NC Times

NC Times

एकनाथ खडसे यांनी यापुढे निवडणूक न लढविण्याचा निर्धार


नवचैतन्य टाईम्स जळगाव प्रतिनिधी(संजय फरांदे)  -जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मी यापुढे निवडणूक लढवणार नाही. मला निवडणूक लढविण्याची इच्छा नाही, अशी घोषणा खडसेंनी केली. आम्ही दिलेली वस्तू परत घेत नाही, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळे मी टर्म संपेपर्यंत विधान परिषदेचा सदस्य असेन, असं खडसे म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेवर गेलेले खडसे गेल्या अनेक आठवड्यांपासून भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. दिल्लीवरुन हिरवा कंदिल मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पण त्यांचा पक्षप्रवेश अद्याप तरी रखडलेलाच आहे.
 मी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देणार नाही. मी राजकीय क्षेत्रातील माणूस आहे. मी राजकीय निवृत्ती घेतलेली नाही. राजकारणात पुढे काहीही होऊ शकते. मात्र आता माझा निवडणूक लढवण्याकडे कल नाही. मला निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, अशी घोषणा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी एका मुलाखतीत केली आहे.
नाथाभाऊंचा भाजप प्रवेश होईल,अशी स्पष्ट भूमिका भाजपचे केंद्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी मांडली आहे. त्यामुळे भाजप प्रवेशाबद्दल मी निश्चिंत आहे. भाजपमध्ये आल्यानंतर मला आणि महाजन दोघांना एकत्रित काम करावंच लागेल. पक्षाच्या हितासाठी काम करण्याचा निर्णय आम्ही दोघे मिळून घेऊ, असं खडसे म्हणाले. माझ्या भाजप प्रवेशाबद्दल गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, देवेंद्र फडणवीस या तिघांचा विरोध नाही. त्यांचे नाराजीचे सूर होते. पण ती नाराजी आता दूर झाली आहे, असं खडसेंनी सांगितलं.
भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यावर मी रोहिणी खडसे यांना भाजपमध्ये येण्यास सांगितलं. होतं. मात्र त्यांनी नकार दिला. आपण शरद पवारंसोबत राहणार असल्याचं तिनं सांगितलं. तिला पुढची निवडणूक लढवायची आहे. तिला तिथे भविष्य दिसतंय. म्हणून ती राष्ट्रवादी शरद पवार गटात राहील. रावेरची निवडणूक जाहीर झाल्यापासून मी भाजपमध्ये प्रवेश करण्याबद्दल सूचित केलं होतं, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.