NC Times

NC Times

मुंबईची लेक ठरली देशातील सर्वांत तरुण 'एव्हरेस्टवीर'


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)- मुंबईतील नौदल शाळेत शिकलेल्या काम्या कार्तिकेयन हिने एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम केला आहे. १६ वर्षीय काम्या ही नेपाळच्या बाजूने हे शिखर सर करणारी देशातील सर्वांत तरुण गिर्यारोहक ठरली आहे. तिने याआधी अन्य तीन विक्रमही स्वत:च्या नावावर कोरले असून ती राष्ट्रीय बाल पुरस्कारानेदेखील सन्मानीत झालेली आहे.
 कुलाब्यातील नौदल शाळेत शिकलेली काम्या ही वयाच्या सातव्या वर्षापासून गिरीशिखरांवर गिर्यारोहण करीत आहे. वयाच्या सातव्या वर्षी तिने १२ हजार फुटांना, तर १४व्या वर्षी १९ हजार ०८८ फुटांच्या शिखराला गवसणी घातली होती. यादरम्यान तिने १५ अवघड गिर्यारोहण मोहिमा फत्ते केल्या. दक्षिण अमेरिकेतील माऊंट अकॉनगुआ (२२ हजार ८३७ फूट) सर करणारी सर्वांत तरुण गिर्यारोहक, टांझानियातील माऊंट किलीमांजारो (१८ हजार ६५२ फूट) सर करणारी आशियातील दुसरी सर्वांत तरुण गिर्यारोहक व रशियातील माऊंट एलब्रस (१८ हजार ५१० फूट) या शिखरावरून पॅराशूटने उडी घेणारी जगातील सर्वांत तरुण मुलगी, हे विक्रम काम्याच्या नावावर जमा आहेत. अलास्कातील माऊंट डेनाली हे २० हजार ३०८ फूट उंचीचे शिखरही तिने दोन वर्षांपूर्वी यशस्वीरित्या सर केले आहे. यानंतर ती माऊंट एव्हरेस्टची तयारी करीत होती. त्यातही तिने यश मिळवले आहे.
माऊंट एव्हरेस्टच्या यशस्वी चढाईनंतर आता काम्याने सातपैकी सहा खंडांतील सर्वाधिक उंच शिखरांना गवसणी घालण्यात यश मिळवले आहे. येत्या डिसेंबर महिन्यात ती अंटार्टिका येथील ‘माऊंट विन्सन मासिफ’ या १६ हजार फूट उंचीच्या शिखर मोहिमेवर निघणार आहे. ते शिखर सर केल्यानंतर सातही खंडांतील शिखर फत्ते करणारी सर्वाधिक तरुण गिर्यारोहक हा सन्मान तिला मिळेल. त्या ध्येयासाठी ती आता सराव सुरू करणार आहे. काम्याचे वडील कमांडर एस. कार्तिकेयन हे स्वत: गिर्यारोहक आहेत. तसेच तिला या साहसी मोहिमांसाठी तयार करण्यात तिची आई लावण्या कार्तिकेयन यांचे विशेष मार्गदर्शन आहे. लावण्या या नौदल शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत.
पणजी कसोटी पाहणारे दिव्यांगत्व, हाडे गोठवणारी थंडी आणि आरोग्याच्या समस्या या सर्व अडचणींवर मात करून तिनकेश कौशिक या ३० वर्षीय दिव्यांग तरुणाने एव्हरेस्ट बेसकॅम्पपर्यंतची मोहीम नुकतीच यशस्वीरीत्या पूर्ण केली. तब्बल एक आठवड्यांच्या कठीण प्रवासानंतर, ११ मे रोजी तो बेसकॅम्पवर पोहोचला आणि त्याने तिथे भारताचा तिरंगा फडकावला. मूळचा हरयाणाचा असलेल्या कौशिकला तो नऊ वर्षांचा असताना विजेच्या धक्क्यामुळे दोन्ही पायांचा गुडघ्याखालचा भाग तसेच एक हात गमवावा लागला आहे.