NC Times

NC Times

खानापूर तालुक्यातील वाळूज येथील बैलगाडा शर्यतीत तरुणाचा जागीच मृत्यू


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)-सांगलीच्या खानापूर तालुक्यात तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाळूजमध्ये उरूसातील बैलगाडा पळवण्याच्या कार्यक्रमात बैलगाडाच्या चाकाखाली आल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रोहन राजेंद्र घोरपडे (वय २३) असं निधन झालेल्या तरुणाचं नाव आहे.
उरूसासाठी बनवण्यात आलेल्या या बैलगाड्याचं चाक मोठं आणि वजनदार असतं. हे चाक अंगावरून गेल्याने रोहन गंभीर जखमी झाला. रोहनला तातडीने विट्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.
वाळूज गावात पिराचा उरूस सुरु असून खडी येथे बैलगाडे पळवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. या परंपरेंनुसार बैलगाडी पळवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. उरूस सुरू झाल्यानंतर एक बैलगाडा पळत असताना थेट बैलगाडा बघणाऱ्या माणसांच्या गर्दीत घुसला. या धावपळीत रोहन घोरपडे पळत असताना तो पाय घसरून पडला आणि त्याच्या अंगावरून बैलगाड्याचे चाक गेलं. अंगावरुन चाक गेल्यानंतर त्याला गंभीर दुखापत झाली आणि यातच त्याचं दुर्दैवी निधन झालं.
दरम्यान, रोहन घोरपडे त्याच्या मामा, आजी-आजोबांकडे राहत होता. त्याच्या वडिलांच्या निधनानंतर तो आजोळी लेंगरे या गावात लहानाचा मोठा झाला. पण नोकरीनिमित्त तो पुण्यात नुकताच स्थायिक झाला होता. लेंगरे गावातच यात्रेसाठी तो पुण्यातून आला होता. मित्रांसोबत उरूसातील बैलगाडा पळवण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी तो आला होता, पण इथेच त्याचा दुर्दैवी अंत झाला. त्याच्या अशा अचानक जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.