NC Times

NC Times

जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा हात विशाल पाटील यांना साथ भाजपला दे धक्का


नवचैतन्य  टाईम्स जत प्रतिनिधी(संजय शिंदे)- पश्चिम महाराष्ट्रातील बहुचर्चित सांगली लोकसभेत भाजपांतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनाच केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा उमेदवारी दिल्याने जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या विशाल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये मी आजपर्यंत पक्षवाढीसाठी काम केले. परंतु पक्षाने त्याची दखल न घेता अलिकडे माझ्याविरोधात गट बांधण्याचे तसेच माझे अवमुल्यन करण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून करण्यात आले आहे. ते मला सहन करणे शक्य नसल्याचे सांगत विलासराव जगताप यांनी भाजपला जय महाराष्ट्र  केला आहे.
 स्वतंत्रपणे विचार करण्यासाठी मी पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होतो. तरी माझ्या राजीनाम्याचा आपण स्वीकार करावा, असे विलासराव जगताप यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
 विशाल पाटील मंगळवारी अर्ज दाखल करणार
सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अपक्ष आणि काँग्रेसतर्फेही ते अर्ज दाखल करतील. सकाळी साडेनऊ वाजता पदयात्रा सुरू होईल. काँग्रेस कमिटीसमोर मेळाव्यात त्याचे रूपांतर होईल. त्यानंतर मोजके लोक जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करतील.
महाविकास आघाडीने सांगली मतदारसंघ शिवसेनेला सोडला आहे, मात्र काँग्रेसने त्यावरील दावा अद्याप सोडलेला नाही. सांगलीतील वस्तुस्थिती तपासून घ्यावी, भाजपचा पराभव हे मुख्य लक्ष्य ठेवावे आणि काँग्रेसला उमेदवारी द्यावी, अशी मागणी आमदार विश्‍वजीत कदम यांनी पक्षाकडे पुन्हा एकदा केली आहे.
१९ एप्रिलला अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यात बदलाची अपेक्षा त्यांना आहे. त्यामुळे विशाल पाटील हे काँग्रेस पक्षातर्फेही एक अर्ज दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीत बदल झालाच नाही, तर पर्याय म्हणून ते अपक्ष उमेदवारी अर्जही दाखल करतील. काँग्रेसच्या निर्णयावर बंडखोरीबाबतचा निर्णय अवलंबून असेल. त्याविषयी २२ एप्रिलच्या आधी निर्णय घेतला जाईल, असे त्यांच्या गोटातून सांगण्यात आले.