NC Times

NC Times

पालघरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी१६ वर्षीय मुलीचा शेतात आढळला मृतदेह


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-
एप्रिल महिना सुरू झाला असून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. विक्रमगड तालुक्यातील केव - वेडगेपाडा येथे उष्माघातामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अश्विनी विनोद रावते (१६) असे मृत मुलीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील केव-वेडगेपाडा येथील रहिवासी असलेली अश्विनी विनोद रावते (१६) एस. पी. मराठे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज टेननाका-मनोर येथील विद्यार्थिनी असून इयत्ता अकरावीचा पेपर देऊन सोमवारी घरी परतली. परंतू घरात कोणीही नसल्याने यावेळी ती आपल्या आई-वडिलांना शोधण्यासाठी शेतात गेली. मात्र तिची आई कपडे धुण्यासाठी नदीवर गेली होती. वडील मनोर येथील बाजारात गेले होते.
शेतात गेलेल्या अश्विनीला भर उन्हात चक्कर आली. त्यामुळे ती शेतातच खाली कोसळली. त्यानंतर अश्विनीची आई कपडे धुवून दोन तासांनी घरी परतल्यानंतर अश्विनीची कॉलेज बॅग घरात दिसली. मात्र अश्विनी कुठेही दिसत नसल्याने तिची आई तिला शोधण्यासाठी शेतावर गेली. त्यावेळी अश्विनी रणरणत्या उन्हात बेशुद्ध अवस्थेत शेतात पडलेली तिच्या आईला आढळून आली. बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या अश्विनीला तातडीने मनोर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तेथे तिला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.