NC Times

NC Times

भ्रष्टाचाराचे आरोप काय माझ्यावरच झालेत काय?-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

 
नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-काही जण सांगतात की, आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाहीत. अहो पण भ्रष्टाचाराचा आरोप केव्हा होईल, तुम्ही मंत्री झाला तर होईल ना... खासदार, आमदारावर कशाला भ्रष्टाचाराचा आरोप होईल? भ्रष्टाचाराचे आरोप काय माझ्यावरच झाले आहेत काय? 'भूखंडाचे श्रीखंड खाल्ले' हा आरोप कोणावर आहे? गँगस्टर दाऊद इब्राहिमशी कुणाचे नाव जोडले गेले? हे कुणावर आरोप झाले? असे सवाल विचारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर प्रचंड हल्लाबोल केला. तुमच्यावर झालेल्या आरोपांत सत्यता नव्हती पण आरोप तर झाले ना... बदनामी तर झाली ना.. असे सांगत आपल्यावरही झालेल्या आरोपांत सत्यता नाही, असेच अजित पवार यांनी सुचविले.
बारामती लोकसभेच्या अनुषंगाने महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी बारामतीत वकील आणि डॉक्टरांचा मेळावा पार पडला. यावेळी अजित पवार यांनी केलेल्या भाषणात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
मी केलेली कामे सुप्रिया सुळे त्यांचे काम म्हणून सांगतात
अजित पवार म्हणाले, गेल्या दहा वर्षात आत्ताच्या खासदारांनी (सुप्रिया सुळे) बारामतीत नजरेत भरणारे कोणतेही एक विकासाचे काम केले असेल तर ते मला दाखवा.... मी ज्या ज्या इमारती उभ्या केल्या आहेत, त्या सगळ्या त्यांच्या परिचय पत्रकामध्ये छापल्या आहेत. मी तर म्हटलं, ही सगळी कामे मीच केली आहेत. मी रात्रंदिवस राबलो. चार चार-पाच पाच आर्किटेकला घेऊन बसलो. बारामतीकरांना अभिमान वाटेल, अशा इमारती मी उभ्या केल्या, पण त्याचे श्रेय दुसऱ्यानेच घेतले, अशा शब्दात अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका केली.
शरद पवार यांच्या 'बाहेरच्या पवार' वक्तव्याचा अजित पवार यांच्याकडून समाचार
मी कधीही भेदभाव केला नाही. ४०-४० वर्ष एकदाच्या घरात सून येऊनही तिला परके कधी मानले नाही. ती शेवटी घरचीच झाली ना... परंतु काही जण परकी मानतात. महिलांनी याच्याबद्दल बारकाईने विचार करायला पाहिजे. कारण तुम्हीही कुठे ना कुठे सून म्हणून आला आहात. तुम्ही सून म्हणून आल्यानंतर मालकीन झालात आणि तुम्हाला जर घरातील वरिष्ठ परकी म्हटले तर तळपायाची आग मस्तकापर्यंत जाणार नाही का..? असे म्हणत अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.