NC Times

NC Times

रायगडाची सफर


अभ्यासक्रमापासून थोडेसे बाजूला जाऊन, मुलांना निसर्गातील भौगोलिक परिसराचे ज्ञान लाभावे,त्यांच्या मनाला विरंगुळा वाटावा, व त्यांच्या गालावर प्रेमळ हास्य पसरावे. या साठी श्री मोकाशी सरांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री कैवारी यांच्या समोर अफझलखाना सारखासहलीचा विडा मोठ्या चातुर्याने उचलला.त्वरित ऐतिहासिक, धार्मिक स्थळे, प्राणी, वस्तू संग्रहालये, व इतर प्रेक्षणीय स्थळांना भेटी कशा देता येतील या विचारांचा  भुंगा त्यांच्या डोक्यात भुणभूण करु लागला. वर्गातील एका कोपऱ्यात धुळ खात पडलेले नकाशे झटकून,योग्य पध्दतीने अवलोकन, तपासून बहिर्जी नाईका प्रमाणे सहलीच्या मार्गाची दिशानिश्चित केली. मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये स्वतःचा जीव धोक्यात घालून १९९७ सालातल्या सहलीचा तह घडवून आणण्यासाठी हलक्या आवाजात बऱ्याच खलबती कुंटल्या.अखेर परवानगी संपादन केली,आणि एखाद्या योध्दयाप्रमाणे साहेबांच्या केबीन मधून विजयी मुद्रेने बाहेर आले.शिक्षकांच्या नोकरीत सतत ढवळाढवळ करणारे श्री घालपांडे लेखनिकाने तिरपी मान करुन नोटीस वहीमध्ये लिहून  बराच वेळ सार्थकी लावला. त्या नोटीस वहीवर मुख्याध्यापकांनी वजनदार हाताने नाजूक सही करुन हाता वेगळी केली. मगच त्या नोटीस वहीस धंन्य वाटले असावे. शैक्षणिक सहलीची नोटीस सदा गोंधळे या थोर  आदेश पालाने मोठ्या धामधुमीत लग्न पत्रिका वाटाव्यात तसे सर्व वर्गातून फिरवून आणली.दोन आठवड्याच्या  कालावधीत शंभर मुला व मुलींनी सर्व ठरवलेली खंडणी स्वतःहून शाळेत वर्गशिक्षकाकडे आणून दिली. मुख्याध्यापकांच्या मर्जीतले व गुप्त खल कारस्थान करणारे चौगुले, पानमळ, व खेताडे या सर लोकांनी पारतंत्र्यातील बाबु गेणु प्रमाणे स्वतःचा जीव धोक्यात घालून महाबळेश्वर आगारावर उपकार करुन  दोन सुंदर गाड्या मिळवण्याचा एक नवा इतिहास घडवून आणला.त्या कामानिमित्त त्यांनी शाळेचा एक दिवस आयता घालवला होता. ठरलेल्या दिवशी पहाटे बरोबर चार वाजता न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात दोन एसट्या बाळसेदार अर्ध वर्तुळकार वळणे घेऊन अंड्याला आलेल्या कोंबडी सारख्या  कुरकुरत येऊन उभ्या राहिल्या होत्या. सर्व मुले व मुली हातात, गळ्यात व काखेत गोड पदार्थांच्या जाडजूड पिशव्या व बॅगा घेऊन मैदानावर गर्दी करत होते. त्यांना निरोप देण्यासाठी त्यांचे संवेदनशील पालक ही बहुसंख्येने उपस्थित होते. मी आणि रासकर सरांनी आपापल्या खोलीचा त्याग करुन अंधारातूनच ग्राम देवतेला व न उगवलेल्या सूर्य देवतेला हात जोडून नमस्कार केला.दोन्हीही ही गाड्यांचे दिवे प्रकाशमान असल्याने शाळेच्या मैदानावर सर्वत्र उजेड पसरला होता. नियमानुसार सर्व शिक्षक व विद्यार्थी एसटी मध्ये स्थानापंन्न झाले. निरोपाच्या फैरी झडू लागल्या. गाडीमध्ये सर्व मुले उठ बस करत होती.काहीजण खिडकीतून हात बाहेर काढून, दुसऱ्याचे  हात हातात घेऊन विनाकारण दाबत होती. मी सुध्दा खिडकीची काच बाजूला सारुन एक हात बाहेर काढून दिसेल त्याला निरोप देऊ लागलो. त्यावेळी नेमके मुख्याध्यापक सहज फिरत माझ्या खिडकीकडे आले, तेव्हा मी माझा हात एकदम आत घेतला.माझ्या सारख्या सर्व सामान्य मोठ्या माणसांच्या 
हाताला लागण्याचे धाडस त्या वेळी माझे कडून झाले नाही. श्री मुसळे सर खिडकीतूनच बाहेर उभे असल्याचे दिसले.दोन दिवसांपूर्वी त्यांच्या हाताला लागल्यामुळे पांढरी पट्टी गुंडाळलेली स्पष्टपणे दिसत होती, त्यांचा हात शिवाजीने वार केलेल्या शाहिस्तेखाना सारखा तळहातात बांधलेला होता. तरीही ते पाचवीतील लहान मुलांना निरोप देण्यासाठी कीर्तनातील बाबा महाराज सातारकरां सारखे केविलवाणे हातवारे करु लागले.बाहुबलीसारखे असणाऱ्या श्री ढोले सरांनी दोन्ही ही एसटीच्या कपाळावर पांढऱ्या खडूने शाळेचे नाव लिहून टिळा लावला.गतवर्षीच्या सहलीचा कापडी फलक ऐन वेळी न सापडल्याने त्यांचीही कामगिरी साक्षरता अभियाना सारखी वाटली. श्री मुख्याध्यापकांनी सर्वांचे मनापासून अभिष्टचिंतन केले. दोन्ही ही गाड्या समोर त्यांनी नरबळी, पशु बळी न देता एका सर्वसामान्य श्री फळाचे मस्तक धरुन दगडावर त्यांचा कपाळ मोक्ष केला. नारायणपुरच्या महाराजांप्रमाणे एक हात हवेत उंचावून मुलांना प्रेमाने निरोप दिला. व ते लगेच बाजूला झाले. अंधाराला हळू हळू ढुशा देत व बाजूला सारीत गाड्या थरथरत सुरु झाल्या. शाळेच्या मैदानातून बाळसेदार वळण घेऊन डामरी सडकेवरुन जुळ्या बहिणी सारख्या एका पाठोपाठ एक धावू लागल्या. बरोबर काही वेळातच झोळाच्या खिंडीत दिवस उगवला. त्याने आपली सोनेरी किरणे दरीत उधळून दिली होती. त्यांचा उजेड झाडी व झुडपांच्या गर्द  हिरव्या पानावर  रेंगाळत होता.असंख्य
दवबिंदू चकाकत होते. पर्वतांच्या कडा सोनेरी रंगामध्ये परावर्तीत होत होत्या. विविध पक्षांचे आवाज जंगलातून उमटत होते. झोळाच्या खिंडीतून दिसणारा मकरंदगड सकाळच्या प्रहरी कान टोपी घातलेल्या वयोवृध्दआजोबां सारखा शांत व स्थिर दिसत होता. सुर्याच्या किरणांनी आमच्या गाडीत खिडकीतून प्रवेश केल्यावर ड्रायव्हर काकांनी दिवे मालवुन टाकले. मोकळ्या आकाशात सूर्यदर्शन झाले. तोही आमच्या गाडी सोबत बिनधास्तपणे पळतअसल्याचा भास होऊ लागला. बापूंच्या चिखली या विनंती वजा थांब्यावर दोन्हीही गाड्या येताच महाबळेश्वरला जाणारे खालचे प्रवासी सावध झाले. गाड्या थांबवण्यासाठी त्यांनी संपूर्ण शरणागती पत्करली. ड्रायव्हरने  त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन गाडीचा वेग वाढवत नेला. उलट मुलांनी 
खिडकीतून हात बाहेर काढून हुर्रे केले.स्वप्न सृष्टी प्रमाणे महाबळेश्वर निसर्ग रम्य शहर वनश्री मधुन नुकतेच जागे होत होते. पांढऱ्या शुभ्र धुक्यात लपेटून गेले होते. काही घरांच्या डोक्यावर धुरांची वलये हळू हळू मोठी होऊन आसपास पसरत जात होती. महाबळेश्वर आगारात दोन्हीही गाड्या गपगार उभ्या राहिल्या. या संधीचा फायदा मुलांनी लगेच उचलला. आपल्या देशाची राष्ट्रीय एकात्मतेचे ठिकाण म्हणजे स्वच्छता गृह की जेथे सर्व जातीतील, पंथातील लोक गुण्या गोविंदाने एकत्र येतात. रामायणातील राम व लक्ष्मणा प्रमाणे दोघांमध्ये विशिष्ट अंतर ठेवून आंबे नळीच्या घाटात गाड्या उताराला लागल्या होत्या.अंगणातील लहान मुलांप्रमाणे हळूहळू रांगत होत्या. सकाळच्या राम प्रहरी आकाशातुन पडणाऱ्या दवबिंदूने प्रतापगड उन्हात चमकत होता. राम नामाचा मग्न असलेल्या व उन्हामध्ये ध्यानस्थ बसलेल्या हनुमंता प्रमाणे प्रतापगड शिवपूजेला बसल्या सारखा वाटत होता.आंबेनळीच्या घाटातून अनेक वळणे घेताना गडावरचा भगवा ध्वज दिसताच मुलांनी शिवाजी महाराजांचा जयजयकार चालू ठेवला. प्रतापगडच्या पायथ्याशी असणाऱ्या निसर्गरम्य कुंभरोशी या गावातून गाड्या पुढे जात असताना आमचे मित्र श्री. नंदकुमार जगताप यांच्या शाळे कडे पाहून मी खिडकीतूनच मनोभावे शुभेच्छा पाठवल्या. जर ते आज शाळेत उपस्थित असतील तर त्यांना त्या लाभतील अन्यथा गडाच्या पायथ्याशी खानासारख्या मरुन पडतील. याची मला काळजी वाटू लागली. प्रतापगड घाटातून ओळोखे पिळोखे दिल्यासारख्या गाड्या महाडच्या दिशेने गतीमान होत होत्या. घाटातुन दिसणारे नयनमनोहर दृश्ये मनालाआवाक करीत होती. पर्वतांच्या विस्तृत रांगा व त्यावरील पाण्याचे श्रोत उन्हात चमकत होते. निर्मनुष्य जंगल मनात धडकी भरीत होते. तांबडी माती, मंगलोरी कौलाच्या  घरांना, मागे दामटीत गाड्या सपाटून धावत होत्या. आकाश निळाई पिऊन बसल्या सारखे स्वच्छ होते. शेतातील बांधावर असलेल्या झाडावर गवताच्या व भातवाणाच्या गंजी रचल्या होत्या. किल्ले राजगड परिसरात गाड्यांनी प्रवेश केल्या नंतर अर्धवट पेंगत व सुस्तावलेली मुले एकाएकी जागी झाली. बाहेरील नैसर्गिक डोंगर, टेकड्या , विचित्र आकारातील प्रचंड खोल दऱ्या, नद्या,ओढे,व जंगल पाहण्यात गुंतून गेली होती.चित्र विचित्र वळणातेन गाड्या अंड्याला आलेल्या कोंबडी सारख्या एकसारख्या करकरत होत्या.गाडीतून आम्हाला दूरपर्यंत रायगडआभाळात आपले विशाल बाहू पसरुंन आभाळाला गवसणी घालत असलेल्या महाभारतातील भिमा सारखा वाटत होता. दोन्हीही गाड्या पायथ्याशी येऊन थांबल्या तरी मुलांचा उत्साह आणि जोश वाढतच होता. सर्व पायउतार झाले. आपल्या मराठी फौजेला गडावर कसे चढावे या विषयी तावरे सरांनी नेताजी पालकर प्रमाणे बरेच काही संकेत देवू लागले. सुमारे अडीच तासां नंतर सर्वजण मागेपुढे गडावर पोहचलो. सर्व विद्यार्थ्यांना चालून चालून भुका फार लागल्या होत्या.म्हणून भरल्यापोटी गड पहावा असे ठरले. रायगडावरील चांगली पाणस्थळ जागा पाहून मुला व मुलींनी आपापले जेवण करुन घेतले. राजांचा गड पाहण्यासाठी मी खूप उतावीळ झालो होतो. यासाठी मला स्वतंत्रपणे फिरता यावे म्हणून मी गड पाहण्या 
साठी मुलांच्यातून झटकन बाजूला झालो.                इतिहासाच्या भग्न पाऊल खुणा अंगाखांद्यावर वागवीत, सांभाळीत असलेला रायगड वृध्द दंतहिन सिंहासारखा जखमी अवस्थेत कण्हत पडलेला पाहुन माझ्या मनात अतिव दु:ख निर्माण झाले. तेथील भग्न इमारती, राजसिंहासनाची जागा, दरबारातील एकांगीपणा, व भग्न पडके वाडे पाहून त्यावेळचा जीवंत रायगड कसा असेल, सैनिकांचा जागता पहारा, व राजे दरबारातआल्या नंतर शिंगे तुतारी, ढोल ताशांचा  आवाज मनोमन आठवू लागलो. मन सुन्न करणारी बाजार पेठ,जोगेश्वरीचे मंदिर, श्री ची समाधी परिसर पाहून राजांच्या स्मृतींचे वादळ मनात ठेऊन समाधी समोर अश्रूंचा अभिषेक करुन उदास मनाने आल्या पाऊली माघारी फिरलो. जड अंत:करणाने टकमक टोक पाहुन माघारी निघालो. तो पर्यंत सारे विद्यार्थी गडाच्या उतरणीला लागले होते. आतील दळभार सांभाळीत दोन्हीही गाड्या पुण्याच्या दिशेने उसळल्या. तो पर्यंत आकाशातील तळपणाऱ्या सूर्यदेवांचा रथ मावळतीला भेटण्यासाठी  घाईघाईने निघाला होता.बघता बघता तो मावळतीच्या आश्रयाला जाऊन ही पोहचला,आणि आता गाडीतील सर्वांना अंधार आणि थंडी जाणवू लागली.मुलांनी व मुलींनी अंगामध्ये उबदार स्वेटर व डोकीस कान टोप्या घातल्या होत्या. रात्री दहा वाजता पुण्यातील शनिवारवाडा दरवाजाचे ओठ बंद करुन अंधारातून आमच्या कडे पहात होता. त्या अंधारात बाजीराव पेशवा यांचा पुतळा ही नीट व्यवस्थीत पहाता आला नाही. वाड्याच्या पुढील मोकळ्या जागेत गाड्यांनी ताबा मिळवला. या अंधुक अंधाराचा फायदा शालेय मुलांनी व्यवस्थित उठवला. एका वयोवृध्द द्राक्षवाल्याची द्राक्षे विकत घेण्यासाठी मुलांनी विनाकारण गर्दी व झुंबड केली. त्यामुळे दुकानदाराला काहीच सुचत नव्हते. परिणामी तो पूर्ण भांबावून गेल्याचे पाहताच मुलांनी निम्म्या पेक्षा जास्त द्राक्षे हातोहात लांबवण्यात यश संपादन केले.पण हा अभ्यासक्रमा बाहेरचा विषय असल्याने त्यांनी चोरुन आणलेली द्राक्षे मी सुध्दा मोठ्या चवीने खाऊ लागलो. चोर चोराला सामील होतो या म्हणीचा अर्थ लक्षात आला. शिवाजी राजांचा लाल महाल ही पाहता आला नाही तरी जवळच असलेल्या एका चाळीतून मुंबईतील उपआयुक्त गो.रा.खैरनार यांचे विचार ह्दयामध्ये  धारण करुन बावळट सारखा फक्त फिरुन आलो. जवळच श्री घनवट सरांनी समाधान हाॅटेलचा नामी शोध लावला. तेथे जेवन उरकून सर्वजन गाडीमध्ये आपापल्या जागेवर सरपंचा सारखे जाऊन बसले.आता गाड्या पुण्यातुन आळंदीच्या दिशेने एकामागे एक धावत होत्या, जेवणखाण झाल्यामुळे सर्वजन झोपी जात होते. मी माझी मान रासकर सरांच्या मांडीवर अर्पण करुन देहातुन प्राण सोडल्यासारखा पडून राहिलो. आधुन मधुन संत तुकाराम महाराजांची आठवण येई व झोप निघून जाई. अखेर इंद्रायणी नदीच्या किनाऱ्यावर उंबराचे फुलवाले महाराज यांच्या मठात रात्री दीड वाजता उतरलो.ती रात्र तेथेच काढली. शुभ प्रभाती सर्वांनी स्नाने उरकून देहूतील श्री संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात जाण्यासाठी सर्वजण आतुर झाले होते. तेथे गेल्या नंतर पावन भूमी व इंद्रायणीचा दगडी घाट पाहिला. पांडुरंगापुढे मान झुकवून नम्रता दाखवली. विद्येची चोरी करावी पण धनाची करु नये. याचा प्रत्यय विद्यार्थ्यांनी घडवून आणला. मंदिराच्या आसपास पुस्तक विक्रेते यांच्या दुकानातून बरीच पुस्तके चाळताना किंवा पहाताना मुलांनी हातोहात लांबवली होती. हे दुकानदारांच्या लक्षात आल्यावर तो मुलांना शोधू लागला.  तेथे भाविकांची गर्दी असल्याने तो मुलांना ओळखू शकत नव्हता.                                                                   तो पर्यंत बऱ्याच मुलांनी तेथुन पोबारा करुन एसटी मध्ये गप्पगार बसुन राहिली.सर्वजण गाडीत बसल्यावर त्यातीलच  मी एक पुस्तक वाचावया घेतले. चोर चोराला सामील असतो या म्हणीचा प्रत्यय आला. आळंदीमध्ये आल्यानंतर तेथील घाट,निसर्ग,अनेक भक्त भाविकांची गर्दी, पाहून मनात भक्ती भावाचा उदय झाला. प्रथम इंद्रायणी नदीत जाऊन स्नान केले. कपाळावर अष्टगंध रेखाटला. समाधी मंदिरात प्रवेश करताच मन एकाग्र होऊ लागले. समाधीला वाकून नमस्कार करताच कानावर ओंम या एका अक्षराचा नाद ध्वनी उमटला. भावना शून्य झालो. क्षणभर जगाचा विसर पडला. पुणे येथील सारसबाग पाहून मरु घातलेले सर्पोद्यान पाहिले. भारती विद्यापीठ परिसरातील एका हाॅटेल मध्ये जेवढे उरकून जेजुरीच्या दिशेने गाड्यांचा प्रवास सुरू झाला. तो पर्यंत मुलांनी  चला जेजुरीला जाऊ . हे गीत म्हणून गोंधळ सुरु केला. भर भक्कम तटबंदीच्या आतील देवालयासमोर दर्शन झाले. सर्वजण दर्शन घेऊन पायथ्याशी आले. सायंकाळी दहा वाजता जेजुरीत हाॅटेलचे जेवण घेतले. मुलांना खरेदी करण्यासाठी मुक्त केले, साडे आकाराला
थकले भागले जीव गाडीत बसले होते. आता परतीचा प्रवास हा रात्री सुरू झाला होता. दोन्हीही गाड्या ड्रायव्हरनी वेगाने दामटायला सुरुवात केली होती. वाई ओलांडून गाड्या पाचगणीचा घाट चढत व गोंजारत होत्या. आतील दिवे या पुर्वीच मालवले होते. घाटात शुभ्र धवल चांदणे पसरले होते. बाहेरील जंगल निरव शांततेचा अनुभव देत होते. महाबळेश्वर मागे टाकून तळदेवच्या शालेय पटांगणात गाड्या कधीआल्या हे झोपेत कोणाला ही समजले नाही. सर्वजण पायउतार झाले. पण मन मात्र अद्यापही रायगडच्या परिसरातच घुटमळत होते. ..... 
प्रा. संभाजी लावंड. वाई.