NC Times

NC Times

सुट्ट्यांसाठी-कर्तव्यासाठी 'देवाणघेवाण' होत असल्याचा आरोप


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)-  मुंबई पोलिस दलामध्ये सध्या एक पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. खळबळ उडवणाऱ्या या पोस्टमध्ये मुंबई पोलिसांचा अविभाज्य भाग असलेल्या सशस्त्र दलाच्या कारभाराची पोलखोल करण्यात आली आहे. एकीकडे मुंबई पोलिस दलामध्ये मनुष्यबळाची कमतरता असताना या विभागातील पोलिस कशाप्रकारे ‘सेंटिंग सुट्ट्या’ घेतात याचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. तब्बल दहा हजार पोलिस असलेल्या या विभागातील सुमारे ३० टक्के पोलिस कायम सुट्टीवर असतात, असा दावा या पोस्टमध्ये आहे. वरिष्ठांची ‘आर्थिक मर्जी’ राखत हा सर्व कारभार सुरू आहे. पोस्टमधील मजकुराबाबत अधिकृत दुजोरा कुणी देत नसले तरी ही वस्तुस्थिती असल्याचे मुंबई पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी खासगीत सांगतात.
मुंबई पोलिस दलातील सशस्त्र विभागात नायगाव, ताडदेव, वरळी आणि मरोळ ही चार मुख्यालये असून या चारही मुख्यालयांना प्रत्येकी एक उपायुक्त आहेत. या उपायुक्तांच्या देखरेखीखाली या विभागाचे काम चालते. सुमारे ९ ते १० हजार फौजफाटा असलेल्या या विभागातील पोलिसांचा बंदोबस्त, गार्ड ड्युटीसाठी वापर केला जातो. या पोलिसांना नेमणूक देण्यासाठी त्यांच्यातूनच चारही मुख्यालयांत सुमारे ४० ‘कंपनी कारकून’ आणि ‘एनसीओं’ची निवड केली जाते. या पदावर निवड होण्यासाठी अंमलदार आपल्या वरिष्ठांना प्रत्येकी एक लाख रुपये देतात, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. ही जबाबदारी सहा महिन्यांसाठी असते त्यानंतर पुन्हा नव्याने निवड आणि पुन्हा नव्याने आर्थिक देवाणघेवाण होते.
कारकून म्हणून नेमणूक केलेले अंमलदार आपल्या कंपनीमधील जवळपास ३० टक्के इच्छुक पोलिसांना त्यांच्याकडून दिवसाला ५०० व महिन्याला प्रत्येकी १५ हजार रुपये घेऊन सेटिंग सुट्टीवर सोडतात व इतर शिल्लक ७० टक्के पोलिसांपैकी जवळपास २० टक्के पोलिसांना चांगली सौम्य ड्युटी देण्यासाठी, रजा मंजूर करण्यासाठी व त्रास न देण्यासाठीही त्यांच्याकडून महिन्याला ४ ते ५ हजार रुपये तसेच भेटवस्तू, पार्ट्या घेतात. वरिष्ठांना दिलेल्या पैशांची कसर हे कारकून इतर पोलिसांकडून भरून काढतात. जे शिल्लक अंदाजे ५० टक्के अंमलदार कायदेशीर इमानदारीने नोकरी करतात व कंपनी कारकून याला पैसे देण्यास इच्छुक नसतात, असे या व्हायरल पोस्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. चिरीमिरी कारभार कशाप्रकारे चालतो याचे वर्णन करताना यावरील उपायही पोस्टमध्ये सुचविण्यात आले आहेत. पोलिस दलात कुणीही यावर वाच्यता करीत नसले तरी वरिष्ठ पातळीवर याची गंभीर दखल घेतल्याचे म्हटले जात आहे.
 म्हणून तेही घाबरतात...
सेटिंग सुट्टीवर असलेल्या ३० टक्के पोलिसांचे काम ५० टक्के इमानदार पोलिसांकडून त्यांना त्रास देऊन करवून घेतले जाते. आधीच मनुष्यबळ सुट्टीवर असल्याने या पोलिसांना हक्काच्या रजा व साप्ताहिक सुट्टीही अनेकदा मिळत नाही. याबाबत कुणी कंपनी कारकूनची तक्रार वरिष्ठांना केली तर त्याला न्याय तर मिळत नाहीच, उलट त्याला सातत्याने डे-नाइट हार्ड ड्युटी देऊन प्रचंड त्रास दिला जातो व त्याचे खाच्चीकरण करून तोंड बंद केले जाते. त्यामुळे तक्रार करायलाही पोलिस घाबरतात, असेही यात म्हटले आहे.