NC Times

NC Times

सांगलीत कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची कोंडी करू - मा.खासदार संजय राऊत

 
नवचैतन्य टाईम्स सांगली (प्रतिनिधी)-  काँग्रेसला सांगली मधील केडरची चिंता होती तर,  2019 सालीच काँग्रेस नेत्यांनी दुसऱ्या पक्षातून निवडणूक कशामुळे लढली? काँग्रेसच्या चिन्हावर लढण्यासाठी हातपाय का हलवले नाहीत? असे सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांना केले आहेत. संजय राऊत सध्या ठाकरे गटाचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बोलत होते. 
निवडणूका आल्या की सांगलीतील काही लोकांचा सूर्योदय होतो
संजय राऊत म्हणाले, चंद्रहार पाटील यांनी सांगलीची शान वाढविली. पण  काहींनी शेतकऱ्यांची कर्जे बुडवून  सांगलीची शान वाढवली. निवडणूका आल्या की सांगलीतील  काही लोकांचा सूर्योदय होतोय. 
चंद्रहार निवडून येणार नाही, असा प्रचार भाजप आणि संघाचे लोक करत आहेत, असं राऊत यांनी नमूद केलं. यावेळी संजय राऊत यांनी भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांची नक्कल करत टीका देखील केली. आमची सांगलीत कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याची कोंडी करू , असा इशाराही संजय राऊत यांनी दिलाय. 
१० वर्षांपासून सांगलीची जागा काँग्रेसकडे नाही
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, भाजपचे लोक एक नंबरचे खोटारडे आहेत. 10 वर्षांपासून सांगलीची जागा काँग्रेसकडे नाही. वसंतदादाच्या वारसदाराचा झालेला पराभव आम्हालाही सहन होत नाही. काँग्रेसला  सांगली मधील केडरची चिंता होती तर,  2019 सालीच काँग्रेस नेत्यांनी दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवण्याऐवजी हातपाय का हलवले नाहीत? आपले विमान 5 वर्ष कुठे भरकटले होते? असा सवालही संजय राऊत यांनी विशाल पाटील यांना केला. 
हिंमत असेल तर नरेंद्र मोदी यांनी सांगलीत प्रचाराला यावे
कारखानादाराच्या इशाऱ्यावर सांगली जिल्ह्यातील राजकारण चालणार नाही. चंद्रहार पाटील  सांगलीतून लोकसभेत जाणार, रोखण्यासाठी हिंमत असेल तर नरेंद्र मोदी यांनी सांगलीत प्रचाराला यावे. चंद्रहार मविआचे उमेदवार आहेत आणि राहतील. कुणाला विरोध करायचा असेल तर आताच करावा. आमची सांगलीत कोंडी करण्याचा प्रयत्न कराल तर संपूर्ण महाराष्ट्रात त्याची कोंडी करू, असा इशाराही संजय राऊत यांनी यावेळी बोलताना दिला. 
२०१९ मध्ये कोणत्या चिन्हावर लढले विशाल पाटील?
२०१९मध्ये भाजपकडून संजयकाका पाटील यांनी निवडणूक लढवली होती. तर काँग्रसकडून सांगलीची जागा लढवण्यासाठी आग्रही असलेले विशाल पाटील त्यांच्याविरोधात लढले होते. मात्र, विशाल पाटील यांनी ही निवडणूक स्वाभिमानीच्या चिन्हावर लढली होती. त्यामुळे संजय राऊतांनी आज सांगलीच्या सभेतून जुन्या खपल्या काढल्या आहेत.
 विशाल पाटलांचे विमान गुजरातला उतरवणार- संजय राऊतांचा विश्वजित कदमांवर अप्रत्यक्ष निशाणा
सांगलीच्या जागेवरून खासदार संजय राऊत आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आता थेट विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांवर निशाणा साधालाय. विशाल पाटील भाजपात जातील असे भाकित देखील संजय राउतांनी केले आहे.
विशाल पाटलांचा पायलट कोणीतरी आहे आणि त्यांना पायलट जिथे नेईल तिथे विशाल पाटील जात आहेत. त्यामुळे विमान गुजरातच्या दिशेने जाऊ नये, त्याची आम्हाला चिंता आहे. अनेकदा विमान भरकटतात आणि विमान गुजरातला उतरू शकतात. विमान नागपूरला उतरणार नाही ते गुजरातला उतरेल, अशा शब्दात संजय राऊतांनी विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांच्या भूमिकेबाबत नाव न घेता अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर आपली चर्चा झाली आहे. त्यामुळे सांगलीची जागा शिवसेना लढवणार,असं देखील संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील निवडणूक नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी आहे, असं म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाचा पुनरुच्चार करत बारामतीची लढाई ही नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे आणि शरद पवार अशी आहे. यामध्ये नरेंद्र मोदींचा पराभव होईल. पण देवेंद्र फडणवीस अंधारात चाचपडत आहेत,अशी टीका राऊत यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर सांगलीतील विश्वजित कदम, इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी दिल्लीत वरिष्ठांशी भेट घेतली आहे. त्यानंतर विशाल पाटील यांनी सांगलीतील जनतेला एक पत्र लिहिलं आहे. 'सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार, असा दावा देखील विशाल पाटील यांनी पत्रातून केला आहे. त्यावरून संजय राऊतांनी विशाल पाटीलांसह विश्वजित कदम भाजपमध्ये जाणार असा आरोप केलाय.