NC Times

NC Times

उन्हाळ्यात आरोग्य संवर्धन करणारे धने

 
नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)- प्रभू रामचंद्राचा जन्म असो किंवा कृष्णजन्म  सोहळा असो,सुंटवडा तर पाहिजेच ना धनत्रयोदशीला आरोग्य देवता धन्वंतरी यांच्या जयंतीला देखील प्रसाद म्हणून धणे व गुळाची निवड केली आहे.पावसाळा असो,हिवाळा असो,नाहीतर उन्हाळा असो,सर्व रुतुतील आरोग्य सखा असे धण्याला म्हटले तर वावगे ठरणार नाही.याचे कारण आहे सर्व  रुतुत शरीरातील त्रिदोषांचा समतोल राखण्याचे सामर्थ्य धण्यांमध्ये आहे.यातील असंख्य गुणांमुळे धण्यांना शुभ समजले जाते व अनेक शुभप्रसंगी, धण्याचा गुळाबरोबर वाटून नैवेद्य दाखवला जातो.उन्हाळ्यात तर धण्यांचा स्वास्थ राखण्याबरोबर रोग निवारणासाठी देखील उत्तम फायदा होतो.हे फायदे मिळण्यासाठी नवीन धणे वापरावे.त्याच्या एक एक गुणाचा उलघडा करुया.

 तृष्णानाशक...वाढत्या उष्णतेने व घामाचे प्रमाण वाढल्याने  उन्हाळ्यात तहान जास्त प्रमाणात लागते  विशेषतः पित्त प्रकृतीच्या व्यक्तीना शरीरात उष्णता जास्त असल्याने प्रमाणाबाहेर तहान लागते धने पित्ताचे शमन करतात.व अति प्रमाणातील तृष्णा कमी करतात.यासाठी उकळी आलेल्या पाण्यात भरडलेले धने भिजवावे काही तासानी गाळून त्यांत खडीसाखर घालून हे पाणी वारंवार प्यावे.
 ज्वर...धने उत्तम ज्वर नाशक आहेत.याने ताप कमी होण्यास मदत होते.तापामध्ये लागणारी तहान वर सांगितलेल्या  प्रमाणे धन्याच्या पाण्याने नियंत्रणात येते.यात बेदाणे घातल्यावर जास्त फायदा होतो.तापानंतर शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी देखील या पाण्याचा फायदा होतो.
 दाह... उष्णतेमुळे किंवा पित्तामुळे पोटात होणारा दाह धणे व खडीसाखर खाल्याने कमी होतो.धणे शरीरातील उष्णता कमी करतात.हिरवे धने विशेषतःदाह कमी करुन शरीरात थंडावा आणतात.उन्हात गेल्यावर येणाऱ्या तापामध्ये शरीराचा दाह होतो.यावर धणे विशेष गुणकारी आहेत.
 उन्हाळी लागणे... उन्हाळ्यात वारंवार होणाऱ्या या त्रासासाठी धण्याचे पाणी हा खात्रीशीर उपाय आहे.उन्हाळ्यात उष्णता वाढल्याने ! किंवा   पाण्याचे प्रमाण कमी पडल्याने लघवीला  वारंवार होते.वेदना होतात व आग  होते.धण्याने उष्णता कमी होवून लघवीचे प्रमाण वाढते.याने आग कमी होते.वरचेवर होणारी लघवी व वेदनायुक्त मुत्रप्रवृत्ती ही लक्षणे त्वरीत  कमी होतात.मुत्रमार्गाच्या इतर तक्रारी देखील धने व कोथिंबीराचा  आहारात समावेश करावा
 पचन कार्य...उन्हाळा म्हणजे वर्षभराचे पदार्थ करण्याचा रुतु यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे मसाले.भोजनातील विविध पदार्थाबरोबर जिभेच चोचल पुरविण्यासाठी लागणारे विविध मसाले जसे काळा मसाला,गोडा मसाला,गरम मसाला हे धण्याशिवाय होत नाहीत.मसाल्यातील प्रमुख घटक असल्याचे कारण असे की धणे पचनासाठी मदत व भूक वाढवितात.त्याचबरोबर यातील स्निग्धतेने व उष्णता कमी करण्याच्या  गुणाने,मसाल्यातील इतर उष्ण व तीष्ण पदार्थाचा समतोल राखला जातो.धण्याला एक प्रकारचा सुगंध असल्याने मसाला व्यतिरिक्त केवळ धण्याची पूड देखील पदार्थामध्ये घालण्याची पध्दत आहे.ज्यांना मसाल्याने त्रास होतो.त्यांच्या अन्नाला उत्तम चव व गंध देण्याचे काम या धण्यातील सुंगधी तेलामुळे होते.
 मधुमेह....धण्याने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.पित्त प्रकृती असलेल्या मधुमेहींनी आहारात धण्याचा वापर अवश्य करावा.प्रत्येक स्वयंपाक घरात धने असतात.गरज आहे त्याचा कुशलतेने वापर करुन आरोग्य संवर्धन करण्याची धण्याचे गुणधर्म समजल्यावर उन्हाळ्यात आरोग्य संरक्षण व रोग निवारणासाठी याचा वापर आपण सगळे आवश्य कराल यांची खात्री बाळगुया.