NC Times

NC Times

२०१९मधील शपथविधीवर अजितदादांनी सगळंच सांगितलं


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-      २०१९मधील देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या शपथविधीची चर्चा आजही होते. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा एकदा उजळला जातोय. बारामतीच्या मतदारसंघात वेगवेगळ्या ठिकाणी सभांमध्ये अजित पवार हा मुद्दा स्वतःच सांगत आहेत. आज देखील त्यांनी बारामती तालुक्यातील सांगवी गावामध्ये हाच मुद्दा पुन्हा लोकांपुढे मांडला.
अजित पवार म्हणाले की, २०१९ च्या शपथविधी विषयी अनेकदा बोलले जाते, पण खरे तर पुलोद सरकार यशवंतराव चव्हाण यांचा विरोध धुडकावून शरद पवारांनी स्थापन केले होते ते तुम्हाला माहित आहे ना? सगळा इतिहास तुमच्यासमोर आहे. मी कोणतीही गद्दारी केली नाही. २०१९ च्या काळामध्ये सरकार स्थापन करायला वेळ होत होता. वेळ जात होता. मोदींनी राष्ट्रपती राजवट लावली होती. साहेबांनी ही सूचना त्यामध्ये केली होती आणि त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागली. त्यानंतर अचानक नेहरू सेंटरमध्ये मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत पवार साहेबांचे काही खटके उडाले. त्यानंतर पवार साहेब चिडून तिथून निघून गेले आणि यांच्याबरोबर आपल्या सरकार स्थापन करायचं नाही असे म्हणाले.
 त्यामुळे मी इतर वरिष्ठांशी चर्चा केली आणि साहेबांचा अपमान तो आपल्या सगळ्यांचा अपमान, त्यामुळे आपल्याला यांच्यावर सरकार स्थापन करायचं नाही, असे म्हणून मी जयंत पाटलांना सांगितले की, मी वर्षावर जातो आणि मी वर्षा निवासस्थानी गेलो. देवेंद्र फडणीस यांना भेटलो. मग देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांशी चर्चा केली. त्यावेळी राष्ट्रपती राजवट लागली होती अमित शहांनी काही वेळातच सांगितले. तो निरोप मला देवेंद्र फडणवीस यांनी दिला की, उद्या सकाळी आठ वाजता शपथविधी होणार, असं अजित पवारांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, खरे तर हा शपथविधी पहाटेचा झालेला नाही, पण मीडिया सातत्याने पहाटेच्या पद्धती पहाटेचा शपथविधी म्हणते. तर आठ वाजता हा शपथविधी झाला. मात्र त्यापूर्वी चर्चा करायला जाताना जयंत पाटलांनी मला पूर्ण दरवाजा बंद करू नका थोडीशी फट ठेवा असे सांगितले. जयंत पाटलांनी असे का सांगितले? मला आश्चर्य वाटले. मी त्यांना पुन्हा एकदा म्हटलं की, फट ठेवा म्हणजे? ते म्हणाले, चर्चेसाठी थोडीशी फट ठेवा आणि त्यानंतर हा शपथविधी घडला. खरे तर हे सगळे सांगण्यावरूनच घडले होते परंतु मला व्हिलन बनवले गेले.