NC Times

NC Times

...रावबहादूर......


काळोखाला प्रचंड वेगाने ढुशा देत रेल्वे लोखंडी रुळावरुन आवाज करीत एकसारखी धावत होती.साऱ्या सृष्टीला चक्कर आल्यासारखे वाटत होते.रात्र चढाला लागली होती. खिडकीतून दिसणारी चंद्रकोर ढगांच्याआडून दूरवरच्या डोंगर रांगेवर मावळत होती.विस्तीर्ण आकाशात असंख्य चांदण्या दूरवर लुकलुकत होत्या. बाहेरचे जग काळोखात बुडून गेले होते. सावज पोटामध्ये घेऊन अजस्त्र अनाकोंडा जंगलात सरपट जातो. तसे असंख्य प्रवाशांना सोबत घेऊन रेल्वे धावत होती. प्रत्येक डब्यातील दिवे प्रकाश ओकीत होते. लोक दाटीवाटीने बसले होते. गाडीने किती अंतर कापले असेल याची कल्पना कोणालाही येत नव्हती. अज्ञात स्टेशन येताच गाडी थांबत होती. काही लोक पायउतार होत होते तर काही नवीन प्रवासी आत घुसत होते. पुन्हा राक्षसिणी सारखी किंचाळत धावत होती.आतील प्रवाशांना चहा, काॅफी, फराळाचे साहित्य देणाऱ्या व घेणाऱ्या गिऱ्हाईकांचा विचित्र हावरटपणा एक संन्यासी तटस्थपणे न्याहाळत होता. त्याचा चेहरा थोडासा चिंताग्रस्त वाटत होता.महिला पुरुष व इतर लोक दाटीवाटीने बसले असताना सुध्दा त्याचे तेज लपून रहात नव्हते. काखेत भगवी झोळी, अंगावर भगवी कफनी, कमरेला भगवी छाटी भक्कमपणे गुंडाळलेली होती.दाढीमिशा बहारदारपणे शोभत होत्या. डोईच्या जठांचा संभार ब्रंम्हवेत्या सारख्या दिसत होत्या, उंची पुरी देहयष्टी आणि त्यांचा आवाजही दमदार होता. दक्षिण भारतातील सर्व तीर्थयात्रा करीत असताना जवळची सर्व आर्थिक पुंजी संपली होती. बेळगावच्या रेल्व स्थानकांपर्यंतच अखेरचे ते रेल्वे तिकिट होते.बरोबर सकाळी सहा वाजता रेल्वेची गती कमी होऊन बेळगाव स्टेशनात अभिमंत्रित केल्याप्रमाणे शांतपणे उभी राहिली होती. प्रवाशांची बाहेर पडण्यासाठी एकच धडपड सुरू झाली होती. साधुपुरुष रेल्वे स्थानकातून पायउतार झाले होते.खटाव तालुक्यातील पुसेगावी कसे जाता येईल ? याच विवंचनेत असताना त्या संन्याशाने रेल्वे स्टेशनचा परिसर सोडून उगवतीच्या  दिशेने तो दमदार पाऊले टाकीत चालू लागला. एवढ्यात त्यांना एका मैदानावर मिलिटरीत अनेक भरती झालेल्या तरुणांचा दररोजचा दैनंदिन सराव परेडची तयारी करत असल्याचे दिसून आलेआले. मराठा लाईट इन्फंट्री  बेळगाव  मिलिटरीची पहिल्या चौकी समोरील रस्ता ओलांडून पुढे जात असताना त्यांच्या दोन्ही पायांचे गोळे पिंढऱ्यावर सरकून दुखू लागले की त्यांना पुढे एक पाऊल ही टाकता येत नव्हते. ते माघारी चौकी समोर आले कि, पायांचे गोळे पूर्ववत होत होते. पुन्हा दुसऱ्यांदा त्यांनी चौकी ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला तरी पायांचे गोळे वरती चढू लागले.साऱ्या मैदानावर मोठ्या आवाजात सैनिकांना ऑर्डर दिल्या जात होत्या.त्यामध्ये श्रीरंगराव लावंड या नावाचा कोणीतरी अधिकाऱ्यांनी नाव पुकारले होते, लावंड हे नाव ऐकताच तो संन्याशी जागेवरच एकाएकी तटस्थ उभा राहिला. संन्याशाला नाव परिचयाचे वाटले होते. कॅंम्पसच्या पहिल्या चौकी जवळ येऊन तेथील युवकाला संन्याशाने मनोमन हात जोडून नमस्कार केला होता.अत्यंत नम्रपणे, भावना प्रधान होऊन त्यांनी चौकीवरील शिपायाना "श्री. लावंड यांना बाहेर भेटण्यासाठी महाराज आले आहेत." असा निरोप देण्याची विनंती केली.तो प्रामाणिक चौकीदाराने संन्याशाची आग्रही विनंती मान्य केली व तो तत्काळ आतील कॅंम्पसमध्ये येऊन श्रीरंग लावंड यांना शोधून काढले, व निरोप सांगितला की, "कोणीतरी महाराज बाहेर आलेआहेत. तेव्हा त्यांनी तुम्हाला भेटावयास बोलावले आहे."!तेव्हा श्रीरंग लावंड यांनी प्रथम शांतपणे ऐकून घेतले व "कोणतेही महाराज माझ्या ओळखीचे नाहीत" असा उलट निरोप पाठवला.पण ते बाहेर आले नाहीत. सदर युवकाने बाहेर येऊन निरोप सांगितला. तसा संन्याशी उदगारला की, "पुसेगावचेश्री सेवागिरी महाराज आले आहेत असे आपण परत जाऊन सांगावे."!पुसेगावचे सेवागिरी महाराज आले आहेत.असा पुन्हा निरोप  ऐकल्या बरोबर लावंड यांनी सेवागिरी महाराज यांची कीर्ती ऐकली होती. ते धावतच कॅंम्पसच्या पहिल्या चौकीवर आले. आणि महाराजांना पहातच वाकून नमस्कार केला.श्री महाराजांनी दोन्ही हाताने दंडाला धरुन उभे केले. हृदयाशी धरले. प्रेमाने व आपुलकीने पाठीवर हाताने थोपटले. गंभीर आवाजात श्री सेवागिरी बोलू लागले. "तीर्थयात्रा करीत असताना माझ्याजवळचे सर्व पैसे संपले आहेत. तेव्हाआपण मला फक्त शंभर रुपये द्यावेत."! श्री लावंड यांनी आपल्या जवळचे त्या काळातील शंभर रुपये आदराने देऊ केले. ही दानशूर वृत्ती पाहून श्री सेवागिरींनी त्यांना मनापासून आशीर्वाद व काही वस्तू देऊ केल्या होत्या. कसल्याही परिस्थितीत स्वतः जवळ कायम ठेवण्यासाठी झोळीतून मीठाचे खडे, उडदाचे दाणे, व भस्म यांची पुरचुंडी कपड्यात बांधून हातामध्ये दिली. दोघेही परस्परांना नमस्कार करुन दोघेही विरुद्ध दिशेने निघून गेले. श्रीरंगराव लावंड यांचे भरती पूर्वीचे ग्रामीण जीवन खटाव तालुक्यातील खातगुण या गावात अतिशय गरिबीत व कष्टात गेले होते. घरात अठराविश्वे दारिद्र्य असल्याने लहानपणी हलाखीचे दिवस काढले होते. दुधा ऐवजी मुग, मटकी,हरभरे कडधान्यावर गुजराण करावी लागली होती. मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव येथे भरती झाल्यानंतर श्रीरंगराव लावंड यांना क्रीडाक्षेत्रात, लेझिम, कुस्ती, मल्लखांब, धावणे, पोहणे, या खेळात प्रगती होती.चाणाक्ष व समयसूचकता बुध्दीमत्तेच्या जोरावर प्रमोशन मिळत गेले. आपण सैनिक व्हायचे अशी प्रेरणा त्यांनी चुलत चुलते श्री सिताराम परबती लावंड यांच्या कडून घेतली होती. ते मिलेट्रीमध्ये (बाॅंबे इंजिनिअरींग) होते. पहिल्या जागतिक महायुद्धात त्यांचा सहभाग होता. तुर्कस्थानमधील भूप्रदेशात आघाडीवर असताना त्यांना शत्रू पक्षांच्या बंदुकीची गोळी मांडीत घुसली.आणि त्यांना सरकारने रिटायर  घोषित केले होते. त्यावेळी नवावाडा ही वास्तु त्या काळाचे मोठे वैभव होते. सर्व भाऊ भाऊ एकत्र रहात होते. चुलत चुलत्याने म्हणजे श्री सिताराम यांनी देशभक्तीचे खरे बीज पुतण्या श्रीरंगराव लावंड यांच्या मनात जागृत केले होते."देशासाठी मरावे पण भिमा सारखा पराक्रम करावा"असे ते नेहमी पुतण्याला सांगत होते. लहानपणी युद्धातील घटनांचा उहापोह करीत बसत होते.बंदुकांचे बार, गोळ्यांचे वर्षाव,शत्रुवर हल्ला करणे, अंगात वीरश्री संचारणे ,कथा युधश्च अनेक प्रकारे कथन केल्या.तेव्हा राष्ट्रभक्तीचे पहिले बीज पेरण्यात यशस्वी झाले.त्यांच्या पासून घेतलेली प्रेरणा आपल्या देशात एक नवा इतिहास निर्माण करणारी घटना ठरणार होती. आणि ती घटना एका काळाची गरज होऊन बसली.  मराठा लाईट इन्फंट्री  बेळगाव येथील प्रशिक्षण पूर्ण झाले होते.नेमके त्याच वेळी विश्व पातळीवर  जग दुसऱ्या महायुद्धाच्या खाईत सापडले होते. भारतात त्यावेळी शिस्तबद्ध असणाऱ्या इंग्रजांचे वर्चस्व व राज्य होते.त्यामध्ये भारत हा त्यांच्या अधिपत्याखाली  इंग्रजांच्या बाजुने युध्दात उतरला होता, आणि दुसरे महायुद्ध सुरु देखील झाले होते. ब्रिटिश साम्राज्य जगभर असल्यामुळे हे युध्द जगात वेगवेगळ्या आघाडीवर लढले गेले होते. श्रीरंगराव कृष्णा लावंड यांची इंग्रज फौजेमध्ये आफ्रिकेत नियुक्ती करण्यात आली होती.या युध्दात आफ्रिका खंडातील इथिओपिया व इरेट्रिया या दोन देशाच्या बरोबर सीमेवर केरण किंवा कैरण पहाडी हे लष्करी दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे व मोक्याचे ठिकाण होते.परंतू इटाली या देशाचा हुकूमशहा मुसोलिनी यांच्या फौजांनी ते काबीज केले होते.ते अतिशय उंच व दुर्गम अशी पहाडी काबीज करण्यासाठी इंग्रज जनरलने आदेश सुध्दा काढला होता.ते  त्यांच्या हाताखालील कार्यरत असणाऱ्या दुसऱ्या बटालियनने जंगजंग पछाडले होते. पण त्या पहाडावर कब्जा मिळू शकला नाही. उलट जबरदस्त पराभव व मनुष्य हानी होत होती.इटालियन फौजा पहाडाच्या माथ्यावर दक्षतेने व अतिसावधपणे पहारा देत असल्याने सतत माघार घ्यावी लागत होती. ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ते परत माघारी आले नव्हते. कारण हिटलरने मुसोलिनीला रायफली व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पुरवली होती. यथावकाश तत्कालीन इंग्रजअधिकाऱ्याने कॅप्टन श्रीरंग कृष्णा लावंड. यांच्यावर ही जबाबदारी दिली.3 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट चे प्रमुख बनवले. त्यामुळे त्यांनी इंग्रज आधिकाऱ्या जवळ काही डावपेच व मनसुबे, खलबते व युध्दजंन्य योजनाआखल्या. इंग्रजांना काहीही करुन ते हस्तगत करावयाचे होते. म्हणून कॅप्टन साहेबांना "कुछ भी करो लेकिन मुझे सिर्फ कब्जा चाहिए"असे ठामपणे सांगितले. दुसरे असे की इंग्रज अधिकारी हे " छत्रपती शिवाजी महाराज की जय" या भारतीय घोषणेला खूप घाबरुन होते. कारण असे की, शिवाजी या नावात राष्ट्रभक्तीने भारतीय माणसे जागृत होऊन देश स्वतंत्र करतील याची भिती वाटत होती. म्हणून इंग्रजांनी या घोषणेवर बंदी आणली होती.ती उठवावी. असे मत श्रीरंग लावंड यांनी ठामपणे मांडले. शिवाजीच्या घोषणेला इंग्रज अधिकाऱ्याने परवानगी लगेच दिली.या अगोदर हर हर महादेव अशी एकत्रित घोषणेला मान्यता होती.दोनशे सैनिकांची तुकडी घेऊन पूर्ण काळोखात उभ्या चढाईस सुरुवात केली. कारण शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास व अभिमान डोळ्यासमोर होता. शिवाजीचा गणिमीकावा अंधारात सुध्दा यशस्वी करुन दाखवण्याची जबरदस्त महत्वकांक्षा उपयोगात आणावयाचे निश्चित केले होते. चार चार सैनिकांच्या पन्नास तुकड्या पाडल्या. चढाई अत्यंत अवघड असुन सुध्दा सर्वजन शत्रूला मागमूसही लागू न देता मार्गातील अडी व अडचणींना पाण्याच्या प्रवाहासारखे दुर्गम पहाडी चढत होते. कोपरावर व गुडघ्यांनी रांगत रांगत पहाडाच्या दिशेने पुढे पुढे इंचाइंचाने सरकत होते. तानाजी मालुसरे यांची कोढांण्याची चढाई नजरे समोर होती.अत्यंत अवघड चढाई पुर्ण झाल्यानंतर सर्वांनी शत्रूंच्या मागून अचानक व अचूकपणे एकाएकी हल्ला चढवला. "छत्रपती शिवाजी महाराज की, जय" या सार्वत्रिक आवाजात दोनशे मावळे दोन हजार फौजेवर अक्षरशः तुटून पडले. हल्ल्याचा मारा इतका जबरदस्त होता की, तुंबळ युध्द सुरु झाले होते. चारही बाजूंनी गोळ्यांचा वर्षाव होत होता. तरी ही श्रीरंगराव लावंड यांच्या बाजुंनी गोळ्यांचा पावसाच्या सरी प्रमाणे मारा होत असताना त्यांना एकही गोळी लागत नव्हती.शिवाय त्यांनी आपल्या सोबत चढाई करताना पन्नास ते साठ गाढवे वर आणली होती. त्या गाढवांच्या शेपटीला व मागच्या पायांना गुपचूपपणे मोठमोठे डबे बांधण्यात आले होते.ती गाढवे शत्रुच्या समोरील दिशेने एकाएकी छत्रपतींच्या नावाने व हर हर महादेव या घोषणा देऊन पिटाळून लावण्यातआली.गाढवाच्या आढोशाने लपत छपत पुढे पुढे सरकत बंदुकीने मारा करीत होते. घोषणा देऊन आरडा ओरडा करीत होते.दोनशे शिपायांच्या  घोषणाबाजीच्या आवाजाने गाढवे रानभरी व बेधुंद होऊन इकडे तिकडे धावताना होणाऱ्या डब्यांचा प्रचंड आवाजामुळे शत्रुला वाटले की, आपल्यावर  प्रचंड मोठी फौज चालुन आली आहे.शिवाय शत्रूंच्या पिछाडीवर असलेल्या आपल्या सैनिकांनी जबरदस्त हल्ला चढवला होता.त्यामुळे त्यांनी गळचेपी कोंडमारा झाला. लवकरच तत्काळ शरणागती पत्करली. आपापल्या रायफल्स, व इतर हत्यारे खाली जमिनीवर टाकून दोन्ही हात उंच करुन मरणाच्या भितीनेआहे त्याच स्थितीत उभे राहिले, त्वरित आपल्या अधिपत्याखाली असणाऱ्या शिपायांना सर्वांना अटक करण्याचा हुकूम दिला. दोनशे मावळ्यांनी दोन हजार इटालियनना शिताफीने अटक केली. तो पर्यंत दिवस उगवला होता. सर्व इटालियन व त्यांचा प्रचंड दारुगोळा, व युद्धा साहित्य मिळून आला.या युद्धामध्ये आपल्या कडील शहाहत्तर मराठी वीरांना वीर गती प्राप्त झाली होती.या युद्धात खातगुण गावचे दुसरे सुपुत्र श्री. नामदेव विठू लावंड, श्री मारुती रामा लावंड. तर पुसेगावचे श्री विठ्ठल जाधव व महादेव तोडकर यांचा सहभाग होता.या युध्दात मारुती रामा लावंड.यांना वीरगती प्राप्त झाली होती.या रणसंग्रामाची दखल इंग्लिश साम्राज्याची राणीने  घेतली.ज्या शहाहत्तर मराठा वीरांना वीरगती प्राप्त झाली त्या सर्वांच्या नावांचा उल्लेख करुन इंग्रजांनी स्मृतिस्तंभ बांधून लिहीला आहे.श्रीरंगराव लावंड यांचे कार्य व कर्तृत्व पाहून यांना "मिलिटरी क्राॅसऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर" (M, C, O, B, I)  हा किताब देऊन सन्मानित केले.या किताबाने त्यांच्या तीन पिढ्यांना पेन्शंन मिळाली होती. हा एक सन्मान होता. सदर युद्धापासून  मराठा लाईट इन्फंट्री बेळगाव यांना जी "श्री छत्रपतीशिवाजी महाराज की जय"  ही बंदी असलेली घोषणा देण्याची परवानगी कायम स्वरूपी मिळाली. याचे सर्वश्रेय कॅप्टन श्री रंगराव  कृष्णाजी लावंड. यांचे नावावर गॅझेटमध्ये नोंद झालेली आहे. तसेच इंग्रज सरकारनेत्यांना"रावबहादूर "ही पदवी पण दिली होती.त्याचे खरे कारण असे होते की, केरण पहाडी जिंकल्यानंतर जागतिक युध्दाचे पारडे फिरले. मुसोलिनी आणि हिटलरच्या सैनिकाची पीछेहाट होऊ लागली. रशियन सैन्य जर्मनीत घुसले. कालांतराने हिटलर या हुकूमशहाचा सर्व बाजूंनी पराभव झाल्याने त्याने आत्महत्या केली.तरी पण युध्दाचे पारडे हे केरण पहाडी जिंकल्यामुळे झाले होते. म्हणून त्यांना रावबहादूर ही पदवी देण्यात आली. या भिम पराक्रमामुळे श्री रंगराव लावंड यांना पहाण्यासाठी अनेक लोकांची गर्दी  वाढत होती. पारतंत्र्यात खातगुण गावची प्राथमिक शाळा ही पडक्या बंगल्यात भरत होती.तो काळ निसर्ग नियमाने समृध्द होता. श्रीरामओढ्याला पावसाळ्यात तीन चार महिने सतत महापूर येत होते. त्यामुळे गावातून शाळेत येणाऱ्या मुलांची खूप गैरसोय होऊ लागली. श्रीरंगराव लावंड यांनी मोठ्या मनाने मराठी शाळेसाठी गावालगत, अत्यंत मोक्याची पाऊण एकर जमीन व पोलादी घंटा गावाला सर्वांसमक्ष दान केली. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस गावच्या मातीत थोर भूमिपुत्र झाला.कॅप्टन श्रीरंग कृष्णाजी लावंड यांचे पश्चात मिलिटरी इंडियन आर्मीचा वारसा पुढच्या पिढींनेही असाच चालवला आहे. त्यांचा मुलगा संपतराव श्रीरंगराव लावंड हे कर्नल पदावरुन निवृत्त झाले.त्यांचा नातू श्री विक्रमसिंह लावंड अरुणाचल प्रदेशात बिग्रेडीयर पदावर अजूनही कार्यरत आहे.इंडियन आर्मीचा सलग तीन पिढ्यांचा वारसा त्याचे नावे नोंद आहे.बहादूर साहेब रिटायर झाल्यानंतर खातगुणला बंगल्यात निवास करुन होते.अखेरचा श्वास तेथेच घेतला.स्वतःच्या अतुलनीय कार्य  कर्तृत्वामुळे व श्री सेवागिरी महाराजांचे आशीर्वाद पाठीशी असल्याचे लक्षात येते. बहादूर साहेब देशसेवेच्या आघाडीवर असताना कोल्हापूरचे महाराज शहाजीराजे छत्रपती यांची कॅप्टन साहेबांशी ओळख झाली. रिटायरमेंट नंतर महाराजांचे आग्रहास्तव कोल्हापूर संस्थानामधील कारभाराची पहाणी करण्यासाठी सेवेत ऋजू करुन घेतले होते. कोल्हापूर येथील शाही स्टेशन बंगला वास्तव्यासाठी दिला होता.पुर्वी दवाखाने फक्त कोल्हापूरला होते.कोल्हापुरला गावातील गरिब कोणीही व्यक्ती उपचारासाठी गेल्या नंतर त्यांची सर्व सोय साहेब आपल्या स्टेशन बंगल्यात करीत होते. गावातील कितीही लोक बंगल्यात आले तरी सर्वांना ते आदराने पाहुणचार देत होते. 
(प्रा. संभाजी लावंड. वाई.)