NC Times

NC Times

मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्टमुळे समर्थकांमध्ये संताप


नवचैतन्य टाईम्स छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी ३५ वर्षीय तरुणाने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती. या रागातून जरांगेंच्या समर्थकांनी तरुणाला घरातून बाहेर काढत मारहाण केली आणि पोलीस ठाण्यात नेले. मध्यरात्री बारा वाजताच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
दीपक बद्री नागरे (वय ३५ वर्ष, राहणार मुकुंदवाडी) असे सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की, सोशल मीडियावरती मंगळवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली होती. व्हॉट्सअपवर आलेली ही पोस्ट वेगाने मराठा समाजामध्ये पसरली. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी आक्षेपार्ह मजकूर असल्यामुळे मुकुंदवाडी परिसरामध्ये २०० ते २५० जणांचा जमाव गोळा झाला.
तरुणाला रागातून मारहाण
यावेळी संतप्त नागरिकांनी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाच्या घराची शोधाशोध सुरू केली. मुकुंदवाडी परिसरामध्ये राहणाऱ्या तरुणाला शोधून काढत त्याला घरातून बाहेर काढत मारहाण केली. यावेळी त्याला मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये हजर करण्यात आलं. या प्रकरणी नवनाथ डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक नागरे या तरुणाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे करीत आहेत.
मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित तरुण हा मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेला. त्या ठिकाणी त्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली व त्यांच्यासोबत फोटो काढला. त्यानंतर हा फोटो व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत त्यावरती आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा आरोप आहे. याच रागातून जरांगे समर्थकांनी त्याला मारहाण केल्याचे बोलेल जाते.