NC Times

NC Times

काँग्रेस सोबत सांगलीच्या वादावर उद्धव ठाकरेंचं थेट उत्तर


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात सांगलीच्या जागेवरुन रस्सीखेच सुरु होती. त्यावर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं आहे. जागावाटपाबाबत जे काही व्हायचं होतं ते झालेलं आहे. आता यामध्ये चर्चा करण्यासारखं काहीही नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार आता जागावाटपाविषयी महाविकास आघाडीत पुढे जी काही चर्चा होईल ती २०२९ मध्ये होईल.
 विरोध पक्षांच्या सभेत सहभागी होण्यासाठी ठाकरे हे रविवारी दिल्लीत पोहोचले होते. यावेळी प्रसारमाध्यमांसमोर जागावाटपातील तिढ्याबाबत बोलताना सांगितलं की, महाविकास आघाडीत जागावाटपावरुन कुठलीही अडचण नाही. याबाबत जे व्हायचं होतं ते झालेलं आहे. उमेदवारांच्या नावं निश्चित झाल्यानंतर हे काँग्रेसलाही कळालं असेल.
 याबाबत राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करण्याची काहीही गरज नाही, कारण मित्रपक्षांमध्ये जागावाटपावरुन ओढाताण ही अखेरपर्यंत सुरु असते. भाजपसोबतही असं व्हायचं. हे मविआतही लागू होतं.
 उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच महाविकास आघाडीतील अंतर्गत वादावर उघडपणे आपलं मत मांडलं. त्यांनी सांगितलं की जागावाटपादरम्यान मतभेद सामान्य गोष्ट आहे. दोन-तीन महिन्यांच्या चर्चेनंतर आता जागावाटपाचा फॉर्म्युल्याला अंतिम रुप देण्यात आलं आहे. त्यामुळे आता काँग्रेस नेत्यांना समजलं आहे की त्यांना आता हे स्वीकारावच लागेल.
 सांगलीच्या जागेवरुन वाद
सांगलीच्या जागेवरुन मविआत वाद होता. येथे उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. तर काँग्रेसने दावा केला आहे की, उद्धव ठाकरेंनी मविआला विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतला आहे. काँग्रेसनेही सांगलीच्या जागेवर दावा ठोकला होता. काँग्रेसला विशाल पाटील यांना उमेदवारी द्यायची होती. पण, आता या जागेवर मैत्रिपूर्ण लढत होईल.