NC Times

NC Times

वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मुलाने रांगोळी, पणत्या, आकाश कंदील विकून दहावीत नेत्रदीप यश


नवचैतन्य टाईम्स कोल्हापूर प्रतिनिधी(सुहास कुडाळ)-  ऐन दहावीत वडिलांचे छत्र हरवले. संसाराचा भार एकट्या आईच्या खांद्यावर आले. आईनेही मुलांचे तोंड बघत आलेल्या परिस्थितीला सामोरे जात रात्रंदिवस शिलाई मशीनवर काम करू लागली. जेमतेम पैशात संसाराचा गाडा ओढत मुलाला शिक्षणासाठी पाठबळ दिले आणि मुलाने ही आईच्या कष्टाची जाणीव ठेवत दहावीच्या परीक्षेत तब्बल 93.40 टक्के गुण घेत विजयाचा पताका फडकवला आहे. ही गोष्ट आहे विराज विजय डकरे याची. विराजने परीक्षेत मिळवलेल्या या घवघवीत विजयाने केवळ आईनेच नाही तर संपूर्ण कॉलनीने आनंद साजरा केला आहे.
 कोल्हापुरातील रामानंद नगर परिसरातील गुरुकृपा कॉलनी येथे गेल्या 10 वर्षांपासून डकरे कुटुंब राहत. घरातील परिस्थिती अत्यंत हालाकीची, मात्र तरीही विराज चे वडील विजय डकरे यांचा स्वप्न आपल्या मुलांना भरपूर शिकवून मोठ अधिकारी करायच होत. त्यासाठी वडील विजय डकरे रात्रंदिवस कष्ट करत मुलांना चांगल्या शाळेत शिकवत होते. सर्व काही व्यवस्थित सुरू होत. विराज देखील नववी उत्तीर्ण होऊन दहावीत प्रवेश घेतला होता. मात्र अचानक काळाने घाला घातला आणि विराजच्या डोक्यावरील वडिलांचं छत्र हरवले. वडील विजय डकरे यांच ऑक्टोबर 2023 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. यावेळी विराज दहावीत जाऊन तीन महिने झाले होते. विराज आणि त्याच्या आई व बहिणीवर कोसळलेल्या या संकटामुळे त्यांच्यासमोर सर्वकाही काळोख दिसत होता.
मात्र आईने लेकरांच तोंड बघून जिद्दीने उभे राहत संसाराचा गाडा ओढून न्यायच ठरवले. आई रंजना डकरे रात्रंदिवस शिलाई मशीनवर शिवणकाम करण्यास सुरू केले. 140 रुपये एका कपड्याच्या मागे त्यांना मिळत होते. महिन्याला चार साडेचार हजार रुपयात आई घर कशीबशी चालवत होती. विराज दहावीला गेला होता त्याच्या शिक्षणासाठी पैसे अपुरे पडत होते. विराज अभ्यासात हुशार होता. यामुळे तो सुट्टीदिवशी दिवसा आपल्या आईला हातभार लागावा यासाठी घरोघरी फिरून रांगोळी विकायचा, दिवाळीच्या सुट्टीत त्याने आकाश कंदील आणि पणत्या देखील विकले मात्र जिद्द त्याने सोडली नाही. तो सुट्टीत दिवसा काम करायचा रात्री अभ्यास करायचा तर अशा काळात संपूर्ण कॉलनीने आपल लेकरू म्हणून त्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले. शाळेतील मुख्याध्यापकांपासून ते क्लास मधील शिक्षकांपर्यंत विराजला आर्थिक बाजूने उचलून धरले, मुख्याध्यापकांनी परीक्षा फी भरली तर क्लास मधील शिक्षकांनी फी माफ केली.
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ आल्या होत्या आणि अवघ्या एक महिना आधी विराजने सर्व काम सोडून मन लावून जिद्द आणि चिकाटीने रात्रंदिवस अभ्यास केले आणि या सर्वांचे त्याला मिळालेले सहकार्य आणि धीर या मदतीवर विराजने दहावीत तब्बल 93.40% गुण घेत विजय झाला. आईने केलेल्या कष्टाचे त्याने चीज केले. निकाल लागतात आईच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले संपूर्ण कॉलनीने त्याला खांद्यावर घेत जल्लोष साजरी केला एकमेकांना पेढे भरवले गेले आणि सर्वात तर चर्चा होती आईच्या कष्टाचे पोराने हित केलं तर अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. विराजला पुढे जाऊन मरीन इंजिनियर व्हायचे आहे, यासाठी तो आत्तापासूनच अभ्यासाला लागला आहे.
असे म्हटले जाते की दहावी आणि बारावीचे वर्ष हे आयुष्याला नवीन वळण देणार असते, मात्र याच वळणावर विराजसमोर आलेल्या या संघर्षासोबत त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केलेला सामना आणि मिळवलेले हे घवघवीत यश खरंच कौतुकास्पद आहे