NC Times

NC Times

गीता अरुण गवळी यांना मुंबईची महापौर होईपर्यंत पाठिंबा - राहुल नार्वेकर


नवचैतन्य टाईम्स  मुंबई प्रतिनिधी (नेहाल हसन) मीवीस वर्षांपासून सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टात प्रॅक्टिस करत आहे. मी विधानसभेचा अध्यक्ष आहे, मला माझे अधिकार माहित आहेत. तुमच्या आशीर्वादाने मला भविष्यातही अधिक जबाबदारी मिळेल. पण मी अखिल भारतीय सेनेचा हात कधीही सोडणार नाही, अशी ग्वाही भायखळा येथे अभासेच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिली.
आज, अखिल भारतीय सेनेच्या कुटुंबात एक नवीन सदस्य सामील झाला आहे, हे गृहीत धरा. मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी (स्वतःला) पाठिंबा मागत नाहीये, तर मी माझ्या बहिणीला (गीता गवळी) मुंबईची महापौर होईपर्यंत पाठिंबा देईन, असा शब्द राहुल नार्वेकर यांनी दिला.
गीता गवळी आणि ‘डॅडी’ (अरुण गवळी) यांच्याकडून जे प्रेम अभासेच्या कार्यकर्त्यांना मिळाले, तेच प्रेम त्यांना माझ्याकडून मिळेल. अशी मी तुम्हाला खात्री देतो, असंही नार्वेकर म्हणाले.
 कुख्यात गुन्हेगार अरुण गवळी याची मोठी मुलगी गीता गवळी २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत अभासेतर्फे निवडून आलेली एकमेव नगरसेविका होती. २०१७ च्या निवडणुकीवेळी शिवसेना आणि भाजपमध्ये फाटाफूट झाल्याने दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे मुंबई महापालिकेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. गीता गवळींना गळाला लावण्याचे प्रयत्न दोन्ही पक्षांनी केले होते, परंतु त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या आठवड्यात नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या गुंड-राजकारणी अरुण गवळीची लवकर सुटका करण्याचे निर्देश दिले.
 २०१२ मध्ये गीता गवळी आणि त्यांची मावशी वंदना या दोघीही नगरसेवकपदी निवडून आल्या होत्या. त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यामुळे २०१२ ते २०१७ या कालावधीत आरोग्यासारख्या महत्त्वाच्या समित्यांच्या प्रमुखपदी त्यांना संधी देण्यात आली होती.
१० जानेवारी २००६ च्या सरकारी अधिसूचनेनुसार मुदतपूर्व सुटकेचा दावा फेटाळल्याच्या प्रकरणात अरुण गवळीच्या फौजदारी याचिकेला न्यायमूर्ती विनय जोशी आणि वृषाली जोशी यांच्या खंडपीठाने परवानगी दिली. त्याच्या सुटकेबाबत चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे निर्देश सरकारला देण्यात आले आहेत.