NC Times

NC Times

रामनवमी का साजरी केली जाते? रामनवमीचे महत्त्व


रामनवमी या वर्षी १७ एप्रिलला देशभरात उत्साहात साजरी केली जाणार आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी केली जाते. या वर्षी अयोध्येत राम मंदिराची निर्मिती झालेली आहे, त्यामुळे रामनवमी खास ठरणार आहे आणि त्यामुळे रामनवमीबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता वाढलेली आहे. अयोध्येत राम मंदिरात रामनवमीच्या निमित्ताने भगवान रामलल्लांना सूर्यतिलक होणार आहे. त्रेतायुगात चैत्र शुक्ल नवमीला भगवान श्रीराम यांचा जन्म झाला. या वर्षी अयोध्यानगरीत भगवान श्रीरामांचा जन्मोत्सवासाठी सजलेली आहे. तर आपण जाणून घेऊ रामनवमीचा इतिहास, महत्त्व, महात्म्य आणि या दिवशी कोणते शुभ योग बनत आहेत.
 ‘रामनवमी’ केव्हा आहे, जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार रामनवमी या वर्षी १६ एप्रिलला दुपारी १ वाजून २३ मिनिटांनी सुरू होत आहे. तर रामनवमीचा समारोप ३ वाजून १४ मिनिटांनी होणार आहे. उदया तिथीच्या मान्यतेनुसार रामनवमी १७ एप्रिलला साजरी होईल. राम नवमीच्या दिवशी चैत्र नवरात्राचा समारोप ही होत आहे. जे लोक नवरात्रीचा व्रत करत आहेत, त्यांनी रामनवमीचे पारायण करून नवरात्रीचे व्रत पूर्ण करावे.
‘रामनवमी’ला होत आहेत, हे शुभयोग
रामनवमीच्या दिवशी पूर्ण दिवस रवी योग साकारत आहे. या काळात रामनवमीच्या दिवशी भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. याच दिवशी आश्लेषा नक्षत्र पूर्ण रात्रीपर्यंत आहे.
 ‘रामनवमी’ पूजेचा शुभ मुहूर्त
रामनवमी पूजेचा शुभ मुहूर्त ११ वाजून ५० मिनिटांपासून ते १२ वाजून २१ मिनिटांपर्यंत सर्वोत्तम वेळ आहे. तसेच ११ वाजून ५० मिनिटांपासून ते १ वाजून ३८ मिनिटांपर्यंतची वेळही पूजनासाठी घेता येईल.
 ‘रामनवमी’चे महत्त्व आणि महात्म्य
राम नवमीच्या महत्त्वाबद्दल पौराणिक मान्यता आहेत. चैत्र शुक्ल नवमीच्या दिवशी अयोध्येत राजा दशरथाच्या घरी माता कौशल्याच्या पोटी विष्णू अवतार श्रीरामांचा जन्म झाला. तेव्हापासून हा दिवस रामनवमीच्या रूपात भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मंदिरात, मठांत यज्ञ, हवन, महाप्रसाद यांचे आयोजन केले जाते. या दिवशी घरी पूजाविधीचे आयोजन केल्याने घरी सुख आणि समृद्धी वाढते आणि माता लक्ष्मी प्रसन्न होते. माता सीतेला लक्ष्मी स्वरूप मानले आहे. त्यामुळे भगवान श्रीरामाच्या जोडीने, माता सीतेची पूजा केल्याने आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या घरी धनवृद्धी होते.