NC Times

NC Times

अहमदनगर मध्ये जोरदार राडा पैसे वाटल्याच्या आरोपावरुन दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले


नवचैतन्य टाईम्स अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशीय चुरशीची झाले आहेत. प्रचारात दोन्ही बाजूंनी आरोपप्रात्यारोपाच्या फैरी झडल्या. आता प्रत्यक्ष मैदानावरही वाद झाल्याचे पहायला मिळाले. मतदानाच्या आधीच्या रात्री पारनेर तालुक्यात दोन्ही उमेदवारांचे कार्यकर्ते भिडले. एकाकडून पैसे वाटपाचा आरोप केला तर दुसऱ्याने उटल आपल्यालाच लुटल्याची तक्रार केली आहे. यासंबंधीचे गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल आहेत. तर मतदानाच्या दिवशी पाथर्डी तालुक्यात उमेदवारीची प्रचार पत्रके जवळ बाळगताना एका सरकारी कर्मचाऱ्याला पकडण्यात आले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे डॉ. सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांच्यात चुरशीची लढत होत आहे. पारनेर तालुक्यात काल रात्री भाजप तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांना पैसे वाटप करताना पकडल्याचा दावा करण्यात आला. यासंबंधी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अनिल दत्तात्रय गंधाक्ते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राहुल शिंदे त्यांच्या कारमधून पैसे वाटप करीत असल्याची माहिती मिळाली. त्यावर मी त्यांचा पाठलाग सुरु केला होता. त्यावेळी त्यांनी लोक जमवून आपणाला मारहाण केली. यामध्ये वर्षा पांडुरंग गंधाक्ते, पांडुरंग बबनराव गंधाक्ते यांनीही मारहाण झाली आहे, असे फिर्यादित म्हटले असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनास्थळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये रस्त्यावर एक बॅग आणि पैसे पडल्याचे दिसत असून हे पैसे भाजपचे शिंदे यांचे असल्याचा दावा केला जात आहे.
 तर दुसरीकडे भाजपचे शिंदे यांनीही फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, रात्री मी आळकुटी येथे निघालो होतो. वाहनचालक शरद अंबादास सोमवंशी सोबत होतो. त्यावेळी अनिल गंधाक्ते व सोबतच्या चार-पाच जणांनी पाठीमागून येऊन आपल्या गाडीचे काच फोडली. अनिल गंधाक्ते याचे हातात रिव्हॉल्वर होता. त्यावेळी त्यांनी गाडीतील कागदपत्रे खाली फेकत आपल्या गळ्यातील सोन्याची चैनही काढून घेतली. आमच्यावर पैसे वाटपचा आरोप केला. तेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना बोलावून गाडीची तपासणी करण्यास सांगितेल. त्यावेळी गर्दी झाली होती. कोणी तरी पैशाची बॅग रस्त्यावर आणून टाकली व ती माझ्याच गाडीतील असल्याचे सांगू लागले. नंतर गर्दीतील कोणी तरी ती बॅग व पैसे तेथून घेऊन गेले, असेही शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अनिल गंधाक्ते यांसह दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
 रोहित पवार यांचे ट्विट
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. लंके समर्थकांकडून विखे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप केला गेला. याची दखल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही घेतली. त्यांनी तो व्हिडिओ आपल्या सोशल मीडियात पोस्ट केला आहे. त्यासोबत म्हटले आहे की, ‘उत्तरे’तून भरून आलेल्या ढगांमुळे भर उन्हाळ्यात ‘नगर दक्षिणे’त पैशांची धुवांधार बरसात… (पारनेर) अपेक्षा आहे की, या पुरात पोलिस यंत्रणा आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी वाहून न जाता सुरक्षित असतील!’ अशी पोस्ट करत रोहित पवार यांनीही विखे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून येत आहे.