NC Times

NC Times

एकनाथ खडसे यांनी शरद पवार पक्षाचा राजीनामा देवून सुनेसाठी मैदानात


नवचैतन्य टाईम्स जळगाव प्रतिनिधी(संजय फरांदे)- भाजपमध्ये अडगळीत पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊन आमदारकी मिळवून राजकीय पुनर्वसन झाल्यावर आणि आपल्यावरील भ्रष्टाचाराचे डाग 'अदृश्य शक्ती'कडून मिटवून घेतल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर भाजपमधील श्रेष्ठींनी त्यांचा प्रवेश कोणत्याही कारणांशिवाय वेटिंगवर ठेवलेला असताना त्यांनी आपल्या सूनबाई रक्षा खडसे यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीचा राजीनामा दिल्यानंतर मी कुणालाही बांधिल नाही, असे सांगत त्यांनी सोमवारी रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी बैठका घेतल्या.
रावेर लोकसभेत मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे या तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथराव खडसे हे प्रथमच प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे जाहीर करून १५ दिवसांचा कालावधी उलटला तरी त्यांचा भाजप प्रवेश रखडलेला आहे. त्याचमुळे एकनाथराव खडसे गेली दोन आठवडे सूनबाई रक्षा खडसे यांच्या प्रचारापासून अलिप्त होते. परंतु काही कारणांनी प्रवेश होत नसल्याचे पाहून एकनाथ खडसे यांनी अखेर स्वत:च प्रचारात भाग नोंदवून सूनबाईंना विजयी करण्यासाठी कंबर कसली.
रक्षा'ला निवडून द्या
एकनाथ खडसे यांनी सोमवारी फैजपूर येथील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेऊन या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात त्यांनी रक्षा खडसे यांना निवडून देण्याचे मतदारांना आवाहन केले.
..तेव्हा मी आमदारकीचा राजीनामा देईन
पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला मात्र आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही, याकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता, ते म्हणाले "जेव्हा शरद पवार मला आमदारकीचा राजीनामा मागतील तेव्हाच मी आमदारकीचा राजीनामा देईन"                                                                    मी कोणत्याही पक्षाचा बांधील राहिलो नाही
मी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे मी कोणत्याही पक्षाचा बांधील राहिलो नाही. त्यामुळे मी आता कुठल्या पक्षाचा प्रचार करावा हे मी ठरवणार आहे, असे सांगत सूनबाईंच्या प्रचाराला त्यांनी प्रारंभ केला आहे.