NC Times

NC Times

एसटीचे 'नाथजल' नावालाच स्थानिक बाटलीबंद पाण्याची विक्री


नवचैतन्य  टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-भारतीय रेल्वेच्या रेलनीरच्या धर्तीवर राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने नाथजल सुरू केले. नाथजलाने उन्हाळ्यात एसटी प्रवाशांची तहान भागत नसल्याचे राज्यात चित्र आहे. या बाटल्यांचा केवळ दिखावा करून स्थानिक बाटलीबंद पाण्याची मोठ्या प्रमाणात विक्री, महामंडळातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष, विक्रेत्यांना कमी दलाली, यांमुळे नाथजल प्रकल्पच बंद होण्याच्या मार्गावर आहे.
 एसटी प्रवाशांना अर्धा आणि एक लिटर बाटलीबंद पाणी स्वस्त दरात मिळावे आणि महामंडळाला उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण व्हावा, यासाठी महामंडळाने नाथजल नावाने बाटलीबंद पाण्याची विक्री सुरू केली. यासाठी कंत्राटदार नेमून त्यावर नाथजलाचे ब्रॅँडिग करण्यात आले. एक लिटर नाथजल १५ रुपयांना विक्री केल्यास विक्रेत्यांना एक ते दोन रुपयांची दलाली मिळते आणि महामंडळाला प्रतिबाटलीमागे ८५ पैसे ते एक रुपया मिळतो. मात्र प्रत्यक्षात विक्रेते प्रवाशांना २० रुपयांना बाटलीबंद पाणी विकतात. मुंबईसारख्या शहरात नाथजलापेक्षा अन्य ब्रँडेड पाण्याची मागणी प्रवाशांकडून होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात स्थानिक बाटलीबंद पाण्यामागे तीन ते चार रुपये दलाली मिळते. त्यामुळे एसटी स्थानक-आगारांतील विक्रेत्यांकडून नाथजलाचा दर्शनी भागात साठा केला जातो. विक्री मात्र स्थानिक बाटलीबंद पाण्याची होते.
 कारवाई आदेश कागदावरच
 एसटी स्थानकात केवळ नाथजलाची विक्री करण्याचे लेखी आदेश आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी होत नाही. नाथजलाशिवाय अन्य विक्री करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद कागदावर आहे. मात्र किती विक्रेत्यांवर कारवाई केली, याची माहिती महामंडळाकडे उपलब्ध नाही. महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना तहान भागवण्यासाठी स्थानिक बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
नाथजलाचा विस्तार वाढवण्यासह विक्रेत्यांना अधिक दलाली मिळावी यासाठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक बोलावली होती. यात महामंडळाने स्वत:च नाथजलाचे उत्पादन करण्याबाबत पावले टाकावी अशा सूचना त्यांनी केल्या. यासाठी आवश्यक मदत राज्य सरकारकडून देण्याचे आश्वासनही महामंडळाला दिले. मात्र महामंडळ स्तरावरच नाथजलाच्या उत्पादनाबाबत कोणतीही हालचाल झाली नाही.