NC Times

NC Times

गुराखी कथासंग्रहाचे मराठी साहित्यात दमदार आगमन-डॉ. रघुनाथ केंगार


प्रा. संभाजी लावंड हे कवी,साहित्यिक, गायक,शिक्षक आणि सदाचारी माणूस म्हणून आज पर्यंतआयुष्य जगलेआणि आजही जगत आहेत. त्यांची जन्मभूमी श्री सेवागिरीच्या पुसेगाव नजिक खातगुण हे खेडेगाव.पण उदरनिर्वाहा साठी निसर्गरम्य थंड हवेच्या महाबळेश्वर जावळी तालुक्यातील तळदेव, तापोळा,कांदाट खोऱ्यात मेढा जवळील सावली,आणि प्रतापगडाच्या पायथ्याशीअसणाऱ्या वाडा कुंभरोशी येथे त्यांनी शिक्षक म्हणून इमाने इतबारे व प्रामाणिकपणे नोकरी केली. ते महाबळेश्वर नजिक कृष्णाकाठी वाई शहरात स्थायिक झाले,असे असली तरी त्यांची नाळ त्यांच्या खातगुण या खेडे गावाशी घट्ट जोडलेली आहे. त्यांच्या मनात त्यांचे खातगुण हे खेडे गाव या गावाकडची माणसं शेती, शिवार, घर करुन राहिले आहे. त्यांनी बालवयात पाहिलेले खातगुण हे खेडेगाव या गावाकडच माणसं, तेथील अठरा पगड जाती जमातीची संस्कृती, हिंदू मुस्लिम ऐक्याची संस्कृती , खातगुण शिवारात रात्रंदिवस काबाडकष्ट कष्ट करणारी माणसे, त्यांची संस्कृती रितीरिवाज नाते संबंध जे जसे पाहिले, अनुभवले ते तसेच्या तसे निर्मळपणे गुराखी या कथा संग्रहातील कथा मधुन शब्दबध्द केले आहे.
गुराखी या कथासंग्रहात एकूण चोवीस कथा आहेत.ढोबळ मानाने १) खेडेगावातील कथा २)शिवारातील कथा ३),दारिद्र्याशी झुंजणाऱ्या आई वडीलांवरील कथा .४)गावाकडचे खेळ आणि बाल खोड्या संबंधीच्या कथा, ५)शालेय जीवनावरील आणि शिक्षणक्षेत्रावरील कथा अशा प्रकारे
या कथासंग्रहातील कथांचे स्वरूप आहे.
१) खेडेगावातील कथा- निसर्गाच्या कुशीत श्रीराम ओढ्याच्या काठावर कधीकाळी वसलेले खातगुण हे खेडे गाव लेखक संभाजी लावंड यांनी कोणे एके काळी या कथेत या गावची प्राचीनता सांगताना जवळचअसलेल्या श्री राम ओढा आणि येरळा नदीच्या संगमावरील जुन्या प्राचीन हेमाडपंथी शिवालयाचा दाखला दिला आहे. या गावात विविध देवीदेवतांच्या मंदीरा बरोबर दर्गा, श्रीराम,हनुमान,श्री भैरव नाथ,वेताळ,व खारुबायचे ही आहे. येथे हिंदु मुस्लिम गुण्यागोविंदाने राह तात हे सांगितले आहे. "गावाकडची माती," "कंदील "आणि "पावसाळ्यातील सलसंमेलन "या तीन कथामधुन परसुआण्णा, राजाराम पाटील, वनीचा बाबु, लेखकाची आई, हालिम भाभी, माळ्याची मामी, गुणाताय,बबयवहिनी असे अनेक सुसंस्कारी स्त्री पुरुष ग्रंथवाचन,भजन, किर्तन शाहिरीतुन मंदीरातुन मनोरंजना बरोबर प्रबोधन करतात. रात्रीच्या वेळी स्त्रीयांच्या मौखिक संमेलनात त्या आपल्या सुखदुःखांना वाचा फोडतात. तसेच पुरुषांचे याशेन भाईच्या घरासमोरील कट्ट्यावरील विचारवेध संमेलन सुरु होते तेव्हा तेथील प्रत्येक जन अध्यक्ष, वक्तेआणि श्रोते असतात हे या गावातील संमेलनाचे वेगळेपण दिसते. "पाणवठा" या कथेत
पाणवठ्याचे पारंपरिक मुळ स्वरूप पहावयास मिळते. तसेच नंदी डोहातील विजु फायटरचा क्रुरपणा वडाऱ्याच्या गजीचा मृत्यू मनाला अस्वस्थ करतो."प्लेगाची साथ" या कथेत प्लेगाच्या रोगाच्या साथीमुळे गावातील मृत्यूचे थैमान दिसते. तर "शापवाणी"या कथेत लेखकाच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी भावकी कडुन लेखकाच्या आईवडिलांना पर्यायाने संपूर्ण कुटुंबाला झालेल्या त्रासाचे दाहक वर्णन आलेले आहे. भावकीच्या या त्रासावर केलेली मात वाचकांना अस्वस्थ करते. या कथा मधुन गावातील सदाचारी व दुराचारी माणसांचे गाव पातळीवरील दर्शन घडवले आहे.
2)शिवारातील कथा- पावसाची कृपा श्रीराम ओढ्याचे, येरळा नदीचे, नेर कनाॅलचे पाणी,काळी कसदार जमीन आणि शेतकऱ्याच्या कष्टकऱ्यांच्या अपार कष्टामुळे खातगुणचे "शिवार" सदैव विविध पिकांनी फला फुलांनी, शुपक्षांची समृध्द झालेले दिसते. हे शिवार कथेमध्ये सांगितले आहे. "गराखी "या कथेत गुरे राखणाऱ्या मुलांचा शिवारातील स्वैर मुक्त दिन क्रमआला आहे. तर "बाटुक" या कथेत बाटकाच्या विक्रीतून कौटुंबिक गरज व मुलांची हौस भागवणारे रामाकुसाचे कुटुंब दिसते. "उपटणी "कथेत जोंधळ्याच्या सुगीत जोंधळा उपटण्याच्या कष्टाचे वर्णन येते तर "अभिषेक "या कथेत शेतात राबणा ऱ्या शेतकऱ्यांच्या घामाला लेखक अभिषकाची उपमा देतात. "भुतावळ " ही कथा जगु सातारकरांच्या विहीरी जवळील वस्तुनिष्ठ जीवंत घडलेल्या घटनेवरउभी आहे. मळ्यातील वांगी तोडणाऱ्या शिवराम मामांना 'ए आर बास कर की', असे भुतांनी रोखल्यावर या मामांचा भितीने मृत्यू होतो. या कथे तील वर्णन अफलातून आहे. "दुष्काळ" कथेत1972 च्या अचानक दुष्काळा मुळे रोजी रोटीला महाग होऊन सुकटी वर जगणारी माणसं आणि पाण्या अभावी व चाऱ्या अभावी तडफडून मरणाऱ्या मोर, कोंबड्या, कुत्री इत्यादी पशुपक्षांचे मृत्यू हृदयाला पाझर फोड तात. 
३)दारिद्र्याशी झुंज देणाऱ्या आई वडी लांच्या वरील कथा--दारिद्र्य,भूक आणि आईवडिलांचे कष्ट याचे अचूक नाते  भूक आणि पिंडाला कावळा शिवला आणि "वरवंटा "या कथेमधुन दिसते." भूक "या कथेतील नायक नोकरीच्या निमित्ताने पुण्याला येतो. प्रचंड उपासमारीमुळे तब्बेत बिघडते. नायकाला चांगले जेवन जेवण्याची स्वप्ने पडतात. टिचभर पोटाची भूक शमवण्यासाठी रस्त्याकडेला टाक लेल्या नासक्या आंब्यातुन निवडक आंबे घेऊन खातो. ओहळातील स्मशानाच्या कडेला उतारा म्हणून ठेवलेला दहीभात, भाकरी व मटनाचे तुकडे खातो. "वरवंटा "या कथेतील नायकाचे वडील रामाकुसा आणि आईचे अपार कष्ट दिसते. ते सर्वजन राना माळात कष्ट करत असताना विरंगुळा म्हणून जोंधळ्याचा कोवळा गरम हुरडा, वल्या हारबऱ्याचा हावळा इत्यादी रानमेवा मुलांना खायला घालायचे. डोंबाऱ्याचा खेळ पोटाची खळगी भरण्यासाठी करणारी डोंबारी कसरत या कथेत दिसतात. "आणि पिंडाला कावळा शिवला" या कथेत नायकाने आईच्या कष्टावर तिच्या व्यक्तिमत्व आवर्जून प्रकाश टाकला आहे. सुखाचे दिवस आल्यावर नायक आईला विश्रांती मिळावी म्हणून वाई येथील बंगल्यात आणतो. पण काही दिवसातच ती म्हणते, 'मला गावी खातगुणला घालव, मला हित करमत न्हाय'.या तिच्या बोलण्यातून तिची गावाकडच ओढ दिसते. लेखकाने प्रतिकुल परिस्थिती असतानाही त्यावर मात करुन कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या आई वडिलांची व्यक्तिचित्रे येथे स्पष्टपणे अधोरेखीत केली केली आहेत.
4)गावाकडंचे खेळ आणि खोड्या
वरील कथा----गावाकडे बऱ्याच वेळा शाळेतील शिक्षकांची नजर चुकवून त्याचे दिलावर, लाल्या, कुमार, कासम बाळकृष्ण, टेकावला एकनाथ इत्यादी बालसवंगडी गावात आणि शिवारात पतंग, सुरपारंब्या, बटने, दगडी 
टक्सेल, हाडकी गोट्या, विट्टी दांडू, ईस्टाप लगोरी, फुटक्या तव्याची चाके फिरवणे, आसुड इत्यादी अनेक खेळ खेळायचे. बोरे काकड्या, सिताफळ, रामफळ,पेरु आंबे म्हवाचे पोळे, व रानमेवा खात वानराच्या टोळी सारखे दिवसभर मुक्त गावाकडचे खेळ"पतंग" आणि "देशपांडी शिवारातील खेळ" या कथा मधुन सविस्तर आले आहे.तसेच "उचापती" या कथेतील नायक आणि त्याचे बाल सवंगडी केसांवर फुगे मिळविण्यासाठी घरोघरी स्त्रियांचे केस मिळविण्यासाठी धडपडतात. पबा पोष्टमन भोवती' आमचं पत्र आलय का? "म्हणून गोंधळ घालतात. नायक गाडग्याच्या उतरंडीच्या  तळाच्या गाडग्यातुन कानावले काढण्याच्या नादात कडधांन्याने भरलेल्या उतरंडी ढासळतात तेव्हा गुपचूप दार लावून पसार होतो. श्री जोशी हेडमास्तरांचा चष्मा चोरतो. घरातील पैशाच्या डब्या तुन पैशे चोरल्यामुळे वडिलांनी हात पाय कोलदांड्यातअडकवून नायकाला खुंटीला अडकविले जाते. अशा प्रकारे नायकाच्या वर्तना मधुन उचापती खोर स्वभावाचे दर्शन घडते. 
5) शालेय जीवनावरील आणि शिक्षण क्षेत्रावरील कथा---नायकाचे शालेय जीवन "भूक," "पाटीदप्तर", "घंटा"
आणि "पतंग 'या कथा मधुन आले आहे."भूक "या कथेत नायकाचे त्याच्या उचापतीखोर स्वभावामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. बोर्ड परीक्षे नंतर पोटासाठी पुण्याला जावे लागते. पतंग व पाटी दप्तर कथेत शालेय जीवनानुभव नायकाने निर्मळपणे, निरागसपणे सांगितले आहेत. शाळेत उशिरा आलेले जोशी हेडमास्तर त्या दिवसाची रजा मांडुन,व्हरांड्यात एका अंथरलेल्या पोत्यावर बसुन  शालेय कामकाज करायचे.नायक आणि त्याचे मित्र श्री रामओढ्याच्या वाळुत पाटी दप्तर पुरुन पिशवीत करंज्या गोळा करायचे, खळायचे, हा अनुभव लक्ष वेधी असाच आहे. "घंटा "या कथेत शिक्षक म्हणून नोकरीस असलेला 
नायक निवडणुकीच्या निमित्ताने मतदान करण्यासाठी खातगुण गावा तील मराठी प्राथमिक शाळेतआल्या नंतर जुनी घंटा दिसल्यावर नायक तिला हळुवार स्पर्श करतो, तेव्हा त्याच्या डोळ्यासमोरुन प्राथमिक
शाळेचा जीवनपट भरकटतो. 
"कलंक "या कथेतील नायक आणि त्याचे कोकणातील दुर्गम आणि दुर्लक्षित ठिकाणी असलेल्या हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी ऋजु होतो. परंतू 
तेथील स्कूल कमिटीचे सदस्य, पालक, स्टाफ आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या विचित्र आणि संधीसाधू वर्तनामुळे तेथील शिक्षकावर पाणी पिण्याच्या स्टीलच्या टाकीत थायमीट टाकल्याचा आरोप होतो.शिस्त लावण्यासाठी शाळा सोडून कांदाटीत पोहणाऱ्या गणेश उतेकर या मुलाला शिक्षा केल्या वर त्याची माफी मागायला लावली जाते.भिमा  कावडी या म्हातारीची म्हैस प्लास्टिकचे कागद खाऊन मरते तेव्हा या घटनेत शिक्षकांना जबाबदार धरुन त्यांचेकडून पैशाची किंमत वसुल केली जाते.असे अनेक आरोप शिक्षकांवर ठेवून रात्री मंदिरात मिटींग घेऊन सर्व गाव कऱ्यां समोर माफी मागायला लावले जाते. असे शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करताना नायका स आलेले विदारक अनुभव अस्वस्थ करणारे आहेत. या आत्मकथा संग्रहातील  काही अपवाद वगळता बहुसंख्य कथा खातगुण गावआणि शिवारा भोवती  फिरतात. सर्वच कथांचे लेखन प्रथम पुरुषी असुन कथेतील नायक खातगुण गावचा पुर्व इतिहास,प्लेगा सारखी रोगराई,गावा तील हिंदु मुस्लिम ऐक्याची संस्कृती,
गाव गाड्यातील आठरापगट जाती, जमा ती,भावकीचा तिडा गरिबीवर मात कर ण्यासाठी कुटुंबातील आई वडील भावं डांचे कष्ट, शालेय जीवनातील खेळ, शिवारातील पिके,पशुपक्षी इत्यादी संबंधाने चित्रमय शैलीत वर्णन केले आहे. या आत्मकथा मधील विषय आणि आशय हृदय स्पर्शी आहेत.
लेखक संभाजी लावंड यांनी या आत्म कथा संग्रहात त्यांनी खातगुण गावचा पार शिवार आणि त्या मधील माणसं पशुपक्षी पाहिली अनुभवली ती तशीच शब्दबध्द केला.त्यांनी आपल्या आत्म कथा मध्ये विषय आशय घटनाआणि प्रसंगाची गुंफन वर्णनात्मक पध्दतीने केली आहे.व्यक्तिचित्रे रंग रुप स्वभावा सह चित्रमय शैलीत रेखाटले आहेत. त्यांची भाषाशैली ग्रामीण नाही, परंतु सर्वांना सहज समजेल अशी आहे. त्यामुळे या कथा संग्रहातील या कथा प्रवाही झाल्या आहेत. त्यामुळे त्यांचा गुराखी हा आत्मकथा संग्रह मराठी वाचकांमध्ये, समिक्षकां मध्ये वाचनीय ठरेल. बहुचर्चित ठरेल, आणि लक्ष वेधी ठरेल असा विश्वास वाटतो. त्यांना पुढील लेखन वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा!