NC Times

NC Times

एकटक पाहत बसला म्हणून तरुणींना राग अनावर; मित्राला बोलावून चाकूने वार करुन युवकाची हत्या


नवचैतन्य टाईम्स  नागपूर प्रतिनिधी(संजय फरांदे)-  नागपुरात एका वादातून हत्येची घटना घडली आहे. टोमणे मारण्यासह एकटक बघितल्याने चाकूने वार करून युवकाची हत्या करण्यात आली. ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मीनगर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन तरुणींसह तिघांना अटक केली. हत्येच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या तरुणींविरुद्धची ही अलीकडच्या काळातील पहिलीच कारवाई आहे.
 रणजित बाबुराव राठोड (वय २८, रा. ज्ञानेश्वरनगर) असे मृतकाचे नाव आहे. अटकेतील मारेकऱ्यांमध्ये आकाश दिनेश राऊत (वय २५, रा.हसनबाग), जयश्री दीपक पानझाडे (वय २४) आणि सविता सायरे (वय २४, दोन्ही रा. वाडी) यांचा समावेश आहे.
 रणजितचे किराणा दुकान असून तो कापडाचाही व्यवसाय करायचा. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११.२० वाजताच्या सुमारास रणजित हा महालक्ष्मीनगरमधील पान ठेल्यावर आला. याचदरम्यान कापड खरेदी करुन परत जाताना जयश्री आणि सविताही पान ठेल्यावर थांबल्या. रणजित हा त्यांना एकटक बघायला लागला. त्याने टोमणे मारले. दोघींनी त्याला जाब विचारला. यावरुन त्यांच्यात वाद झाला.
 जयश्रीने तिच्या ओळखीचा आकाश याच्या मोबाईलवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली. जयश्रीच्या फोननंतर आकाश तेथे आला. त्याने रणजितसोबत वाद घातला. त्यानंतर चाकूने त्याच्या पोटावर आणि छातीवर वार केले. रणजित रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला. त्यानंतर आकाश, जयश्री आणि सविता हे तिघे पसार झाले.
 घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पंचनामा करुन पोलिसांनी रणजितचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला.
पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन दोन तरुणींसह तिघांना अटक केली. आज तिघांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.