NC Times

NC Times

उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं का?- मकरंद अनासपुरे


नवचैतन्य टाईम्स  मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)- मराठी सिनेसृष्टीला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे लोकप्रिय अभिनेते म्हणजे मकरंद अनासपुरे. त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. कधी अत्यंत गंभीर तर कधी विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. आपल्या गावाकडील भाषेचा गोडवा त्यांनी संपूर्ण सिनेसृष्टीत पोहोचवला. मकरंद आता लवकरच 'राजकारण गेलं चुलीत' या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांचा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या महाराष्ट्रात आणि देशभरात सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी स्वतः केलं आहे. या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राज्यकर्त्यांवर आणि पक्ष बदलणाऱ्या नेत्यांवर भाष्य केलं. त्यासोबतच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र यावेत का याबद्दलही आपलं मत मांडलं.
महाराष्ट्रातील राजकारणातील महत्वाचा पक्ष म्हणजे शिवसेना. बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मुंबई हे एक समीकरण होतं. त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे आणि पुतण्या राज ठाकरे दोघेही राजकारणात आले. मात्र राज यांनी कालांतराने स्वतःचा पक्ष सुरू केला. तेव्हापासून राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं अशी इच्छा मराठी माणूस कायम व्यक्त करत असतो. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल मकरंद यांना प्रश्न विचारण्यात आला. त्याचं उत्तर देताना मकरंद म्हणले, 'ते एकत्र आले तर मराठी माणूस म्हणून मला केव्हाही आनंदच होईल. मी एकदा राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. तेव्हा त्यांना विचारलं होतं. की भावाची कधी आठवण येत नाही का? त्रास होत नाही का? मला वाटतं मराठी माणसांना एकत्र पाहिलं तर आपणही आनंदितच होऊ. माझीही हीच भावना असेल.'
मकरंद यांनी असं म्हणत जणू मराठी माणसाच्या मनातलं उत्तर दिलं आहे. मकरंद यांनी यापूर्वी अनेक राजकीय पार्शवभूमीवरचे चित्रपट केले आहेत. त्यात 'खुर्ची सम्राट', 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा', 'पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा' या चित्रपटांचा समावेश आहे. तर त्यांचा 'राजकारण गेलं मिशीत' हा चित्रपटही प्रेक्षकांना हसवेल आणि अंतर्मुख व्हायला भाग पाडेल. हा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.