NC Times

NC Times

देशाच्या विकासाची गँरंटी देणारे संकल्प पत्र, भाजपच्या जाहीरनाम्यावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया


नवचैतन्य  टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-भारतीय जनता पक्षातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी जाहीर करण्यात आलेल्या जाहीरनाम्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोंडभरुन कौतुक केले आहे. हा देशाच्या विकासाची गँरंटी देणारा संकल्प पत्र असल्याचे गौरवद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवरुन प्रतिक्रिया देताना काढले. त्याचवेळी खरा देशभक्त या संकल्प पत्राचे स्वागत करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
 आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे संकल्प पत्र जारी केले. त्याचे मी मनापासून स्वागत करतो, नरेंद्र मोदी यांनी देशाच्या १४० कोटी जनतेच्या मनातील संकल्प यावेळी जाहीर केला आहे. हा संकल्प देशाच्या सर्वांगीण विकासाचा आहे. देशातील सर्व नागरीकांना समान अधिकार देणारा समान नागरीक कायदा, त्याचबरोबर निवडणूक प्रक्रियेत शिस्तबद्धता आणणारा ‘एक देश एक निवडणूक’ सारखे अनेक निर्णय देशाला पुढे नेण्याचा संकल्प आहे. रामायण महोत्सव साजरा करणे आणि अयोध्याच्या आणखीन विकास करण्याचा निर्णय देशातील कोट्यावधी रामभक्तांसाठी सुखकारक निर्णय असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
ते पुढे म्हणाले की, देशातील युवा, महिला, शेतकरी आणि गोरगरीबांच्या विकासाची प्रतिबद्धता या संकल्प पत्रात दिसून येते. ७० वर्षांपुढील नागरिकांना पाच लाखापर्यंत उपचार मोफत करुन देण्याबाबतचा निर्णय देशाचे आरोग्य आणखीन सुदृढ बनवेल. देशातील ८० कोटी गरीब जनतेला सध्या केंद्राकडून मोफत धान्य दिले जात आहे. येत्या पाच वर्षांत ही योजना कायम ठेवण्यात येणार असून याबरोबरच रेल्वे, रस्ते निर्मिती आणि पायाभुत सविधांचा विकासाचे कार्य येत्या काळात आणखीन वेगाने करण्यात येणार आहे. गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्त्वात देशाने उल्लेखनीय प्रगती केली आहे. आता हे संकल्प पत्र म्हणजे आणखीन भरारी घेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचवेळी आम्ही सर्वजण या कार्यात स्वत:ला झोकून देऊ, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.