NC Times

NC Times

सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये ठिणगी कॉग्रेस पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत


नवचैतन्य टाईम्स सांगली प्रतिनिधी(जालिंदर शिंदे)-सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये आता ठिणगी पडल्याचे दिसून येते. मैत्रीपूर्ण लढत वगैरे असे काही नसते सांगलीतून चंद्रहार पाटीलचं लढतील असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तसेच संजय राऊत हे दोन दिवस सांगली दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे सांगलीतील काँग्रेस नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे उद्या सांगली दौऱ्यावर येत आहेत. सांगलीमध्ये महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची ते भेट घेणार आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहाकाळ जत आटपाडी पलूस सांगली मिरज विधानसभा मतदारसंघात ते आढावा बैठक घेणार आहेत. सांगलीची जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायची या दृष्टिकोनातून पुढील रणनीती ठरवण्यासाठी हा दौरा असल्याचे बोलले जात आहे.
 दरम्यान सांगलीतून काँग्रेसच लढेल, असा ठाम निर्धार आता काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या बैठकीवर विश्वजीत कदम यांनी सांगलीच्या जागेचा तिढा सुटत नसल्याने बहिष्कार टाकला होता. आता काँग्रेस नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आक्रमक झाले आहेत. दोन दिवसात सांगलीमध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देखील देण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.
 राजीनामे देण्याबाबत सर्वांनी तयारी देखील दर्शवली असल्याचे सांगण्यात येतं आहे. तसेच सांगलीची जागा लढवण्यासाठी आम्ही सक्षम असून आम्ही ती निवडणूक लढण्यासाठी ठाम देखील आहोत. येत्या दोन चार दिवसांमध्ये आमची भूमिका स्पष्ट करू, असं देखील काँग्रेसचे नेते सांगत आहेत. त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये ठिणगी पडणार हे मात्र निश्चित.