NC Times

NC Times

जळगाव तालुक्यातील नागदुली येथील तरुणावर वीज कोसळून जागीच ठार


नवचैतन्य टाईम्स जळगाव प्रतिनिधी(संजय फरांदे)-  तालुक्यातील नागदुली शिवारातील शेतात अचानक वीज कोसळल्याने ३५ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची दु:खद घटना घडली आहे. शुक्रवारी १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. सुदैवाने तरुणाचे वडील थोडक्यात बचावले आहेत.
 मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत उर्फ भैया भिका पाटील (वय ३५) हा तरुण आपल्या कुटुंबासोबत नागदुली इथे वास्तव्यास असून शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. त्याचे नागदुली शिवारात शेत आहे. शुक्रवार १२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास वादळीवारासह पाऊस झाला.
 त्यावेळी श्रीकांत हा वडील भिका लक्ष्मण पाटील आणि काही मजुरांसोबत शेतातील चारा कुट्टी जमा करत होते. त्यावेळी श्रीकांत पाटील हा तरुण लाकूड घेण्यासाठी बाजूला जात असताना अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. अंगावर वीज कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
 लेकाच्या अंगावर विज कोसळल्याची घटना त्याचे वडील भिका पाटील यांच्यासमोर झाली. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली इतरांना बोलावलं. शेजार्‍यांच्या मदतीने तरुणाला वाहनात टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं.
 रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश पाटील यांनी तरुणाला मृत घोषित केलं. दरम्यान एकुलता एक मुलगा गेल्याने वडील आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. श्रीकांत पाटील याच्या पश्चात आई, वडील, मुलगा, दोन मुली तसंच पत्नी आणि दोन विवाहित बहिणी असं कुटुंब आहे. गरीब कुटुंबातील असल्याने या मुलांवर उदरनिर्वाची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ पाटील कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी होत आहे.