NC Times

NC Times

पवार कुटुंबात यंदा कन्हेरीचा मारुती कोणाला पावणार ?


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-१९६७ पासून पवार कुटुंबिय निवडणूक कोणतीही असो, त्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांच्या गावच्या कन्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ वाढवूनच करत आले आहेत. आता १९ रोजी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची सुरुवात मारुती मंदिरातून होत आहे. बदललेल्या राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर कन्हेरीचा मारुती यंदा कोणाला पावणार, याकडे आता लक्ष लागले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी १९६७ला प्रथम आमदारकीची निवडणूक लढवली. त्यावेळेपासून मारुती मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला जातो. ही परंपरा आजही जपली गेली आहे. यंदा मात्र राष्ट्रवादीतील फूटीची किनार या सगळ्या गोष्टींना आहे.
१९६७नंतर जेवढ्या वेळी खासदारकी आमदारकीच्या किंवा अगदी जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या निवडणूका झाल्या, त्या प्रत्येकवेळी येथे नारळ वाढवूनच प्रचाराची सुरुवात केली गेली आहे. कन्हेरीच्या मारुतीने पवार कुटुंबाला भरभरून आशीर्वादही दिल्याचे आजवर दिसून आले आहे. पवारांच्या काटेवाडी गावचाच हा एकेकाळी हिस्सा होता. पुढे ग्रामपंचायतीचे विभाजन होवून कन्हेरी स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. परंतु तरीही पवारांचे गाव अशी ओळख काटेवाडीप्रमाणे कन्हेरीला आहे.
उद्या १९ एप्रिल रोजी सुळे यांच्या प्रचाराची सुरुवात येथून होईल. तदनंतर महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्याही प्रचाराची सुरुवात कन्हेरीतूनच होईल. त्याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. ती लवकरच होईल. यंदा राष्ट्रवादीत फूट पडून दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे कन्हेरीचा मारुती कोणाला पावणार याकडे लक्ष लागले आहे.