NC Times

NC Times

मतदानाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून धमकी; ३६ शाळांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ईमेल


नवचैतन्य टाईम्स  अहमदाबाद (प्रतिनिधी)-  अहमदाबादमधील सुमारे ३६ शाळांना धाडलेले बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ईमेल पाकिस्तानातून पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे. ७ मे रोजी होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर धमकीचे ई-मेल पाठवून नागरिकांमध्ये आणि मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. ७ मे रोजी गुजरातमधील लोकसभेच्या २६पैकी २५ जागांवर एकाच टप्प्यात मतदान झाले. तर, सुरतमधील उमेदवार निवडणुकीआधीच बिनविरोध विजयी झाला आहे.
 स्वतःची ओळख तौहीद लियाकत अशी सांगणाऱ्या व्यक्तीने हे धमकीचे ईमेल ‘मेल.रू’ या डोमेनवरून सर्व शाळांना पाठवले होते. मतदार आणि भारतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवण्यासाठी त्याने हे कृत्य केले, अशी माहिती अहमदाबाद गुन्हे शाखेच्या वतीने देण्यात आली. ‘लियाकत याने हमद जावेदच्या रूपात आणखी एक ओळख बनवली होती. या नावाची व्यक्ती पाकिस्तानच्या फैसलाबाद जिल्ह्यातून काम करत होती. एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वेगवेगळी ओळख बनवली होती. त्यापैकीच एक नाव हमद जावेद असेही होते,’ असे संयुक्त पोलिस आयुक्त शरद सिंघल यांनी सांगितले.
‘या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर भारतीयांमध्ये भारतविरोधी संदेश, अफवा आणि भीती पसरवण्यासाठी केला जातो. त्यामुळे भीती आणि अफवा पसरवण्यासाठीच हे नाव तयार केले असावे. मात्र हे ईमेल ‘मेल.रू’ डोमेनचा उपयोग करून पाठवले गेले आणि त्याचे ठिकाण पाकिस्तानच्या फैजलाबादमधील होते,’ अशी माहिती सिंघल यांनी दिली.
अन्य तपास संस्थेकडून सुरू असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणातही आरोपीचे नाव चौकशीदरम्यान समोर आले होते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. धमकी प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आयबी, दहशतवाद विरोधी विभाग, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था आणि रॉ यांसारख्या तपास संस्थांशीही या प्रकरणी संपर्क साधण्यात आल्याचे सिंघल यांनी सांगितले.
 अहमदाबादमधील ज्या ३६ शाळांना धमकीचे ईमेल मिळाले होते, त्यातील अनेक शाळांमध्ये मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. हा ईमेल मतदानाच्या एक दिवस आधी, ६ मे रोजी शाळांना मिळाला होता. ईमेलमधील मजकूर काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील शाळांना पाठवण्यात आलेल्या धमकीच्या ईमेलच्या मजकुराशी साधर्म्य सांगणारा होता. हा ईमेलही रशियाचे डोमेन ‘मेल. रू’ यावरून पाठवण्यात आला होता.