NC Times

NC Times

शरद पवारांचा आणखी एक डाव, बडा नेता गळाला?

 
नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी पहिलीच यादी जाहीर केली. माढ्यातून रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचं तिकीट रिपीट करत भाजपनं आघाडी घेतली. पण त्यानंतर मोहिते पाटील कुटुंब नाराज झालं. त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न अपयशी ठरले आणि शरद पवारांनी डाव साधला. धैर्यशील मोहितेंनी हाती तुतारी घेतली आणि शरद पवारांनी भाजपला पहिला शह दिला. आता धनगर नेते उत्तमराव जानकरांना आपल्या बाजूला घेऊन पवार माढ्यात महायुतीला आणखी एक धक्का देऊ शकतात
उत्तमराव जानकर माढ्यातून लोकसभा लढण्यास उत्सुक होते. त्यासाठी पक्षानं आपल्याला कामाला लागण्याचे आदेश दिले होते, असं जानकर सांगतात. मात्र प्रत्यक्षात भाजपनं नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा संधी दिली. त्यामुळे जानकर मोहिते पाटील यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. त्यांची आज पवारांसोबत चर्चा झाली. लोकसभेला पाठिंबा, त्याबदल्यात विधानसभेला माळशिरसमधून उमेदवारी यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
जानकरांचं मोहिते पाटील विरोधी राजकारण अन् राजकीय समीकरण
उत्तमराव जानकर गेली पंचवीस वर्षे मोहिते पाटलांविरोधात संघर्ष करत आहे. मात्र त्यांना विधानसभेला कोणतेही यश प्राप्त झालेलं नाही. तसं पाहायला गेलं तर उत्तमराव जानकर हे धनगर समाजाचे मोठे नेता म्हणून ओळखले जातात. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाजाचा मोठा प्रभाव आहे. उत्तमराव जानकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत असल्यामुळे ते महायुतीला पाठिबा देतील आणि भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच काम करतील अशी अपेक्षा होती. परंतु आज त्यांनी धैर्यशील मोहिते पाटलांसोबत पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्यामुळे महायुतीची राजकीय गणित बिघडली असं बोललं जात आहे.                                          जानकरांनी पाठिंबा दिल्यास मोहितेंना किती फायदा?
राजकीय समीकरण पाहता उत्तमराव जानकर हे धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि धनगर नेते म्हणून ओळखले जातात. त्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटलांना पाठिंबा दिला तर धनगर समाजाचा एक वर्ग मोहिते पाटलांना मतदान करू शकतो. त्याचा फायदा मोहिते पाटलांना होईल
विधानसभेला जानकरांना माळशिरसमधून उमेदवारी; समीकरण काय?
माळशिरस विधानसभा मतदारसंघ आणि माढा लोकसभा मतदारसंघात धनगर समाजाचा मोठा प्रभाव आहे. माढ्यासह माळशिरसमध्ये धनगर मतांचं प्राबल्य आहे. उत्तमराव जानकार मोहिते पाटलांचे पारंपरिक विरोधक होते. परंतु गेली २५ वर्षे मोहितेंविरुद्ध संघर्ष करूनही त्यांना आमदार होता आलं नाही. त्यामुळे लोकसभेला मोहिते पाटलांना पाठिंबा देऊन त्याबदल्यात माळशिरस विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटलांच्या पाठिंब्यावर जिंकता येईल असं एक समीकरण बांधलं जात आहे. माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राम सातपुते यांना भाजपकडून सोलापूर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे माळशिरस विधानसभा मतदारसंघ मोकळा झाला आहे. मोहिते पाटलांच्या पाठिंब्यावर जानकर निवडणूक जिंकू शकतात.
 जानकरांनी मोहितेंना पाठिंबा दिल्यास भाजपला निवडणूक जड जाणार?
माढा लोकसभा मतदारसंघत भाजपचे विद्यमान खासदार विराजमान आहेत. त्यांना पाडण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील यांनी शड्डू ठोकला आहे. मात्र मोहिते पाटील निवडून आले लोकसभेला भाजपचं नुकसान होईल. शिवाय मोहिते पाटलांच्या पाठिंब्यामुळे माळशिरसमध्ये जानकर मुसंडी मारु शकतात.