NC Times

NC Times

प्रचंड थकवा तरीही लेकीसाठी भाषण,बारामतीकरानो सुप्रियाचा ऐतिहासिक निकाल द्या


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाकडे देशाचे नव्हे जगाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे असा निकाल अपेक्षित आहे की, तो ऐतिहासिक ठरवा. बारामतीच्या निकालामुळे महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील अशी अपेक्षा यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेत शरद पवार बोलत होते. या सभेला खासदार अमोल कोल्हे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, गेली अनेक वर्षे आपली सांगता सभा मिशन ग्राउंड येथे होत असते. मात्र राज्याची सत्ता असणाऱ्यांनी ते घेतले आहे. त्यामुळे मी दुसरे ठिकाण निवडले. कोणी काही करू, जोपर्यंत आपण एक आहोत, तो पर्यंत बारामतीकरांना कोणीही धक्का लावू शकणार नाही. बारामती लोकसभा निवडणुकीकडे जगाचे लक्ष आहे. राज्यात आणि देशात ज्यांची सत्ता आहे, ते सर्व सामान्य नागरिकांच्या, शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करत नाही. आज देशात शेतकरी संकटात आहे. हा देश कोणी, कसा चालवायचा यासंबधी निर्णय अपेक्षित आहे. बारामतीच्या विजयाचा निकाल ऐतिहासिक ठरला पाहिजे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेलाही बारामतीची चिंता
कन्हेरीच्या सभेत आपण दरवर्षीप्रमाणे प्रचाराचा नारळ फोडतो. तिथे एका कोपऱ्यात एक अनोळखी माणूस उभा होता. माझ्या लक्षात आले की ते पत्रकार असावेत. त्यांना मी बोलावून घेतले आणि विचारले तर ते म्हणाले मी अमेरिकेतून आलो आहे. त्यांनी सांगितले की, अमेरिकेत भारताच्या लोकशाही पद्धतीच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता असते. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलो आहोत. त्यामुळे आज बारामतीच्या निवडणुकीबाबत अमेरिकेलाही चिंता आहे, असे पवार यांनी आवर्जून सांगितले.
बाप तो बाप रहेगा...
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराच्या सांगता सभेच्या स्थळी ‘बाप तो बाप रहेगा’ अशा आशयाची बॅनरबाजी करण्यात आली. सातारा येथे झालेल्या भर पावसातील सभेतील शरद पवार यांचा फोटो देखील या सभास्थळी कार्यकर्त्यांकडून झळकवण्यात आले होते. सभास्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवार यांच्या भाषणातील काही वाक्य लावण्यात आली होती.