NC Times

NC Times

सदगुरु कृपा


नवचैतन्य टाईम्स वाई (प्रा.संभाजी लावंड)- 
खटाव तालुक्यातील खातगुण गावातील चौकात श्री
मधुकर कोथंमिरे सरांचे नवरात्रीच्या निमित्ताने सायंकाळी सहा वाजता प्रवचन सुरु झाले होते.भाविकांची प्रचंड गर्दी जमली होती. लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. ऐवढ्यात एक काळा कुत्रा माणसांच्या गर्दीत कुठून तरी अचानक घुसला. लोक त्या कुत्र्याला हिडीस फिडीस करुन बाहेर हाकलून लावत होते. कुत्रे गर्दीतच सरांच्या दिशेने धावत होते. "आज प्रत्यक्ष पांडुरंग माझे प्रवचन ऐकावयासआले आहेत"! असे सरांनी म्हटल्या नंतर सर्वजन चपापले होते.तो मुका जीव सरांच्या पायाशी बसुन कान टवकारुन प्रवचन संपेपर्यंत सरांच्या कडे पहात बसून होता. श्री चक्रधर स्वामींच्या मांडी खाली असाच एक भित्रा ससा येऊन बसला होता. प्रेम भावाने प्राणी सुध्दा आपलेसे करता येतात हे सरांच्या संभाषणातून जाणवलेले आहे..नीरेच्या उत्तरेला चार किलोमीटर अंतरावर जेऊर या गावात सरांचे प्रवचन होते. सर आल्याचे समजताच लोकांचे समूह मोठ्या संख्येने प्रवचन स्थळी जमा होऊ लागले होते. कार्यक्रमाला सुरवात झाल्या नंतर सरांच्या वाणीचा प्रभाव जसजसा वाढत होता. तसतसे श्रोते एकचित्त होऊन भक्ती भावात ओले चिंब न्हात होते.सद्गुरुंची कृपा या विषयावर अखंड वाणीचा ओघ सुरु होता. एवढ्यात चार ते पाच फुट लांबीचा पिवळा धमक नाग फणा उभारुन कुठून कसा गर्दीत घुसला हे कोणाच्याही लक्षात आले नाही. ते भयंकर जनावर अचानक सळासळा करीत आल्याचे पाहून लोकसमुदायात एकच गोंधळ उडाला होता. तो नाग बरोबर सर जिथे प्रवचन करत होते त्यांच्या समोर गोल वर्तुळाकार होऊन दहाचा फणा उभारुन होते.सर म्हणाले सर्वजन आपापल्या जागेवर बसा. कारणआज साक्षात माझा सदगुरु प्रवचन ऐकावयास आले आहेत. त्या वेळी सायंकाळच्या पाच वाजल्या होत्या. रस्त्यावर असंख्य वहाने, फोरव्हीलर गाड्या उभ्या राहिल्या होत्या.असंख्य माणसे आर्वजून तो प्रसंग पहात होते.सदर प्रसंगाचा मी साक्षीदार होतो. दैवी नाग हे कुंडलीनीचे शक्तीचे प्रतीक आहे. खातगुणच्या शिवारात पूर्वी आंब्याची मोठमोठी झाडे अस्तित्वात होती. श्रीरामओढा ते पत्र्याच्या शिवारात आंब्याची विशेष दाटी होती. गुरामागे असताना आम्ही मुले दिवस दिवस झाडावरील पाड शोधून खात बसायचो. शिवारात पाडांची गळती लागल्यानंतर परिसरातील आंबे झेलणीने जाळीदार झेल्यामध्ये उतरवून घेतले जात होते. वटपौर्णिमे पर्यंत पिकलेल्याआंब्याचे अस्तित्व रहात होते, त्यानंतर आंब्याचा सिझन निसर्ग नियमानुसार हळुहळू लोप पावत आला होता.पुसेगावी सरांच्या घरी माझे येणे जाणे कायम असायचे. अशावेळी अध्यात्म व संत चरित्रावर विचार मंथन होत होते. एकदा सरांना आंब्याचे लोणचे खाण्याची तीव्र इच्छा झाली. आणि मला तसे सहज बोलूनही दाखवले. "शिवारातील आंब्यांचा सिझन संपलेला आहे". ऐवढाच विषय आमच्या दोघात झाला होता, त्या नंतर सायकलीने घरी आलो.बऱ्याच दिवसा नंतर एका रविवारी गुरे चारण्यासाठी गणपू हवलदाराच्या झाडीत गेलो होतो. तेथेच ओढ्याच्या कडेला रामू नेरकरांची विहीर पाण्याने तुडुंब भरलेली होती. त्या निळ्याशार पाण्यात आकाशातील ढगांचे व आसपासच्या घाणेरीच्या ताटव्यांचे प्रतिबिंब छायांकित झाली होती. विहीरीच्या कठड्यावर बसून ईश्वर चिंतनात ध्यानमग्न झालो. वारा शांत होता.ओढ्यात निरव शांतता नांदत होती.पांढरे शुभ्र बगळे डोहाच्या काठावर स्थिरचित्ताने बसले होते. पक्ष्यांच्या कोमल हालचाली व त्यांचे आवाज परिसरातून चित्ताला आनंद देत होते.चारपाच मिनिटे झाल्यानंतर बापू मास्तरच्या आंबराईत काहीतरी धपकन पडत असलेल्या आवाजाने जागा झालो. हवलदाराच्या खारकी जांभळी खाली गुरे चरत होती. त्यांना तसेच सोडून बापू मास्तरांच्या विहीरी जवळील मोठ मोठ्या आंब्यावर चुकारीचे अधांतरी वीस ते पंचवीस आंबे होते. त्यातील परिपक्व झालेले पाड खाली पडले होते. त्याचा मनापासून आस्वाद घेऊन, झाडावर चढून सगळे आंबे काढून टाॅवेलमध्ये बांधून घेतले होते. दुसऱ्या दिवशी पुसेगावी सरांना दिले. रामकृष्ण परमहंसा़ना असेच एकदा तीन आवळे खाण्याची तीव्र इच्छा झाली होती. तेव्हा आवळ्याचा सिझन संपला असताना सुध्दा विवेकानंद यांनी शोध सुरु ठेवला होता. खूप शोध घेतल्या नंतर त्यांना एका आवळ्याच्या झाडावर अगदी शेंड्यावर तीन आवळे आढळून आले होते.कोथमिरे सर त्या पात्रतेचे होते हा अनुभव आहे. सरांना स्वप्नामध्ये सतत नाग दिसायचा. अशी स्वप्ने त्यांना पाच ते सहा वेळा पडली होती.या स्वप्नांचे घरातच चिंतन करत असताना,त्यांना त्यातून सूचना होत होते की हा नाग निश्चित करुन घरामध्येच असला पाहिजे. त्यांनी ही घटना घरातील कोणालाही सांगितली नव्हती.सर घरात असताना त्यांनी सहज दार बंद करताना, दाराच्या भिंतीवर आडोशाला नाग दिसून आला. तीन फुटाचा नाग त्यांनी पाहिल्यावर सरांनी  हात जोडले. आणि म्हणाले," देवा माझे घर पावन झाले आहे. आता आपण निसर्गात जावे! "एवढे बोलून सरांनी हातात फडके घेऊन त्याला हाताने पकडले. सरांचा स्पर्श त्या नागला झाल्या नंतर तो आकुंचन पाऊ लागला. सरांनी त्याला पकडून दूरवर सोडून दिले होते. तेव्हा मी सरांबरोबर होतो. स्वप्न संदेश फक्त चांगल्या साधकांना जाणवतात. त्या पात्रतेचे सर होते. पुसेगाव पंचक्रोशीतील सर्व स्तरातील लोक सरांच्या घरी येत व जात होते. त्यांनी  कधीही कोणालाही निराश केले नाही. निराश तरुणांची ते निराशा नुसत्या मार्गदर्शनाने घालवत होते. त्यामुळे प्रत्येक रविवारी सकाळ पासून सायंकाळ पर्यंत पंचवीस ते तीस लोकांचे येणे जाणे होत होते. पण प्रत्येक लोक आनंदी व उत्साहाने प्रेरणा घेऊन जात होते. सरांचा लोक संग्रह खूप वाढला होता. लहानापासून ते थोरांपर्यंत त्यांचा जन संपर्क असला तरी गर्व मात्र तिळभरही नव्हता. रविवारच्या बाजारातून भाजीपाला विकत आणताना,घरी लवकर यावे म्हणून सौ. ताईंचा आग्रही स्वभावाचा ज्वालामुखी जागृत होऊ नये म्हणून सर गडबडीने बाजार पालथा घालत होते. रस्त्याच्या कडेला बाजारात ओळखीची माणसे भेटत मग सर बोलत उभे रहात होते. अशावेळी बाजार उठायची वेळ आलेली असायची. मग कसा तरी भाजीपाला घेऊन उशीर झाल्यामुळे चुकलेल्या मुलांसारखे धावत घरी येत होते. आज शिक्षक, डॉक्टर, वकिल, प्राध्यापक, प्राचार्य,ग्रामसेवक,तलाठी,पोलिस,पत्रकार,सरपंच,कृषीआधिकारी,व आय टी इंजिनिअर इ. क्षेत्रात सर्व विद्यार्थी कार्यरत आहेत. एका बाजूला नोकरी करुन समाज प्रबोधन करणे ही सोपी गोष्ट नाही. पण सरांच्या वाणी पुढे शत्रू सुध्दा हात जोडुन उभे राहतीलअशी त्यांची वागणूक होती.  त्यांच्या घराला अनेक सत्पुरुषा़चे पाय लागलेले होते. किती तरी तत्वचिंतन, चर्चा परिसंवाद, होत होते. अनेक गोष्टी वैशू, दिपा, राणी आणि दादा यांच्या कानावर अमृत तुषार पडत होते.या सर्व मुलांचे समृध्द बालपण मी जवळून पाहिलेले आहे. सर कधी कधी दाढी वाढवत होते.उभट चेहरा,सरळ नासिका, टोकदार हनुवटी व वेध घेणारे तेजस्वी डोळ्यातील चमक आणि डोईवर विपुल परंतु शोभिवंत केसांची महिरप शोभून दिसायची.पूजापाठ कि़ंवा ध्यानाला बसताना ते पांढरा पंचा व अंगावर एखादे दुसरे उपवस्त्र किंवा मऊ शाल असायची. तेव्हा ते साक्षात आळंदीतील श्री विठ्ठल पंतासारखे हुबेहूब दिसत होते. ते दर्शन मी बऱ्याच वेळा पाहिलेले आहे. किसन शिर्के या नावाचा वर्धनगड मधील एक सरांचा विद्यार्थी होता. अंगाने किरकोळ व निव्वळ हाडाचा सापळा होता. सायंकाळी दहावीचे जादा तास व नंतर स्टडीला मुले थांबत होती. अशा वेळी गावातील काही बाहेरची मुले मैदानावर येऊन गोंधळ करत होती. त्यामुळे मुलांचा अभ्यास होत नव्हता. परंतु कोणीही  तक्रार केली नाही. त्यामुळे बाहेरच्या मुलांची दादागिरी वाढत होती. शिर्के याने सरळ पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिली होती. थोड्याच वेळात पोलीसांची गाडी शाळेच्या मैदानावर आल्यामुळे गोंधळ करणारी मुले पळून गेली. या बाबींचा सरांना खूप अभिमान वाटायचा. 
शक्तीपेक्षा युक्ती कशी श्रेष्ठ असते ते वरील उदाहरण अनेक लोकांना देत होते. सरांच्या घरी जेवण करीत बसलो 
असताना कोणीतरी सांगितले की किसन शिर्के आता निधन पावला आहे, असा सांगावा मिळाल्यानंतर जेवणाची ताटे बाजूला सारुन आम्ही सायकली वरुन वर्धनगड गाठले. तेथील शोकाकुल अवस्था पाहून सरांच्याही डोळ्यात आसवे आली. आपल्या विद्यार्थ्यांची चिता सरांनी स्वहस्ते स्मशानात रचली होती.त्या प्रसंगाचा मी जवळून साक्षीआहे.सर  उत्तम सायकल चालवतात हे कोणासही माहिती नाही. नेर या गावात सरांचे प्रवचन होते. तेव्हा आम्ही सायकलीवर निघालो होतो. माळातून रस्ता ओबड धोबड, खाच खळग्यांचा व दगडधोंडे यांचा होता, मला सायकल चालवणे कठीण झाले होते, सर सायकल चालवताना समोरचा हॅंडल वाकडा तिकडा, क्षणार्धात सरळ चालवत त्यामुळे मागचे चाक दोन दगडांच्या मधून  बरोबर निघत होते. पण सायकलला जरा सुध्दा टच लागत नव्हता. मला ते जमले नाही. मी हाती सायकल घेऊन आदळत आपटत घामाघूम होऊन चालत होतो.गणित विषय व सायन्स शिकवण्याची पध्दत गुरू आणि शिष्याची होत असे. नैतिकता मोठी गुणवान असल्याने त्यांच्या टोकदार भाषेने आपोआप लक्ष केंद्रित व्हायचे. माझ्या सारख्या गावढळ व गणित काहीच न येणाऱ्या मुलांच्या मध्ये मी येरळा नदीतील गोठा होतो. मला गणित समजायचे नाहीपण सरांनी मला निराश केले नाही की, दूर लोटले नाही. माझ्यासाठी ते गणित दररोज समजून देताना सरांचे चमचाभर तरी रक्त आटत होते.सर कधी कधी जेवणाचे साहित्य घेऊन कुटुंबा समवेत आसपासच्या परिसरात जात होते. दैनंदिन चाकोरीबध्द जीवनातून वेगळी पाय वाट शोधत होते.मुख्याध्यापक, कधी प्राचार्य पदभार सांभाळताना निर्णय शक्ती असली पाहिजे. किंवा या पदाच्या वर्तुळातून बाहेर येण्यासाठी ते निसर्गाची मदत शोधून काढीत. निसर्गापासून मिळणाऱ्या शक्तीचा ते मागोवा घेत. अशावेळी मनावरचा मळभ दूर निघून जात असे. बघता बघता दिवस पुढे सरकत होते.सरांची थोरली मुलगी वैशाली उपवर झाली.वेदावती काठची ही लक्ष्मी इंद्रायणी काठी आळंदीत आपला संसार थाटायला निघून गेली. विवाह पार पडला आणि बापाच्या हृदयातील करुणेचा समुद्र कसाहेलावतो,बापाच्या हृदयातील कालवा कालव जवळून पाहिलेली आहे. त्या वेळी मलाही आतून भरुन आले होते.दादा हा सरांचा एकुलता एक चिरंजीव.परंतु सरांच्या प्रतिष्ठेला शोभेल असे त्याचे वर्तन होते. दिपा ही सरांची द्वितीय कन्या शांत व जमेल तेवढाच अभ्यास करणारी होती, परीक्षेत कमी गुण पडले तरी सरांनी कधीही तिला रागे भरत नव्हते. राणी ही  मुलगी सरांचे शेवटचे शेंडेफळ होते. तिच्या हसण्याने, बोलण्याने, नाचण्याने, अंधाऱ्या भिंगाऱ्या खेळताना घरांचे गोकुळ फक्त राणी सरकारांनी केले होते.अत्यंत गोंडस सशासारखे घरात उड्या मारणे शोभून दिसत होते. हा मुक्त अलंकार जोपर्यंत घरात असे तो पर्यंत घराला सुध्दा बरे वाटून वास्तुपुरुष प्रसन्न होत होते. घरातील सर्वजन सरांना भाऊ या नावाने संबोधत होती. खातगुणच्या शिवारात किंवा रानात हुरडा कसा भाजावा, तो चोळून हातामध्ये कसा गोळा करावा, हरबऱ्याचा हावळा कसा होरपळून भाजावा याचे प्रात्यक्षिक सर सराईत शेतकऱ्यासारखे करुनदाखवत होते.तो पर्यंत शिवारात सायंकाळ दाटून यायची. त्यावेळी ताईंचा स्वभाव घरी जाण्यासाठी उतावीळ होत होता. मग सरांना उरकते घ्यावे लागत होते. ते ही कसली कुरबुर न करता.सरांच्या अंगी संयम फार होता. संस्था,शाळा,  शिक्षक, शिपाई, पालक विद्यार्थी यांची मानसिकता,व शाळेचे प्रशासन चालवताना काही नकारात्मक शक्त्या एकत्र येऊन कटकारस्थाने शिजवत असतात.जे शिक्षक नुसत्या तासाला पाट्या टाकण्याचे काम निर्लज्जपणे करीत असताना, तेच लोक संस्था सदस्यांना बाजूला घेऊन कान फुंकणे, एकाचे दोन सांगत रहाणे, या प्रक्रिया चालु ठेवतात. इतर लोकांना शाळेची कीर्ती किंवा संस्थेचे हिताशी काही ही देणे घेणे नसते. एकदा मी सरांच्या घरी गेलो तेव्हा चौकटीवर सरांच्या नावाची पाटी होती. पाटीवर प्राचार्य या शब्दा वर पांढरा कागद चिकटवलेला मला दिसला.घरात येता येता सरांना सहज म्हणालो,की शाळेत काही तरी घमासान युध्द झालेसे वाटते आहे. यावर सर फक्त हसले व गंभीर झाले होते.त्यावेळी पुसेगाव शाळेत इतर शिक्षक असले तरी, सरांचे नाव पंचक्रोशीत झाले होते.त्यांना असा वेगळा पुरस्कार देण्याची आवश्यकता वाटली नाही. त्यांनी निर्माण केलेले असंख्य विद्यार्थी हेच पुरस्कार होते.आपण समाजाचे देणेकरी लागतो. समाज जागृती केलीच पाहिजे यासाठी सरांनी व्यसनमुक्ती या विषयावर लक्ष केंद्रित केले होते. उद्बोधन करण्यासाठी ते कधी एसटीने तर कधी सायकलीने प्रवास करत होते. कार्यक्रमाला 
लाईट नसली तरी कंदीलाच्या उजेडात श्रोत्यांना उपदेश करत होते. त्यांच्या या उपदेशाने दारु पिणारे सुध्दा सहभागी होत होते.दारु पिणाऱ्या लोकांचा सरांनी कधी ही तिरस्कार केला नाही. दारु पिऊन तर्र झालेले लोक सरांच्या समोरच बसलेली असून ते त्यांच अवस्थेत प्रतिसाद देत होते. त्यामुळे खऱ्या श्रोत्यांना भेटल्याचा समाधान सरांना वाटत होते. सरांच्या भिडस्त स्वभावामुळे अनेकांनी दारु सोडलेली आहे. हा खरा अधिकार सरांना आहे. कारण सर स्वतः निर्व्यसनी होते.एका तपाचा मी साक्षीदार होतो. गावात लहान मुलांच्या दत्त जयंतीला सरांचे पहिले प्रवचन झाले. प्रसाद म्हणून सरांनी पुसेगावातील ठराविक लोकांच्या दारात उभे राहून तांदुळाची माधुकरी मागणारे साने गुरुजी नंतरआपल्या सरांचा नंबर लागतो. सरांनी थोर मोठी पुंण्याई कमवलेली आहे. सायकल पंक्चर काढायला माझ्याकडे पैसे नसायचे किंवा गावाला जायचे असेल तर सर निरपेक्ष भावनेने मला पैसे देत होते. देवदरी येथील शिवानंद भारती हे त्याच परिसरातील एका शाळेत संस्कृत भाषेचे अध्यापन करत होते. परंतु स्थानिक संचालकांना सदर व्यक्तीची किंमत समजली नाही. पण ज्या कालावधीत नेमणूक झाली ज्या दिवसापासून अंतिम नेमणुकीचा दिनांक लक्षात घेऊन पगार बीले मंजूर आणली होती. संस्था पातळीवर जे काम लवकर होणार नव्हते ते सरांनी आपल्या वैयक्तिक अधिकार क्षेत्रात करुन दाखवला होता.सरांचे विविध लेख व कविता साईलीला, शिक्षण संक्रमण, या मासिकात आणि ऐक्य, पुढारी,  सकाळ यातूनही प्रसिद्ध होत होते. पण सर मागोवा घेत नव्हते. मग मी स्वतः कात्रणे कापुन सरांच्या देव्हाऱ्यात ठेवत होतो. कधी कधी सर निराश कींवा अस्वस्थ असताना नेमका त्याच वेळी मी सरांच्या घरी जायचो. सर मला पहाताच आनंदी होत आणि भक्तीगीत गीते गात होतो.मुळात मी गायक असल्याने मी गीत गायचे आणि सरांच्या डोळ्यात भाव भक्तींचा पुर लोटायचा.सेवागिरीं देवस्थान दिंडीचे ते खरे पहिले पाईक होते. पुसेगाव पंचक्रोशीतील टाळ मृदुंगाच्या गजरात निघालेल्या दिंडीमध्ये सरांचे विलोभनीय दर्शन पाहिले आणि माझे डोळे पाणावले.श्री कोथमिरे तेथे नव्हते तर साक्षात स़त तुकाराम महाराज दिसत होते. अंगामध्ये त्यांनी पांढरा नेहरू घातला होता. कमरेला पोक्त माणसासारखे शुभ्र स्वच्छ धवल धोतर नेसले होते. डोईवर शोभिवंत पटका होता. भाल प्रदेशावर चंदन तिलक व अबीरबुक्का रेखाटला होता, आणि हातात आडवी वीणा घेऊन दिंडीने पहिले पाऊल उचलताच सर स्थितप्रज्ञासारखे चालत होते. खटाव काॅलेजचे श्री चंद्रहार पाटील यांनी
सरांना खटावच्या शिक्षण संस्थेत यावे असा आग्रह धरला होता परंतू सरांनी आपल्या मुळ शाळेतच रहाणे पसंत केले होते. सर उत्कृष्ट पोहतात. एकदा गाणगापूरला    कृष्णाअमरजा  संगम पोहत पोहत पलीकडे जाऊन परत अलिकडे आले होते. अशा देवगुरुंचा मला सहवास मिळालेला असून अनेक विद्यार्थ्याच्याआयुष्याचे सोने झालेले आहे. हे फक्त संत समागम झाल्या मुळेच शक्य झाले आहे.
प्रा. संभाजी रामचंद्र लावंड. वाई