NC Times

NC Times

हिंदू विवाह कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे प्रतिपादन, धार्मिक विधींशिवाय विवाहास मान्यता नाही


 ‘लग्न म्हणजे गाणी व नाच नाही आणि जिंका व जेवण करा किंवा व्यावसायिक व्यवहार नाही. हिंदू विवाह कायद्यानुसार सप्तपदीसारखे धार्मिक विधी झाले नसल्यास त्या विवाहाला मान्यता देणार नाही,’ असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदविले आहे.
व्यवसायाने पायलट असलेल्या दाम्पत्याने धार्मिक विधींशिवाय घटस्फोटाची मागणी करणारी याचिका केली आहे. त्यावर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्न आणि न्या. ऑगस्टिन जॉर्च यांच्या खंडपीठाने निरीक्षण नोंदवले. ‘हिंदू विवाह हा संस्कार आहे आणि धार्मिक विधी आहेत. भारतीय समाजात या विवाहसंस्थेला मोठी मान्यता आहे. ती जपली पाहिजे. तरुणांनी विवाह करण्यापूर्वी विवाहसंस्थेचा खोलवर विचार केला पाहिजे. ही विवाहसंस्था कशी जपता येईल याचाही विचार केला पाहिजे.
 लग्न म्हणजे गाणे आणि नाच किंवा जिंका आणि जेवण करा; अथवा हुंडा, भेटवस्तूंची मागणी करण्याचा हा प्रसंग नव्हे. लग्न म्हणजे व्यावसायिक व्यवहारही नाही. महिला आणि पुरुष यांच्यात नाते निर्माण करण्याचा लग्न हा पाया आहे. त्यानंतर त्यांच्या पती-पत्नीचे नाते निर्माण होऊन भविष्यात कुटुंबाची निर्मिती होते. भारतीय समाजाचा हा पाया आहे,’ असेही खंडपीठाने म्हटले आहे.
 विवाहाद्वारे पती-पत्नीचा दर्जा मिळवणाऱ्या या परंपरेचे आपण अवमूल्यन करीत आहोत. हिंदू विवाह कायद्यातील तरतुदींनुसार वैध विवाह विधी न करता विवाह केले जात आहेत. या प्रकरणातही विवाह संस्कार नंतर करण्यात आले आहेत. जोवर हिंदू विवाह कायद्यानुसार सप्तपदीसारखे धार्मिक संस्कार होत नाहीत, तोवर अशा विवाहाला मान्यता देता येणार नाही, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.
या प्रकरणात खंडपीठाने कायद्यानुसार विवाह झाला नसल्याचे सांगून त्यांची विवाह प्रमाणपत्रही रद्दबातल केले आणि त्यांनी दाखल केलेली घटस्फोट याचिका व हुंडाप्रकरणी पती व त्याच्या कुटुंबीयांविरुद्ध दाखल केलेला गुन्हा रद्द केला.