NC Times

NC Times

माता न तू वैरिणी, आईकडून अल्पवयीन मुलीची राजस्थानात विक्री, पोलिसांच्या सतर्कतेने डाव उधळला


नवचैतन्य टाईम्स यवतमाळ (प्रतिनिधी)- शहरातील मोमीनपुरा भागात अल्पवयीन मुलीची एक लाखात विक्री केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर राजस्थानातील तरुणाशी तिचं लग्न लावून दिलं. दरम्यान, मुलीला राजस्थान येथे सोडण्यासाठी जाताना शहर पोलिसांनी टोळीतील सहा जणांना ताब्यात घेतलं. ही कारवाई शुक्रवार, ३ मे रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
विक्री केलेल्या अल्पवयीन मुलीला राजस्थानात घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्यातील रावसाहेब शेंडे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर ठाणेदार सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धामणगाव मार्गावर शुक्रवारी नाकाबंदी लावण्यात आली होती. अशात रात्री ८.३० वाजताच्या सुमारास टेम्पो क्रमांक एमएच २९-एम-३७६६ या वाहनाला संशयावरुन थांबवून पोलिसांनी चौकशी केली.
यात चालक अस्लम खा तस्वर खॉ पठाण ३०, रा. गढवा, ता. बाभूळगाव याच्यासह कॅबीनमध्ये बसून असलेले सत्तार मोहमद आणि अब्दूल कमरुदीन या तिघांची विचारपूस केली. त्यावेळी वाहनामधील मागच्या डाल्यात एक महिला, अल्पवयीन मुलगी आणि दोन पुरूष आढळून आले. त्यावरून सर्वांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यावेळी मुलीने पोलिसांसमोर संपूर्ण आपबिती सांगितली. आपण आकोला येथे राहत असल्याचं मुलीने पोलिसांना सांगितलं.
आईनेच तिची एक लाखात राजस्थानात विक्री केल्याचंही तिने सांगितलं. यवतमाळ शहरातील मोमीनपुरा परिसरात राहणारा मामा अन्सार खॉ तस्वर खॉ पठाण यांच्या घरीच मुलीचा विवाह शंकरसिंह सोहनसिंह (२८), रा. तारानगर, जि. चुरू, राजस्थान याच्यासोबत लावून दिल्याची कबुली दिली.
या प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतलं. यात शंकरसिंह सोहनसिंह, सत्तार मोहम्मद बैजीरद्दीन लोहार (४०), रा. तारानगर, जि. चुरू, ताजमोहम्मद बैजीरूद्दीन लोहार (४०), रा. जोगीवाला, जि. हनुमानगड, अब्दूल कमरोद्दीन भडमुंजा (४९), रा. तारानगर, जि. चुरू, अस्लम खा तस्वर खॉ पठाण, ईमत्याजबी सरदार खॉ पठाण (५०), रा. आकोला, अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहे.