NC Times

NC Times

मी दररोज २ हजार जोर मारतो, तुमच्या पुतण्याला नीट सांगा, मंगलदास बांदलांचं रोहित पवाराना उत्तर


नवचैतन्य टाईम्स  शिरूर (प्रतिनिधी)-'शरद पवार अनेकदा अनेकांच्या व्यंगावर बोलले पण त्यांच्या व्याधीवर आतापर्यंत कुणीही बोलले नाही' म्हणत मंगलदास बांदल यांनी बारामतीत त्यांच्यावर तोंडसुख घेतले. त्यांना उत्तर देताना रोहित पवार यांनी कानफटीत मारण्याची भाषा केली. त्यांच्या याच विधानावर आता मंगलदास बांदल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी दररोज दोन हडार जोरबैठका काढणारा माणूस आहे. दादा तुमच्या पुतण्याला समजावून सांगा, कशाला माझ्या नादी लागतोय, असे बांदल म्हणाले.
बारामती लोकसभेचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी मंगलदास बांदल आले होते. यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना लक्ष्य करताना बांदल यांनी गत काळातील काही राजकारण्यांची उदाहरणे दिली. व्यंगांवरून शरद पवार यांनी अनेकदा नेत्यांना हिनवल्याचा दावा त्यांनी केला. बांदल पवारांवर तोंडसुख घेताना अजित पवार मंचावरच होते. हाच मुद्दा पुढे करून रोहित पवार यांनी अजितदादांना कोंडीत पकडले. मी जर तिथे असतो किंवा पूर्वीचे दादा जरी असते तरी बांदलांच्या कानफटीत मारली असती, असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केला. रोहित पवार यांच्या विधानावर मंगलदास बांदल यांनीही जोरदार उत्तर दिले आहे.
 दादा, मी दररोज २ हजार जोर मारतो, तुमच्या पुतण्याला नीट सांगा
मंगलदास बांदल म्हणाले, रोहित पवार यांनी माझ्या कानाखाली मारण्याची भाषा केली. दादा मी दररोज दोन हजार जोर मारतो. कशाला माझ्या नादाला लागतो म्हणावं... दादा तुमच्या पुतण्याला नीट सांगा, मी काय साधा गडी आहे का... आला आणि मारलं.. चांगला आहे बाबा, चांगला राहा... दादा याने तुमच्या नावावर वजनात कारखाने खाल्ले. पाच-सहा जिल्ह्यात कोंबड्याची खुराडी तुमच्याच जीवावर चालवतोय. त्याला अजून दादाचा आवाका माहिती नाही, अशा शब्दात त्यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार केला.
मंगलदास बांदल बारामतीत काय म्हणाले होते?
"मागे शिरूरचे आमदार सूर्यकांत पलांडे होते. ते शरद पवार यांना सोडून गेले होते. पुढे काही काळानंतर त्यांच्या हातावर कोडाचा प्रकार आला. त्यामुळे ते हाताच्या बाह्या पुढे घेत होते. शरद पवार यांनी पलांडे यांनाही सोडले नाही. तुमच्या तालुक्यातला एक गडी फार बाह्या सरसावून भाषण करायचा, आता का बाह्या पुढे करतोय? असे त्यावेळी शरद पवार म्हणाले होते. दुसरे म्हणजे दिलीप ढमढेरे हे जुन्नरचे आमदार होते. त्यांचा एक पाय तुटलेला होता. त्यावेळीही शरद पवार म्हणाले पाठिंबा द्यायचा असेल तर दोन्ही पायांनी द्या, दीड पायांनी देऊ नका. म्हणजे पवारसारहेब सगळ्यांच्या व्यंगावरून बोलतात पण त्यांच्या व्याधींवर कुणीच बोलत नाही कारण त्यांची किंमत यशवंतराव चव्हाणांची किंमत आहे आणि यशवंतरावांची पिढी अजूनही जिवंत आहे" असे मंगलदास बांदल म्हणाले होते.