NC Times

NC Times

कल्याणमध्ये भाजप आमदाराची पत्नी थेट उबाठा गटाच्या प्रचाराला


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)- कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सुरूवातीला बंडाची भूमिका घेतली परंतु नंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगून त्यांनी महायुतीचा प्रचार करू, असे जाहीर केले. परंतु त्यांच्या मनात वेगळेच राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण कल्याणमधून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्याविरोधातील ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या प्रचाराला आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नीने उपस्थिती लावल्याने राजकीय भूकंप झाला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा वैशाली दरेकर यांना छुपा पाठिंबा असल्याची चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
 महायुतीचे अपेक्षित उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे तर ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर राणे यांनीही शिवसैनिकांच्या भेटीगाठी घेत प्रचाराची मशाल पेटवली आहे. यामुळे महायुती विरुद्ध महाआघाडी अशी लढत होणार हे स्पष्ट असले, तरी महायुतीचा घटक पक्ष असलेल्या भाजपचे कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात नाराजी आहे. वरवर ही नाराजी संपल्याचे सांगितले जात असले, तरी ही नाराजी संपली नसल्याचे वारंवार दिसत आहे.
 वैशाली दरेकर, सुलभा गायकवाड आणि संजय राऊत यांचं जंगी स्वागत
मलंगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोरपे गावात मंदिराच्या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थिती लावली होती. संजय राऊत यांच्यासोबत कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर या उपस्थित होत्या. दरम्यान, गावात त्यांचे जंगी स्वागत झाले. जंगी स्वागताच्या वेळी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड याही उपस्थित होत्या. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मंदिराच्या कार्यक्रमाला तिघेही आले होते. यावेळी वैशाली दरेकर यांनी तिथे प्रचार करण्याची संधी सोडली नाही.
 प्रचाराचा नव्हे तर मंदिराचा कार्यक्रम, गायकवाड यांची सावध भूमिका
याबाबत वैशाली दरेकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मंदिराच्या कार्यक्रमाला आले होते. सुलभा गायकवाड यांच्याशी मात्र संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान गायकवाड यांच्या समर्थक यांच्याकडून सांगण्यात आले की सदर कार्यक्रम हा मंदिराचा होता, प्रचाराचा नाही. आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा यांना कार्यक्रमाला आमंत्रित केले होते, त्यामुळे त्यांचे जंगी स्वागत केले, बाकी यात कोणतेही राजकारण नाही.
याआधीही सुलभा गायकवाड आणि वैशाली दरेकर यांची भेट
कल्याण पूर्व येथील गुढीपाडवा स्वागत यात्रेत कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाडही या ठिकाणी उपस्थित होत्या. यावेळी दोन्ही महिला नेत्यांनी एकमेकींना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. तसेच एकमेकींसोबत फोटोही काढले.