NC Times

NC Times

अजित दादांनी सत्तेत जाण्यासाठी कुटुंबाला सोडले - रोहित पवार

 
नवचैतन्य  टाईम्स पुणे प्रतिनिधी  (रावसाहेब काळे)-लोकसभा झाल्यानंतर अजित दादांचा पक्ष राहील का? असा प्रश्न आता सामान्य जनतेला पडला आहे. कारण लोकसभेचे ९ तिकीट त्यांना मिळणार होते. ९ पैकी ४ जागा मिळाल्या ४ पैकी २ नातेवाईक आहेत. एक इम्पोर्ट केलेला नेता त्यांना उभा करावा लागला. लोकसभेनंतर त्यांचा शून्य निकाल लागणार असल्याचे भाकीत आमदार रोहित पवार यांनी केले.
 आमदार रोहित पवार आज इंदापूर दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी माध्यमांची संवाद साधला. रोहित पवार म्हणाले की, लोकसभेच्या निकालानंतर त्यांच्याबरोबर आज जे लोक आहेत. त्यांच्याबरोबर जे काम करत आहेत. ते त्यांच्याबरोबर न राहता चार-पाच आमदारांसह १२ जण भाजप बरोबर जाणार आहेत. तर २१,२२ लोक हे साहेबांच्या चर्चेत आहेत. याबाबत अभ्यास करून साहेब निर्णय घेतील. काही भाजपमध्ये आणि काही आमच्याबरोबर आले तर त्यांच्याकडे किती राहतील त्यामुळे आमदारकीचा प्रश्नच उरत नाही.
 राष्ट्रवादीतून फुटून बाहेर पडलेला लोकांना पुन्हा सोबत घेणार का? असा प्रश्न केला तर रोहित पवार म्हणाले की, पदाधिकाऱ्यांना १००% माघारी घेणार नाही. मात्र काही आमदारांना मुद्दामहून काही व्यक्तिगत अडचणी आणून तिकडे घेतले गेले होते. मात्र ते आमदार सुरुवातीपासून साहेबांबरोबर संपर्कात आहेत. ते आमदार तिकडे गेल्यापासून त्यांनी कधीही साहेबां विरोधात किंवा पक्षाविरोधात एकही वक्तव्य केलेले नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.
 महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या शुभारंभ निमित्त बारामतीतील आयोजित सभेत मंगलदास बांदल यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबाबत रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, पूर्वीचे दादा जे आम्हाला माहित आहेत. ते जर तेथे असते तर त्या व्यक्तीला त्यांनी शांत बसवलं असतं किंवा तेथून हाकलून दिलं असतं पण आज ते भाजपबरोबर गेले असल्याने दादा बदलले आहेत, असे म्हणावे वाटते. दुर्दैवाने हे बदललेले दादा कोणालाही आवडत नाहीत.
मागील काही दिवसांपासून दादा सातत्याने साहेबांबद्दल बोलतात. पूर्वी दादा लोकांच्या बाजूने भाजपच्या विरोधात बोलत होते. पण आता ते साहेबां विरोधात बोलत आहेत. त्यांना जे बोलता येत नाही. त्यासाठी भाड्याने आणलेल्या मांजरांच्या तोंडून बोलतात. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. असेही रोहित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या भाषणातून वारंवार काहीजण भावनिक करतील. त्याला बळी पडू नका. असे वक्तव्य करत आहेत. याबाबत रोहित पवार यांना विचारले असता ते म्हणाले की, दादा एका बाजूला भावनिक करू नका असे म्हणतात..तर दुसऱ्या बाजूला तेच स्वतः लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा.. असे म्हणत सुप्रियाताई अनेक वर्षांपासून खासदारकी लढवत आहेत जिंकत आहेत. लोकांना माहित आहे की, त्यांचा स्वभाव कसा आहे. साहेबांवर विश्वास ठेवून मतदार तुतारीला मतदान देऊन बहुसंख्येने निवडून देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 भाड्याने आणलेल्या व्यक्तीला सोडणार नाही...
अजितदादा स्टेजवर असतानाही एखादी व्यक्ती पवार साहेबांच्या विरोधात बोलत असताना दादा काहीच म्हणत नसतील. तर अशा भाड्याने आणलेल्या व्यक्तीला आम्ही लोकशाहीच्या मार्गाने सोडणार नाही, असे म्हणत त्यांनी नाव न घेता मंगलदास बांदल यांना इशारा दिला.
सत्तेत जाण्यासाठी कुटुंबाला सोडले....
इंदापूर तालुक्यात दुष्काळ पडलेला असताना अजित पवार वारंवार इंदापूर मध्ये येऊन ही ते दुष्काळाबाबत बोलत नाहीत. याबाबत प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले की, कदाचित ते विसरून गेले असतील की, आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहोत. सत्तेत आहोत. सत्तेत जाण्यासाठी त्यांनी खटाटोप केला. कुटुंबाला सोडले. आज त्यांना या गोष्टी आठवत नाही. आज सामान्य माणस अडचणीत आहेत. हे कोणाला दिसत नाही. आम्ही वारंवार हे प्रश्न शासन दरबारी मांडत आहोत. मात्र वरूनच निर्णय न झाल्यामुळे अधिकाऱ्यांनाही काहीच करता येत नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता चारा डेपो सुरू होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही.