NC Times

NC Times

प्रकाश शेंडगेंच्या कारवर शाई फेक करुन घातला चपलांचा हार

 
नवचैतन्य टाईम्स सांगली (प्रतिनिधी)-ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांच्या कारवर मध्यरात्री अज्ञाताने शाई फेक करून चपलांचा हार घातल्याची घटना घडली आहे. परंतू ही घटना मराठा समाजातील काही जणांनी केल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. तर प्रकाश शेंडगे यांचाच हा स्टंट असल्याचा आरोप देखील मराठा समाजाने केला आहे.
 प्रकाश शेंडगे हे सांगलीतून ओबीसी बहुजन पार्टीकडून निवडणूक लढवीत आहेत. सांगलीतून माघारी घ्यावी यासाठी मराठा समाजाने हे कृत्य केल्याचा प्रकाश शेंडगे यांचा आरोप आहे. प्रकाश शेंडगे यांना सांगलीत कोण विचारत नाही. त्यांना चांगली प्रसिद्धी मिळत नाही. त्यांच्या बातम्या कोठेही दाखवले जात नाहीत. याच कारणातून प्रसिद्धी मिळण्यासाठी प्रकाश शेंडगे यांनीच हा स्टंट केलाचा आरोप मराठा समाजाने केला. दरम्यान या घटनेची पोलिसांनी देखील गांभीर्याने दखल घेतली असून दोन पथकांकडून या घटनेचा तपास करण्यात येत आहे.
 प्रकाश शेंडगे यांच्या ज्या कारवर शाही फेक आणि चपलांचा हार घालण्यात आला. ती कार संबंधित हॉटेलच्या सीसीटीव्ही कक्षेच्या बाहेर होती. त्यामुळे हे कृत्य कोणी केले हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांचा सर्व अंगाने तपास सुरू आहे. प्रकाश शेंडगे यांच्याकडून मात्र अद्याप या घटनेबाबत पोलिसात कोणतीही तक्रार देण्यात आलेली नाही. इतकी मोठी घटना घडून देखील प्रकाश शेंडगे यांनी पोलिसात अद्याप तक्रार का दिली नाही? असा देखील आता सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच प्रकाश शेंडगे यांचाच हा स्टंट असून मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रकार प्रकाश शेंडगे यांच्याकडून सुरू असल्याचा आरोप देखील मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे.