NC Times

NC Times

ठाण्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार! शहरप्रमुखांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-कल्याण लोकसभेत उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे. ठाकरे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांच्यासह महिला जिल्हा संघटक कविता गावंड आणि उबाठा गटाचे कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक पुरुषोत्तम (काला) चव्हाण यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. कल्याण लोकसभेत मागील १० वर्षात झालेल्या विकासाने प्रभावित होऊन विकासाची आणि खऱ्या शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय आपण घेतला असून ज्याठिकाणी आपल्या कामाची किंमत होते तिथे आपण आल्याची प्रतिक्रिया यावेळी विवेक खामकर यांनी दिली.                                           कल्याण लोकसभेत एकीकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागील १० वर्षात केलेल्या विक्रमी विकासकामांचे सादरीकरण जनतेसमोर ठेवत जोरदार प्रचार सुरू केला आहे. तर दुसरीकडे आजच ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे हे डोंबिवलीत आले होते. त्यांच्या दौऱ्याला काही तास उलटत नाहीत, तोच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटाचा 'करेक्ट कार्यक्रम' केला. ठाकरे गटाच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी काल  शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, मी नेहमीच करेक्ट कार्यक्रम करतो. पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेत स्वागत करतो. बाळासाहेबांची शिवसेना आणि त्यांच्या विचारांची शिवसेना स्थापन झाल्यावर अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी सर्व सामान्य मुख्यमंत्री म्हणून काम करतोय. सरकारने केलेला विकास हे पाहून लोकं पक्षात येत आहे. फेसबूक लाईव्हवर काम करणारे हे सरकार नाही आहे. निवडणूकांची धुमधाम सुरु आहे. देशभरात महायुती आणि मोदींना लोकं पसंती देत आहेत. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, विरोधकांना बोलायला काहीच उरले नाही म्हणून संविधान बदलणार असे आरोप करत आहेत. लोकशाहीचा खून विरोधकांनी केला आहे. हनुमान चालीसा म्हणाऱ्यांना जेल मध्ये टाकले. कल्याण लोकसभा मतदारसंघ दिवसागणिक मजबूत होत चालला आहे. खासदार श्रीकांत शिंदे केलेले काम पाहून लोकं त्यांना मतदान करतील यांत काही शंका नाही. काम करुन त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. रेकॅार्ड ब्रेक मताधिक्यांनी श्रीकांत शिंदे निवडून येतील. गद्दार हा शब्द विरोधकांना लागू होतो. बाळासाहेबांच्या विचारांना त्यांनी माती दिली आहे. तसेच जनतेच्या मतांशी त्यांनी गद्दारी केली, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.