यात आली.
 या वेळी मुलीने दोघांपैकी कुणाशीच आपल्याला लग्न करायचे नाही. आपले गल्लीतील एका तरुणावर प्रेम आहे. त्याच्याशी मी लग्न करणार असल्याचे सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मुलीचा निर्णय ऐकून हाणामारी करणाऱ्या दोघा भावांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. मुलीचा निर्णय ऐकून पाहुणी म्हणून आलेली बहीण दोघा मुलांसोबत आपल्या गावाकडे परतली.