NC Times

NC Times

पहिल्यांदा मुख्यमंत्री, दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री मोदींच्या कडून मोठ्या जबाबदारीची शक्यता


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर भारतीय जनता पक्षानं सत्ता स्थापनेचा दावा केला. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण भाजपनं धक्कातंत्राचा वापर केला. शिवसेनेत अभूतपूर्व बंड करुन भाजपसोबत आलेल्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद देण्यात आलं. शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होण्याच्या सूचना दिल्लीहून फडणवीसांना देण्यात आल्या. फडणवीसांनी पक्षादेश स्वीकारत वरिष्ठांचा निर्णय मान्य केला. ते दिल्लीला जाणार असल्याची चर्चा अधूनमधून होत असते. पण राज्याच्या राजकारणातला भाजपचा चेहरा अशी त्यांची ओळख आहे
आधी मुख्यमंत्री आणि मग उपमुख्यमंत्री झालेल्या फडणवीसांकडे यापुढे कोणती जबाबदारी दिली जाणार असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारण्यात आला. त्यावर भाजप हा केडरबेस पक्ष आहे. आमचे कार्यकर्ते राष्ट्रहितासाठी काम करतात. पक्षातर्फे कार्यकर्त्यांना जे सांगितलं जातं ते स्वखुशीनं करणं ही आमच्या कार्यकर्त्यांची ओळख आहे. अलीकडेच आमच्या अनेक नेत्यांना, ज्यांनी राज्याची धुरा सांभाळली होती, त्यांना दुसरी जबाबदारी देण्यात आली. त्यांनी ती लगेच स्वीकारली, असं मोदींनी सांगितलं. लोकमत वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी फडणवीसांवर स्तुतीसुमनं उधळली.
भाजपनं देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यास सांगितलं, त्यावेळी त्यांनी भाजपचा कार्यकर्ता म्हणून त्यांचं कर्तव्य पार पाडलं. त्यांनी राज्यातील जनतेसाठी उत्तम काम केलं. मुख्यमंत्रिपदाचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे गेल्या अनेक वर्षांतले ते एकमेव नेते ठरले, अशा शब्दांत मोदींनी फडणवीसांचं विशेष कौतुक केलं.
फडणवीसांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात राज्याचा सर्वच क्षेत्रांमध्ये विकास केला. आता पक्षानं त्यांना दुसरी जबाबदारी दिली आहे. ते अत्यंत मन लावून ती जबाबदारी पार पाडत आहेत. ही भाजपची संस्कृती आहे. महाराष्ट्रात सुशासन राखणं हे फडणवीसांचं मुख्य ध्येय आहे. ते मुख्यमंत्री आहेत की उपमुख्यमंत्री यापेक्षा ते महाराष्ट्रात सुशासन राखत आहेत आणि ते महत्त्वाचं आहे, असं मोदी म्हणाले.