NC Times

NC Times

सूरज हा मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी लिहितोय पायाने पेपर


नवचैतन्य टाईम्स सोलापूर प्रतिनिधी(विनोद जाधव)-  मनात जिद्द असेल, तर कोणतीही अडचण तुमच्या मार्गातला अडथळा बनू शकत नाही, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सध्या सुरू असलेल्या परीक्षा देणारा सूरज मुजावर हा विद्यार्थी. जन्मत: दोन्ही हात नसलेला हा विद्यार्थी मुक्त विद्यापीठाच्या ‘बीए’च्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेचे पेपर चक्क पायाने लिहित असून, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनीही त्याच्या या जिद्दीला सलाम केला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील पानीव या गावात लहानाचा मोठा झालेला सूरज मुजावर जन्मत: अपंग असून, त्याला दोन्ही हात नाहीत. बारावीपर्यंत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊसाहेब पाटील शाळा व ज्यूनिअर कॉलेजमध्ये त्याने शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर मुक्त विद्यापीठाच्या सोलापूर येथील श्रीराम शिक्षणशास्त्र महिला महाविद्यालयाच्या अभ्यासकेंद्रावर प्रथम वर्ष कला शाखेस त्याने प्रवेश घेतला असून, सध्या तो विद्यापीठाच्या परीक्षा देत आहे.
 प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा
सूरजने आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर परीक्षा केंद्रावर सुंदर अक्षरात चक्क पायाने पेपर लिहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. शेतकरी कुटुंबातील सूरजला एक भाऊ व बहीण असून, ते दोघेही विवाहित आहेत. आपल्या संपूर्ण कुटुंबाचा आपल्या शिक्षणाला आधार असल्याचे सूरज सांगतो. ‘बीए’ पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय सेवेत जाण्याची त्याची इच्छा आहे.
मी लहानपणापासून पायानेच लिहितो. हात नसल्यामुळे लहानपणी माझे सर्व काही घरच्यांनाच करावे लागे. पण, हळूहळू त्यांनी मला स्वावलंबी बनविले. मी माझी सर्व कामे पायाने करतो. आजवर सर्व परीक्षांमध्ये मी पायानेच पेपर लिहिला आहे. हात नसले तरी मला आयुष्यात काही अडचणी येतील, असे मला वाटत नाही.                           - सूरज मुजावर, विद्यार्थी