NC Times

NC Times

एका शिक्षण महर्षींच्या जीवनाची हकिकत


अनेकांसाठी एक:-निसर्गाच्या माध्यमातून काही विशेष व अलौकिकअसे पुरुष उपजत असतात.अशा उदय पावणाऱ्या व्यक्तीमध्ये कष्ट, प्रयत्न, जिद्द, संघर्ष, निर्धार, दूरदृष्टी, लोकांबद्दलची संवेदनशीलता इ. सद्गुण त्या व्यक्तीच्या वयासोबत विकास पावत असतात. निसर्ग अशा व्यक्तीच्या मनात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक,सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्याबद्दल प्रगत विचारग्रंथी निर्माण करीत असतो. या गोष्टींचा मागमूसही सदर व्यक्तीला नसतो. कोठून तरी एक अमूर्त शक्तीचा प्रवाह त्यांना कधीच स्वस्त बसू देत नाही. अखंड कार्यरत असणे हे त्यांच्या जीवनाचे सूत्र बनते. या बाबीचा पुढे काळाची गरज म्हणून विशिष्ट प्रकारची संघटना किंवा शिक्षणसंस्था उभी करण्यात मदत होते. श्री तानाजी बाबर यांचा उपयोग निसर्गाने अनेकांसाठी एक असाच केला आहे.
परंपरागत वारसा:-वाई 
तालुक्यातील किकली या गावाला सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक तसाच राष्ट्रभक्तीचा वारसा परंपरागत आहे.मानाजी बाबर याने ब्रिटिशांच्या विरुद्ध बंड करुन ते पत्री सरकारला साह्य करीत होते. त्यास पकडण्यास वारंट जारी करण्यात आले. परंतु किकली सभोवतालचा परिसर डोंगराळ व वनश्रीयुक्त असल्याने तो त्यांच्या हाती लागत नव्हता. पुढे स्वकीयांच्या बंद फितुरी मुळे मानाजी बाबर पकडले गेले. ब्रिटिशांनी त्यांना गेंडामाळावर तोफेच्या तोंडी दिले.रक्ताच्या थारोळ्यात गेंडामाळ लाल झाला इकडे सातारा जिल्ह्यातील किकली गावाला एक इतिहास प्राप्त झाला. गावाशेजारचे चंदन वंदन गड सख्या बंधु प्रेमाने शिवप्रभुंच्या विरहाने व्याकुळ होऊन बसलेले दिसतात. मोगलांच्या आक्रमणात हातोडी व लोखंडी घणाचे घाव सहन करीत शिल्पकलेचा व स्थापत्य शास्त्राचा अजब व अलौकिक नमुना म्हणून 
श्री भैरवनाथाचे मंदीर कळसावरील निळे आकाश सांभाळून आज सुध्दा तोल सावरुन उभे आहे. कर्मवीरांच्या आदर्श तत्व प्रणालीवर व त्यांच्या शैक्षणिक धोरणावर आधुनिक काळात स्वत:चा एक वेगळाच ठसा उमटवणारे श्री तानाजी बाबर हे सुध्दा दुसरे वैभव आहे. या वैभवसंपन्न शिखराची उंचीकमी असली तरी त्यांच्यातील आदम्य आत्मविश्वासाचा मनोरा मात्र उत्तुंग आहे, मुंगीपासून प्रेरणा घेऊन अखंड कार्यमग्न असणे हा त्याचा मुळ स्वभाव होता.
जन्म व मातृवियोग:-वरील पार्श्वभूमीवर सरांचा उदय 
डोंगराळ परिसरातील किकली या गावी पळस गंगेच्या काठी निवास करुन असणारे वडील खाशाबा व मातोश्री गुणाबाई या धार्मिक दांपत्याच्या पोटी ८  एप्रिल१९४०मध्ये झाला. प्रेमळ आईवडिलांच्या सहवासात त्यांचे जीवन स्वच्छंदी फुलपाखराच्या चालीने पुढे सरकत असताना मातोश्री गुणाबाईंचे देहावसान घडून आले. त्यावेळी सर फक्त चार वर्षांचे  होते. न कळणाऱ्या वयातच सर आईच्या प्रेमाला पारखे झाले.त्यांचे थोरले बंधू शिवाजीराव पत्नी चंद्रभागा यांनी मातृवियोगाची जागा भरून काढली होती. 
बालपण व काही छंद:-सरांचे एम प्राथमिक शिक्षण हे 
पहिली ते सातवी पर्यंत किकली या खेडेगावात झाले. त्या काळात त्यांचे वडील मुंबईला होते.घरची परिस्थिती गरिबीची असल्याने मित्रांच्या पुस्तकावरचअभ्यास केला. गणित हा विषय त्यांचा आवडता झाला. शिक्षकांनी सांगितलेले अवघड गणित ते चुटकीसरशी सोडवत होते. त्यामुळे श्री ध.पा.जाधव या वर्गशिक्षकांचे आवडते विद्यार्थी बनले. ते वर्गाचे प्रतिनिधित्व करु लागले. जयंती किंवा पुण्यतिथीच्या कार्यक्रमात ते भाग घेऊन उत्कृष्टपणे भाषण केल्याच्या आठवणी ते अजुनही सांगतात.पळस गंगेच्या तीरावर त्यांचे मित्र मंडळ पाठशिवणीचा व कबड्डी हा खेळ मनमुराद खेळत होते. एकूण विद्यार्थी दशेत तेअत्यंत चपळ व खिलाडूवृत्तीचे होते. मित्रांच्या सहवासात ते खूप बोलके बनत. कबड्डी खेळण्याची त्यांची आवड पक्की आहे. आपण एका संस्थेचे सचिव व जागृती विद्यालयाचे प्राचार्य पदी आहोत या गोष्टीचा विचार बऱ्याच वेळा त्यांच्या जमेस नसतो.शालेय मैदानावर नववी विरुद्ध दहावीच्या मुलां सोबत सर एका पक्षाच्या बाजूने खेळतात. अत्यंत चपळपणे उड्या मारत सीमारेषा पार करुन, पलिकडील गडी बाद करून येताना त्यांच्यातील खेळकरपणा माझ्या लक्षात आला. लहान वयात त्यांना गाईगुरे, मांजरे, कुत्रे मनापासून आवडत होते. रानावनातील काट्याकुट्यांतुन पाणंदीतुन, ओढ्यातून त्यांचे सवंगडी खेकडे मासे पकडण्यासाठी भटकंती करीत तेव्हा आवडता कुत्रा त्यांच्या मागे सतत असायचा.सायंकाळी जेवणखाण करताना सर नेहमी कुत्र्याला भाकरी व दुधाचा काला स्वहस्ते कुस्करून देत. या गोष्टीचा खरे कौतुक त्यांचे मधले बंधू धनाजीराव यांनी खास शब्दात केले आहे. "आमच्या तान्याला कुत्र्याचा भारी लळा हाय"गाईगुरे यांना ते स्वच्छ घासून पुसुन ठेवणे हा उद्योग ते बालवयात करीत होते. गुरांच्या गोठ्यात शिरल्यावर हातामध्ये खराटा घेऊन सफाईला सुरवात करीत कुत्र्याला आपला धनी नसल्याचे दु:ख होई. अन्नाला तो प्राणी शिवत देखील नसे. भरलेल्या बैठकीतून ते वाईला राहत्या घरी फोनवर मुक्या जीवाची चौकशी करतात. मुक्या जीवावर प्रेम करणाऱ्या सरांच्या बंगल्यासमोर गेटवर कुत्र्यापासून सावध रहा असाआधुनिक बोर्ड नाही. वाई येथील सरांच्या बंगल्यावर सतत येणाऱ्या व जाणाऱ्या व्यक्तिंना बरोबर ओळखतो. बालवयात सरांची स्मरणशक्ती अत्यंत संवेदनशील होती. थोरांची ओळख या पुस्तकातील रकानेच्या रकाने त्यांचे मुखोद्गत होते. वार्षिक वितरण समारंभाचे वेळी सर भाषणाला उठले की, संपूर्ण सभेचे लक्ष एक होई. संभाषण हेअभिनयातून व्यक्त होई. टाळ्यांच्या गजरात ही बटु मूर्ती व्यासपीठावरुन उतरताना कदाचित अध्यक्षांना मुलाचे पाय पाळण्यात दिसले असतील.
द्रविड हायस्कूल वाई:- 
पुरातन काळापासून वाई शहराच्या संस्कृती विषयी परंपरा गाजत आहे. या परंपरेचा वारसा श्री सद्गुरु केवलानंद स्वामी सरस्वती यांच्या समाधीतून व लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या आंतरिक विचार वैभवातून प्रवास करीत आहे. संस्कृत भाषेचे व अध्ययनाचे माहेरघर म्हणून वाई प्रसिध्दीस आली. भक्ती व आध्यात्मिक संगम या तीर्थक्षेत्रात निरनिराळ्या उत्सवातून नजरेस भरतो. सरांचे माध्यमिक शिक्षण हे द्रविड हायस्कूल येथ वाई येथे झाले. त्यांचे ज्येष्ठ बंधू शिवाजीराव यांनी जेवणाची व निवासाची सोयही वसंतराव बोराटे यांचे घरी केली. त्यावेळी सरांच्यासोबत वर्गातील मित्र श्री. गजानन बाबर हे सध्याआमदार आहेत.श्री लक्ष्मण बाबर हे प्रशासकीय अधिकारी आहेत.श्री भिकोबा बाबर हे इंजिनिअरींग काॅलेजवर प्राध्यापक आहेत. तर श्री डी. जी! महानवर हे कोरेगाव काॅलेजवर प्राचार्य आहेत.सर्व मित्रमंडळी ही विद्यार्थी दशेत गरीब होती. प्रसंगी जळणाच्या  मोळ्या विकून आलेल्या पैशातून पुस्तके विकत घेऊन शिकलेली आहेत. साताऱ्यातून सरांनी "प्री डिग्रीचा" कोर्स पूर्ण केला. सातारा येथील काॅलेज मधून बी कॉमची पदवी संपादन करून पुढील वर्षी ते बीएड साठी इस्लामपूरला रवाना झाले. त्यावेळी रहाणी साधी होती. पांढरा लेंगा व पांढरा शर्ट परिधान करत होते.
बुध्दीसामर्थ्य:- एकपाटी व अलौकिक बुद्धिमत्ता असल्याने अकाउंटमधील गणिते सोडवत तेव्हा बाकीचा वर्ग खडबडून जागा होई. गुटगुटीत शरीरयष्टी, प्रसंन्न व जिज्ञासू चेहरा, डोईवर मधोमध भांग पाडलेला मुक्त केशकलाप, व ओठावर फुटलेली मिसरुड,एकंदर साज हा लाथ मारीन तिथं पाणी काढीनअशा स्वरुपाचा होता. आंग्ल विद्येवर जबरदस्त प्रभुत्व होते. इंग्रजी साहित्यातील कथा, कादंबरी व काव्यात ते रंगून जात होते. तळदेव शाळेला भेट देण्यासाठी ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड मधून काही परकीय पाहुण्यांचे आगमन घडते बाबर सरांच्या समवेत सर्वजन इंग्रजीतूनच बातचीत करत असतात. तेव्हा बाबर सरांचे अत्यंत प्रभावी व सफाईदारपणे इंग्रजी भाषा अनेकांनी ऐकलेली असेल.
जीवनातील दोन शिखरे:- डॉ. पंडीत टापरे हे सरांना इस्लामपूरमध्ये भेटलेले मित्र आहेत. त्यांच्या सुह्दयी, सज्जन व सहनशील व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव सरांच्या जीवनावर कायम झाला. दोघेही एकमेकांच्या सहवासाने व ध्येयाने भारावून गेले. मराठी साहित्याची गोडी डॉ. टापरे यांच्या सहवासात सरांनी अनुभवली. तेथूनच मराठी साहित्याविषयी ओढ सरांच्या मनात घर करुन बसली. माझ्या मते डॉ. टापरे सर हे पुंड्या उसासारखे गोड व प्रेमळ असे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या वाणीत मराठी भाषेचे ज्ञान एकवटलेलेआहे. मुक बधीर व मतीमंद मुलांसाठी धडपडून शाळा चालविणारे संवेदनशील असे कृष्णाकाठचे पवित्र विचार वैभव आहे.शिवाजी काॅलेज सातारा येथे श्री नसिराबादकरांच्या अध्यापनाचा संस्कार सरांच्या मनावर कायम झाला. मराठी भाषेचे व साहित्याचे ते माहेर घर होते. पवनाकाठचा धोंडी ही कादंबरी शिकवीत असताना ते विद्यार्थ्यांच्या मनात भाव जागृती करीत. दु:खाच्या प्रसंगाचे वर्णन करताना ते स्वतःभावना विवश होऊन प्रसंग वर्णन करीत. परिणामी वर्गातील विद्यार्थी भाव जागृती हुंदके अनावर झाल्याने वर्गाच्या बाहेर जाऊन अश्रूपात करीत. बाबर सरांची ही अवस्था तशीच होत असे.
श्री भैरवनाथाची कृपा:- सालाबाद प्रमाणे किकलीची 
यात्रा प्रत्येक वर्षी भरत असते. पाहुण्यांचे आगत स्वागत घडते. भोजनाच्या पंगती उठतात. भैरवनाथाचे नावे चांगभले करीत दर्शनासाठी तरसतात.या भक्त भाविकांच्या गर्दीमध्ये आरफळचे श्री उत्तमराव पवार हे आजोळीला यात्रेनिमित्त आले होते.सरांच्या बद्दल पवार यांच्या मनात एक वेगळेच द्वंद्व सुरु झाले होते. कठीण परिस्थितीवर मात करुन आपले अस्तित्व रोखून धरणाऱ्यांना अनमोल हिरा सापडला होता. टाकेल त्या ठिकाणी आपल्या कार्य व कर्तृत्वाचे क्षितिज निर्माण करणारा त्यांना प्रयत्नवादी माणूस सापडला होता. त्यांनी सरांना महाबळेश्वर. तळदेव शाळेचा वृतांत व बिकट परिस्थिती समजावून सांगितली. बाबर सर क्षणभर चमकले. भैरवनाथाचे मनात काय होते कोण जाणे?  आपल्या मित्रांचा सल्ला शिरोधार्य मानून महाबळेश्वर तळदेवच्या परिसरात जाण्यासाठी  मानसिक तयारी सुरु केली होती.
सरांची पहिली मुलाखत:- दुसऱ्या दिवशी श्री फळणे गुरुजींनी महाबळेश्वर मधील गुरुदत्त सायकल मार्ट या दुकानात बसून सरांची मुलाखत घेतली. पंचायत समिती महाबळेश्वर येथे नोकरी निमित्त असणारे उत्तमराव पवार हेही सोबत होते. सुरुवातीला श्री फळणे गुरुजींनी शाळा व संस्थेतील अनेक अडचणी, जेवणाची अनास्था, मिळणारे अपूर्ण वेतन, भौगोलिक विचित्र वातावरण, अडाणी व निरक्षर समाजाची शिक्षणा विषयीची असणारी अनास्था व अंधश्रध्दा कथन केल्या. त्या सर्व ऐकून घेवून माझी जाण्याची तयारी आहे. असे सरांनी सांगितल्यावर फळणे गुरुजींचे प्रश्न विचारणे थांबले. व तेथेच ऑर्डर देऊन जाण्यासाठी अनुमती व मनपूर्वक उत्तेजन दिले.
तळदेवच्या दिशेने सरांचा प्रवास:- झाडा झुडपांनी गजबजलेल्या जंगलातील सर्व रस्ते खाच खळग्यांनी व्यापले होते. पावसाळ्यातील पाण्याच्या प्रवाहाने त्यांचे अस्तित्व ही जाणवत नव्हते. एकट्याने प्रवास करणे अत्यंत धोकादायक होते. महाबळेश्वर ते तळदेवच्या दिशेने खेकडा नावाचे एकच वाहन अस्तित्वात होते. दुधाच्या किटल्या दारु पिऊन तर्र झालेली माणसे स्त्रीया, मुले व अनेक प्रवाशांनी ते वाहन खचाखच भरुन गेले होते. त्यातच बाबर सर हातामध्ये घेऊन वर चढण्यासाठी प्रयत्न करत असताना पाठी मागून चढणाऱ्या प्रवाशांपैकी काहींनी सरांच्या डोक्यावर पाठीवर पाय ठेऊन गाडीत घुसत होते. सरांना ते आवडले नाही. ते उदास मनाने माघारी फिरले. श्री उत्तम पवार यांनी समजूत घालून दुसऱ्या दिवशी सकाळी स्वत:ची सायकल प्रवासासाठी दिली. तळदेवला लाल तांबुस मातीत सरांचे पहिले पाऊल पडले. निसर्गरम्य वनश्री, पांढरे शुभ्र घनदाट धुके पाहून सरांचा थकवा आपोआप नाहीसा झाला. सर तळदेवला आले ती एक त्या काळाची गरज होती. कारण बंद पडत असलेल्या शाळेला नवसंजीवनी मिळणार होती.
कौटुंबिक जीवन:- 
७जुलै १९७१ मध्येसरांचा विवाह प्रेमलता यांच्याशी झाला. निसर्गरम्य तळदेवच्या साक्षीने त्यांच्या संसाराला सुरुवात झाली. यथावकाश संसार वेलीवर दोन फुले उमलली.थोरला चि. किरण व धाकटा चि. रणजितही दोन अपत्ये होत. त्यांच्या संसाराची साक्ष भांडीकुंडी व लाकडी खाट खोलीमध्ये तळदेवला अजूनही पहावयास मिळते. बालगोपालांनी भरलेल्या संसारातून प्रेमलता ताई काळाच्या ओघात संसाराचा अर्ध्यावरच डाव सोडून सरांची अखेरपर्यंत वाट पहात स्वर्गवासी झाल्या. अनेक बाहेर गावाचे दौरे करणाऱ्या सरांनी पत्नी वियोगाचे दु:ख मूकपणे सहन केले.
सरांचे शालेय व्यवस्थापनातील यश:-  सरांचे शालेय कामकाज हे अत्यंत व्यवस्थित व नियोजन बध्द होते. कोणाच्याही कागद पत्रावर सही ते लगेच करीत नाहीत. वाचन केल्यानंतरच निर्णय घेतात. विभिन्न स्वभावाच्या शिक्षकांची गुणग्राहकता कोणती आहे हे ते बरोबर ओळखत. एखाद्या वेळी चुकून शिक्षक वर्गावर गेले नसतील तर सर स्वतः तो वर्ग अध्यापनात घेत. त्यामुळे वर्गावर वेळेत न येणाऱ्या शिक्षकांची धांदल उडे. सरांच्या नुसत्या हसण्याने शिक्षकांना आपली चूक समजून येई. दुसऱ्यांनी ऐकून सर कधीच गढूळ होत नाहीत. कोणाच्याही सांगोवांगीवर प्रशासन अवलंबून नव्हते. तर त्यांचे स्वतःचे असे खास प्रशासन होते.
संचालक मंडळाचा विश्वास:-
अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत अंगमेहनत घेऊन त्यांचे शिक्षक पथक तळदेव पंचक्रोशीत पायी भटकंती करीत पालकांच्या भेटी घेण्यास यशस्वी झाले. शिक्षणाचे महत्व पटवून दिल्याने शाळेचा पट कासवाच्या गतीने वाढू लागला. यथावकाश दहावीची बॅच सुरु झाली. प्रतीवर्षी दहावीचा निकाल १००टक्के पर्यंत नेला. त्या काळात मैदानी प्रदेशातील शाळांचा बहुतांशी निकाल पडला होता. शिक्षण संचालक श्री व्ही. व्ही चिपळूणकर यांनी या घटनेची नोंद घेतली. सर्व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापकांची मिटींग कन्या शाळा वाई येथे बाल आनंद मेळावा या सदराखाली भरवली होती. त्यावेळी त्यांनी अनुकूल परिस्थिती असताना मैदानी शाळांचा १०० टक्के निकाल का लागत नाही? तर डोंगराळ दुर्गम अतिदुर्गम भागातील शाळांचा निकाल १००टक्के लागतो. म्हणून तळदेव शाळेचा उल्लेख करुन श्री बाबर सरांचा त्यांनी उल्लेख करुन गौरव केला. बंद पडत असलेल्या शाळेला चांगली कीर्ती मिळवून देणारा प्रयत्नवादी माणूस मिळाला म्हणून श्री एम आर भिलारे.व सर्व संचालक मंडळ प्रभावित झाले. त्यांनी सरांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती करुन सर्व निर्णय अधिकार देऊ केले. 
विद्यार्थी हीच संपत्ती:- ग्रामीण परिसरातील मुले येथे शिकायला येतात. त्यांच्या राहण्याच्या व जेवणाच्या व्यवस्थेवर त्यांचे बारीक लक्ष होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी हीच खरी संपत्ती असे त्यांचे खास मत होते. मुलांचे संस्कारशील जीवन घडवणे हाच खरा कार्यानुभव होता. योगाचे शिक्षण व मुद्रा प्रकार सर स्वतःशिकवत असताना अनेक विनोद निर्माण होत होते.याच विनोदाच्या सहाय्याने आजवरचे दु:ख सरांनी पचवलेले आहे. आदंम्य आत्मविश्वासाच्या बळावर तळदेव, कुंभरोशी, वाघावळे,तापोळा, दादवडी, सायगाव व सावली येथे शिक्षण शाखा उघडल्या.
कार्य आणि कर्तृत्व:- डोंगराळ भागातील पालकांना जागृत करण्यासाठी सरांनी दारूबंदी, व्यसनमुक्ती,अंधश्रद्धा निर्मूलन व ग्रामसफाईला महत्त्व दिले. या त्यांच्या सामाजिक कार्याची नोंद वेळोवेळी दैनिक ऐक्य व पुढारी या वृत्तपत्राने घेतलेली आहे. शिक्षणा पासून वंचित रहाणारी गोरगरिबांची मुले डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, देवभक्त व सामाजिक कार्यकर्ते करण्यात सरांची मुळ प्रेरणा कार्यरत आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पुणे, धुळे, सांगली या आकाशवाणी केंद्रावर अनेकदा मुलाखती दिलेल्या आहेत. प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ श्री प्र. ल. गावडे यांनी या कार्याची 
ओळख जगाला व्हावी म्हणून एक लेख दैनिक सकाळमध्ये लिहिला. केंद्रशासनाच्या प्रसिद्धी विभागामार्फत आदर्श शिक्षक म्हणून निवड होऊन त्यांचे आंध्र,कर्नाटक,               तामिळनाडू ,केरळ या राज्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी    
निवड करण्यात आली. सरांच्या शिक्षण क्षेत्रातील धडपडीमुळे प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ माधुरीबेन शहा यांनी वल्ड  एज्युकेशन फेलोशिप देऊन त्यांना त्या संघटनेचे सभासद बनवले. ३४व्या आंतरराष्ट्रीय साहित्य शैक्षणिक परिषदेत ऑस्ट्रेलिया येथे हजर रहाण्याची संधी दिली. पु. ल. देशपांडे यांच्या सारख्या प्रसिद्ध साहित्यिकाने त्यांच्या कामाची जवळून पहाणी करुनअनेक वेळा गौरव केला आहे. शाळा भेटीच्या वेळी किंवा शाळा तपासणी वेळी अनेक अधिकाऱ्यांनी दिलेल्या शेऱ्यावरुन श्री बाबर सर हे उत्तम शिक्षक,उत्तम मुख्याध्यापक व उत्तम प्रशासक असल्याचे दिसून येत आहे. संस्थेला सेवाभावी वृत्तीने झपाटलेला , शिक्षण क्षेत्राला वाहून घेणाऱ्या ध्येयवादी शिक्षकाची गरज होती. अशी व्यक्ती श्री बाबर सरांचे रुपाने संस्थेस मिळाली.ज्या परिसरात एक सुध्दा मुलगा किंवा मुलगी शाळा शिकू शकली नसती. त्या दुर्गम आदिवासी क्षेत्रात आज एकच नव्हे तर आठ माध्यमिक शाळातून शेकडो विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे उत्तम कार्य चालू आहे.                   नेमणुकी पासून आज पावेतो त्यांच्या सेवाकाळात चारित्र्य
शुध्द व आचरण पवित्र आहे. 
""""" प्रा.संभाजी लावंड.वाई.""""""