NC Times

NC Times

घाटनांद्रेत श्री भैरवनाथ देवाची यात्रा उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-'भैरवनाथाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात व गुलाल,खोबर्याच्या उधळणीत व फटाक्यांच्या आतिषबाजीत सुवाद्यसह गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या भव्य अशा पालखी मिरवणूकीने व प्रसाद वाटपाने‌ घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील श्री भैरवनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुवार दिनांक ३० एप्रिल रोजी देवाची बोनी व नैवेद्य पार पडला तर रात्री नऊ वाजता जय मल्हार वाघ्या-मुरळी पार्टी मणेराजुरी (ता.तासगाव) यांचा बहारदार असा वाघ्या-मुरळीचा कार्यक्रम पार पडला तर बुधवार दिनांक १ मे रोजी पहाटे पाच वाजता मोठ्या थाटात श्रीचा विवाह सोहळा संपन्न झाला.सदर दिवसी दिवसभर मंदिर परिसरात भाविकभक्तांनी श्रीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.यावेळी मोठ्या प्रमाणात शोभेच्या दारूची आतिषबाजीही करण्यात आली.
यात्रेनिमित्त मंदिर परिसरात भव्य असा मंडप उभारण्यात आला होता.मंदिर परिसरास केलेली आकर्षक अशी विद्युत रोषणाईही सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.सायंकाळी चार नंतर गावातील प्रमुख मार्गावरून पालखीची मिरवणूक काढण्यात आली.सदर पालखी गावातुन फिरुन नंतर मंदिर परिसरात आल्यानंतर सौभाग्यवती स्त्रियांनी एकमेकींना वाण वाटण्याचा कार्यक्रमही पार पडला तर यात्रेची सांगताही आंबील व प्रसाद वाटपाने‌ करण्यात आली.