NC Times

NC Times

शरद पवार यांच्यावर काँग्रेसने अन्याय केला पंतप्रधान होऊ दिले नाही- रामदास आठवले


नवचैतन्य टाईम्स अहमदनगर (प्रतिनिधी)-काँग्रेसने शरद पवार यांच्यावर अन्याय केलेला आहे. त्यांच्या ऐवजी डॉक्टर मनमोहन सिंग यांना पंतप्रधान केले व दुसऱ्या वेळीही त्यांनाच संधी दिली. त्यामुळे पवारांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याऐवजी महायुतीमध्ये त्यांनी यावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे केले.
महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे व शिर्डीतील उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी मंत्री आठवले नगरला आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, माजी मंत्री राजकुमार बडोले, विनायक देशमुख, सुनील साळवे, नरेश चव्हाण, राजू वाघमारे उपस्थित होते.
शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे असे माझे फार पूर्वीपासूनचे आवाहन आहे. कारण काँग्रेसने त्यांच्यावर अन्याय केलेला आहे. पंतप्रधान पदाची संधी असतानाही काँग्रेसने ती त्यांना देता न देता मनमोहन सिंग यांना दिली. दुसऱ्या वेळीही पवारांना डावलले व सिंग यांनाच पुन्हा संधी दिली. त्यामुळे आता त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या काँग्रेसमध्ये त्यांनी त्यांचा पक्ष विलीन न करता, त्यांनी आमच्या महायुतीमध्ये यावे, असे स्पष्ट करून आठवले म्हणाले, छोटे पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत पवार बोलले असले तरी केवळ त्यांचा एकच राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, परंतु त्यांनी तसे न करता ते जर अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत आले तर त्यांचे घड्याळ चिन्ह त्यांना परत मिळेल तसेच धनुष्यबाण चिन्ह गेल्याने संतापलेले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत आले तर त्यांचे धनुष्यबाण चिन्हही त्यांना मिळेल. यातून अजित पवार व एकनाथ शिंदे फार काही नाराज होणार नाहीत, असा दावाही आठवले यांनी केला.
भाजपच्या चारसो पारच्या नाऱ्यामुळे संविधान बदलले जाईल व लोकशाही धोक्यात येईल असा दावा काँग्रेस करत असले तरी देशाची लोकशाही नाही तर काँग्रेसच धोक्यात आलेली आहे. संविधान कोणालाच बदलता येणार नाही. फक्त त्यात दुरुस्ती करता येऊ शकते. काँग्रेसने तर ८० वेळा अशी दुरुस्ती केली आहे, असा दावा करून आठवले म्हणाले, प्रत्येक जण संविधानाची शपथ घेत असतो व अशी शपथ घेऊन सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींनी देशाची अर्थव्यवस्था सुधारली, महिला सक्षमीकरण केले, ३७० कलम हटवले व काश्मीरमध्ये संविधान लागू केले. त्यामुळे तेथे एससी-एसटी आरक्षणही लागू झाले आहे. याशिवाय शेतकऱ्यांना मदत, रस्ते विकास, जनधन, आवास योजना, ८० कोटी लोकांना मोफत धान्य, असे अनेक समाजकल्याणाचे विषय मार्गी लावले आहे. अहमदनगरमध्ये डॉ. सुजय विखे यांनी जलसिंचन योजना, वयोश्री योजनासह केंद्र सरकारच्या योजना राबवल्याने त्याच्या हातून लंका दहन होणार आहे, असा दावा आठवले यांनी केला.
चारसो पारच्या नाऱ्यातून संविधान बदल होणार नाही. उलट संविधान मजबुतीकरण होईल. मोदींनी संविधानाची शपथ घेतली आहे, २६ नोव्हेंबर संविधान दिन पाळण्याचे जाहीर केले आहे, असे असताना काँग्रेस पक्ष भेदभावाचे वातावरण पसरवत आहे. घटनेनुसार धार्मिक आधारावर आरक्षण देता येत नाही, परंतु काँग्रेस ओबीसी मधून मुस्लिम आरक्षण देण्याचा प्रचार करतात, ही घटना विरोधी भूमिका आहे. नरेंद्र मोदी मुस्लिम विरोधी नाही तर ओबीसी मधून मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या भूमिके विरोधात आहेत, असा दावाही आठवले यांनी केला. नगर जिल्ह्यातील दोन्ही जागांसह महाराष्ट्रात ४० जागा महायुती जिंकेल, असेही ते म्हणाले.